डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आणि देवाची कृपा यामुळे बाळ मृत्यूच्या दाराशी जाऊन बरे होऊन परत आले होते . आणि हा आनंद कसा व्यक्त करावा ? हे नीलमच्या भावाला कळत नव्हते. बायको आणि बाळाच्या जाण्याने त्याचे मन दुःखी होते.
' आज बाळाची आई असती तर ! ...तिला किती आनंद झाला असता ! ....
आज घरी किती आनंदाचे, उत्सवाचे वातावरण राहिले असते! ज्या क्षणांची आम्ही इतकी वर्षे वाट पाहत होतो. तो क्षण आला होता. आईबाबा होण्याचे स्वप्न आम्ही दोघांनी पाहिले होते... आज आमचे बाळ बरे होऊन घरी येत आहे म्हणून एका डोळ्यात आनंदाचे अश्रू तर बाळाला जन्म देणारी आईच त्याच्या जवळ नाही म्हणून दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ..
मला बाबा म्हणायला माझे बाळ माझ्याजवळ आहे पण ....त्या बाळाला नऊ महिने जपणारी त्याची आई त्याला आईचे प्रेम न देताच चालली गेली...
आता त्याला आईचे प्रेम कोण देईल ? कोण घेईल त्याची आईप्रमाणे काळजी ? '
या विचारात तो असताना नीलमने त्याला आवाज दिला.
" दादा,आज बाळाला घरी आणायचे आहे ना ?"
नीलमचा भाऊ - " हो , हो चल , हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण आणि बाळाला घरी घेऊन येऊ."
बाळ सुखरूप घरी आल्याचे पाहून नीलमच्या आईबाबांना, भावाला आणि नीलमला आनंद तर होत होता पण रडू ही येत होते. वहिनी आणि बाळासाठी सर्वांना रडू येत होते.
नीलमच्या आईची तब्येत पाहता तिच्याकडून बाळाची काळजी घेणे वगैरे शक्य नव्हते. समजा बाळाला सांभाळायला बाई लावली तरी ती आईसारखे सांभाळू शकणार नव्हती आणि भाऊ बाळासासाठी अशी रिस्क घेणार नव्हता.
वहिनीला आई नव्हतीच आणि इतर नातेवाईकांनी तर अगोदरच हात वर करून दिले होते. बाळाला कसे सांभाळायचे ? '
असे विचार नीलमच्या भावाच्या मनात सुरू होते.
नीलम व सचिन ने बाळाला सांभाळण्याचे सांगताच नीलमच्या भावाला आनंद तर झाला पण थोडा आश्चर्याचा धक्काच बसला. आई वडिलांना देखील संकोचल्यासारखे झाले.
नीलमने सचिनबरोबर लग्न केले म्हणून त्यांना घरात घेतले नाही .जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा त्यांना मदत केली नाही उलट त्यांच्याशी नातेसंबंध तोडून टाकले.
आणि आज आपल्या संकटकाळात तेच आपल्याला मदत करीत आहे.
असे आईबाबांना आणि भावाला वाटू लागले.
" नीलम,सचिनराव आम्हांला माफ करा.. आम्ही तुमच्याशी असे वागायला नको होते...
देव आम्हांला आमच्या कर्माची शिक्षा देतो आहे का!
तुम्ही आईविना बाळाला सांभाळायची जबाबदारी घेतली ...तुमचे खूप खूप धन्यवाद.. तुमचे खूप उपकार आणि तुमचे धन्यवाद करायला शब्दही अपूर्ण आहेत."
नीलमचे आईबाबा म्हणाले.
नीलम - " आई- बाबा , तुम्हांला त्यावेळी जे योग्य वाटले ते तुम्ही केले. माझा माझ्या सचिनवर ,माझ्या प्रेमावर विश्वास होता. मी काहीही चुकीचे करत नव्हते . माझा सचिन खूप चांगला आहे आणि त्यावेळी मी घेतलेला निर्णय ही योग्यच होता. हे तुम्हांला एक दिवस पटवून द्यायचे होते,सिद्ध करून दाखवायचे होते... तुम्हांला सर्वांना मला आनंदात पाहयचे होते. आपण सर्वांनी पुन्हा एकत्र यावे असे मला नेहमी वाटायचे पण देवाने आज कोणत्या प्रसंगाने आपल्याला एकत्र आणले ?
