मराठी कथा, लेख

Breaking

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

लग्नगाठ भाग 22

 हॉस्टेलवरून घरी आल्यावर आनंदी असलेली विद्या, आईकडून स्मिताच्या पळून जाण्याची बातमी ऐकताच खूप दुःखी झाली.

 आई-बाबा गावी गेले. अनिकेतही मित्रांबरोबर बाहेर गेला. विद्या घरात एकटीच खिन्न मनाने बसली होती.

 काय करावे? तिला सुचत नव्हते.


 'आपण इथे बसून नुसते विचार करून, उदास राहून काय होणार आहे?  आपण आता काय करू शकणार?  घरातील सर्व मोठी मंडळी ठरवतील पुढे काय करायचे ते.'


 असा विचार करत तिने इच्छा नसतानाही घरातील काम करण्यास सुरुवात केली.


 'एरव्ही घरात एवढा पसारा आई कधी राहू देत नाही.  पण गावाहून अशी बातमी आल्याने आईची इच्छा झाली नसेल काही काम करायची.


 मन अस्वस्थ असले की कामातही लक्ष लागत नाही.  आईचे असेच झाले असेल.'


काम करताना विद्या विचार करत होती.

 विद्याला अभ्यासाची आवड होती पण त्याबरोबर ती घरातील कामही आवडीने करत असायची. लहानपणापासून आईला कामात मदत करायची. काम करण्याची सवय असल्याने आता तिला काम करण्याचे टेन्शन आले नव्हते.


 जमलेली भांडी धुतली.  दोरीवरचे वाळलेले कपडे काढून घड्या केल्या. बागेतील झाडांना पाणी घातले. देवासमोर दिवा लावला.

 जेवण बनवण्यासाठी घरात भाजी दिसली नाही. बटाटे तेवढे दिसले. तिने बटाट्याची भाजी केली व चपात्या करू लागली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. चपात्या करता करता तिने दरवाजा उघडला. दारात शेजारच्या काकू होत्या.

"तू कधी आली? आई कुठे आहे?"

 असे म्हणत काकू घरात आल्या.

"काकू, मी आजच आली. दोन-तीन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून घरी आली. आई-बाबा  गावी गेलेत."

 विद्याने काकूंना सांगितले.

 "गावाला असे अचानक का गेले? मला काही सांगितले नाही गावी जाणार आहे असे?"

 काकूंनी काळजीने विचारले.


"काही काम निघाले म्हणून गेले. माझे पण बोलले नाही झाले त्यांच्याशी. मी आली व ते गेले."


 विद्याने शांत चेहरा ठेवत सांगितले.


'आपण यांना खरे कारण सांगितले असते तर  यांनी सर्वीकडे ही बातमी पसरवली असती. उगाच आईबाबांना  त्रास झाला असता. 

त्यामुळे काकूंशी खोटे बोलावे लागले.'

 विद्या मनात  विचार करत होती.

 "विद्या, तू किती छान चपात्या करतेस गं! माझ्या मुलीला स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा आहे. घरातील काम नकोच तिला. मुलींना घरातील  कामे यायलाच हवी.  तुझ्या आईला तुझे काही टेन्शन नाही बाई. लग्न करून ज्या घरी जाशील तिथे सुखात ठेवशील सर्वांना."

 काकू विद्याचे कौतुक करत म्हणाल्या.


"काकू, जेवण करून जा आता. बटाट्याची भाजी व चपाती बनवली आहे."

 विद्या आनंदाने म्हणाली.

 "माझे जेवण झाले आहे. मी सहजच तुझ्या आईला भेटायला आली होती.  तू कर जेवण. येते मी."

 असे म्हणत काकू घरी गेल्या.

 काकूंनी  लग्नाचा विषय काढताच, विद्या विचार करू लागली.


 'स्मिता  एका मुलाबरोबर पळून गेली. आता विनयचे लग्न कोणाबरोबर होईल?  विनय पहिल्याच भेटीत आपल्याला आवडला होता.  त्याच्यावर प्रेमही जडले होते. पण आता अशा टेन्शनच्या परिस्थितीत घरातील लोकांना हे कसे सांगावे? त्याच्याशी माझे लग्न होऊ शकते का?'


क्रमश:

नलिनी बहाळकर





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...