आनंदाच्या ऐवजी दुःखाचा प्रसंग !
आईविना बाळाकडे पाहून खूप वाईट वाटते आहे. त्याला मी त्याच्या आईचे प्रेम तर नाही देऊ शकणार पण माझ्या परीने त्याची काळजी घेईल. बाळाला सांभाळून मी तुमच्यावर उपकार वगैरे नाही करत आहे..
आईवडिलांची मुलगी म्हणून आणि भावाची बहिण म्हणून माझे कर्तव्यच समजत आहे."
नीलमच्या बोलण्यातून माहेराबद्दल ,आपल्या आईवडीलांबद्दल आणि भावाविषयी असलेली तिची तळमळ,प्रेम ,तिची निःस्वार्थ भावना पाहून आईवडिलांना ती आपली मुलगी असल्याचा अभिमान वाटला. वंशाचा दिवा म्हणून लोक आपल्याला एक तरी मुलगा पाहिजे असे म्हणतात पण आईवडिलांचे दुःख समजून त्यांच्या दुःखात मदतीला धावून येणारी,त्यांच्या वर निःस्वार्थ प्रेम करणारी एक तरी मुलगी हवीच असे नीलमच्या आईवडिलांना वाटू लागले.
आणि आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी लगेच तयार झालेली आपली बहिण पाहून नीलमच्या भावाला तर वाटलेच 'आईनंतर आपल्या वर प्रेम करणारी आपली जवळची व्यक्ती म्हणजे आपली बहिणच असते. आपण खरचं भाग्यवान आहोत . कारण आपल्याला नीलम सारखी बहिण मिळाली .'
नीलम व सचिन बाळाला आपल्या घरी घेवून आले.
नीलमच्या आईवडिलांप्रमाणे सचिनच्या आईबाबांनीही त्यांच्याशी संबंध तोडले होते. फक्त दोघेच एकमेकांसाठी जगत होते. नोकरी, घर वगैरे गोष्टी व्यवस्थित सेट झाल्या की मग आईबाबा होऊ असे दोघांनी ठरविले होते . त्यामुळे ते अजून आईबाबा झालेले नव्हते.
त्यामुळे नीलमला 'बाळाची काळजी कशी घ्यावी ?' याचा काही अनुभव नव्हता.
बाळाला घरी आणल्यावर त्याची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. अनुभव नाही, काही तयारी नाही आणि अचानक बाळाला सांभाळण्याची जबाबदारी म्हणजे थोडे अवघडच होते... पण नीलम व सचिन दोघांनी बाळाला सांभाळायचे मनापासून ठरविले होते त्यामुळे अनुभवी लोकांना विचारुन त्याप्रमाणे व्यवस्थित बाळाची काळजी ते घेऊ लागले होते.
बाळ आपल्या
बहिणीच्याच घरी आहे त्यामुळे नीलमच्या भावाला आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जाईल असे वाटत होते. त्याला आईचे प्रेम नाही मिळाले पण आत्याच्या रूपात आईचे प्रेम मिळत आहे असे त्याला वाटायचे.
त्याला बाळाची आठवण यायची. फोन करून विचारपूस करायचा. अधूनमधून भेटायला ही जायचा. बाळाची आई तर नाही पण त्याला वडिलांचेही प्रेम कधी कधीच मिळायचे....
बिचारे बाळ ... त्याला तर माहितही नव्हते ..आपले आई - बाबा कोण आहेत ? जी आपली काळजी घेते आहे ती आई आहे की आत्या ?
दुःखाचे सात्वन करण्यासाठी येणाऱ्या लोकांनी नीलमच्या भावाला दुसरे लग्न लवकर करण्याचे सांगितले कारण बाळ बहिणीकडेच मोठा झाला तर तो इकडे येणारच नाही ...त्यामुळे आता त्याला काही समजत नाही तोपर्यंत लग्न केले तर तो नवीन आईला आई समजेल वगैरे वगैरे ...
भावाला वहिनीची खूप आठवण यायची. 'दुसरे लग्न' या विचाराने तो अस्वस्थ व्हायचा.
पण बाळासाठी दुसरे लग्न करणे ही गरजेचे होते. नीलम जरी बाळाची मनापासून काळजी घेत असली तरी आपल्यामुळे तिला त्रास नको ...
आणि म्हणून दुसऱ्या लग्नासाठी त्याने योग्य असे स्थळ शोधण्याचे काम सुरू केले.
हे काम सुरु असताना
त्याला अनेक प्रकारचे अनुभव आले.
आता दुसरे लग्न आणि मुली शोधणे म्हणजे घटस्फोटीत वगैरे च ...
नातेवाईक, ओळखीतील लोक स्थळे सुचवायचे .
पण त्यांच्या अटी वगैरे ही वेगळ्या होत्या.
त्या लग्न करायला तयार होत्या पण ...
बाळाची काळजी घेण्यासाठी बाई ठेवावी.
असे म्हणणाऱ्या होत्या.
तर काही बाळ सांभाळायला तयार होत्या पण त्यांना सासू सासरे नको होते. वेगळे घर करून राहयचे .असे म्हणणे असायचे.
असे अनेक अनुभव येत होते.
पण नीलमच्या भावाला अशी मुलगी हवी होती जी बाळाला आईचे प्रेम देईल व आईवडिलांना ही सांभाळेल . त्यामुळे त्याने ठरविले होते वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला हवी तशी मुलगी मिळाल्याशिवाय लग्न करायचे नाही.
इकडे नीलमकडे, बाळ घरी आल्यापासून दोघांच्या जीवनात आनंद आला होता. लग्न झाल्यापासून माहेर,सासर परके झाले होते त्यामुळे त्यांना वाईटही वाटायचे ...
पण आता बाळामुळे त्यांच्या आयुष्यात प्रसन्नता आली होती.
बाळाची काळजी घेण्यास नीलमला आनंद वाटायचा. काम संपताच बाळाच्या ओढीने घरी केव्हा जाऊ ? असे सचिनलाही वाटायचे.
बाळाला घरी आणल्याच्या त्यांच्या निर्णयामुळे अनेक जणांना खूप चांगले वाटले. त्यांनी दोघांचे कौतुक ही केले.
तर अनेकांनी अनेक सल्ले दिले...
'बाळाला दत्तक देवून द्या. एखाद्या अनाथाश्रमात देवून या. तुम्ही आता त्याला आईवडिलांचे प्रेम देत आहात पण तो त्याच्या वडिलांकडे गेल्यावर तुम्हांला विचारणारही नाही...'
असे खूप खूप सल्ले फुकटात मिळायचे पण नीलम व सचिन अशा सल्ल्यांना कधी बळी पडले नाही. बाळ त्याच्या वडिलांकडे गेला तर आपल्याला आनंदच आहे कारण भावाला वहिनीची आठवण म्हणून बाळच तर आहे..
पण जोपर्यंत बाळ आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत राहू. असे नीलमने व सचिनने ठरविलेले होते . त्यांनी बारशाचा घरगुतीच पण छान कार्यक्रम केला आणि बाळाचे नाव 'ओजस' ठेवले. वहिनीने आणि भावाने ठरविलेले नाव....
असेच दिवस जात होते. ओजसची तब्येत छान होत होती. नीलम व सचिनच्या व्यवस्थित काळजी घेण्यामुळे बाळ छान आणि गुटगुटीत दिसायला लागले होते.
भावालाही हवी तशी मुलगी लग्नासाठी भेटली होती. तिचे अगोदर एक लग्न झालेले होते पण नवरा व्यसनी होता म्हणून घटस्फोट घेऊन माहेरी राहत होती. तिला एक मुलगी ही होती. तिला तर दुसरे लग्न करावे असे वाटतच नव्हते. पहिल्या लग्नाचा असा अनुभव आल्याने पुन्हा तशी रिस्क घ्यायला ती तयार नव्हती.
पण तिच्या घरातील सर्वांना नीलमचा भाऊ खूप आवडला आणि त्यांनी तिला समजावून सांगितले. ती जेव्हा प्रत्यक्ष नीलमच्या भावाशी बोलली तेव्हा ती लग्नाला तयार झाली. तिच्या मुलीला वडिलांचे प्रेम मिळणार होते आणि ओजसला आईचे प्रेम मिळणार होते.
लग्न झाल्यानंतर लगेचच वहिनीला बाळाची जबाबदारी नको. वहिनीला घरात थोडे ऍडजस्ट होऊ द्यावे म्हणून नीलमने ओजसला अजून काही दिवस आपल्या घरीच राहू दिले.
त्याचा पहिला वाढदिवस करूनच पाठवू असे तिने ठरविले.
भावाचे लग्न झाले. त्याला अपेक्षेप्रमाणे बायकोही मिळाली. काही दिवसांनी ओजसही त्याच्या घरी जाणार. ओजसला आजी-आजोबा, आई-बाबा,बहिण या सर्वांचे प्रेम मिळणार . ओजसचे हसणे,बोबडे बोलणे ,त्याच्या सर्व बाललीला त्यांना अनुभवता येतील .
या विचारांनी नीलमला आनंद होत होता.
पण ओजस त्याच्या घरी गेल्यावर ...आपले काय होईल? सचिनला व मला बाळाचा किती लळा लागला आहे. त्याचे सर्व करण्यात दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे कळत नव्हते. मी त्याला जन्म नाही दिला.कदाचित आईचे प्रेमही नाही देवू शकले. कारण आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
पण तरीही त्याचे जेही काही केले ते अगदी मनापासून...
आईचे दूध आणि आईची ऊब सोडली तर सर्व काही मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला.
आणि आता तोही मला,सचिनला चांगले ओळखायला लागला होता...
आपल्यापासून दूर गेल्यावर त्यालाही त्रास होईल का? तो त्याच्या घरी गेल्यावर आपल्याशिवाय राहील ना ?
अशा अनेक विचारांनी तिचे मन दुःखी व्हायचे.
बघता बघता ओजस एक वर्षाचा झाला.
ठरविल्याप्रमाणे नीलमने ओजसचा वाढदिवस आपल्या घरी केला. तिचे आईवडील, भाऊ,नवी वहिनी , तिची मुलगी हे ही सर्व आले होते.
ओजस एक - दोन शब्द बोलायला लागला होता.,रांगत होता. त्याच्या सर्व बाललीला, सर्व आठवणी नीलम फोटो रूपात जपून ठेवत होती.
ओजसला आईची सवय व्हावी म्हणून नीलमची वहिनी काही दिवस नीलमकडे राहिली. ओजसला त्याची आई खाऊ पिऊ घालू लागली. पण नीलम जरा वेळ दिसली नाही की तो रडायचा.
शेवटी ओजसचा आपल्या घरी ,आपल्या आईबाबांकडे जाण्याचा दिवस उगवला आणि नीलमला तर बाळाने जाऊच नये असे वाटायला लागले.
भाऊ वहिनी जेव्हा ओजसला घेऊन जात होते तेव्हा नीलमही रडत होती आणि ओजसही रडत होता.
भाऊवहिनीला आणि सचिनलाही नीलमची व ओजसची परिस्थिती पाहून वाईट वाटत होते.
पण सचिनने ,भावाने नीलमला धीर दिला,समजावून सांगितले .
भाऊ नीलमला म्हणाला- " नीलम , ओजस वर तुझा पूर्ण अधिकार आहे गं. ..तुझ्यामुळेच माझे बाळ,माझा ओजस माझ्या जवळ आहे. तुझे उपकार मी कधीही विसरू शकत नाही."
नीलम - "दादा, मला देवाने जशी बुद्धी दिली तशी मी वागत गेले. देवच सर्व घडवून आणत असतो. आपण फक्त निमित्तमात्र असतो. आता तुम्ही ओजसची छान काळजी घ्या. ...सुखाचा संसार करा ."
ओजस आपल्या घरी आल्यानंतर आजारी पडला . त्याच्या आईने त्याची खूप काळजी घेतली. मग हळूहळू तो घरात रूळायला लागला.
नीलमही ओजसच्या आठवणीत आजारी पडली. ओजस हळूहळू आईबाबा, आजीआजोबा यांच्यात रमला हे पाहून तिला हायसे वाटले आणि आनंदही झाला.
काही महिन्यांनी नीलमला आई होण्याची चाहूल लागली आणि तिने ही आनंदाची बातमी माहेरी सांगताच सर्वांना खूप आनंद झाला.
सचिन व नीलम आपल्या येणाऱ्या बाळाचे स्वप्न पाहू लागले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.