भारत आणि आध्यात्म यांचा आजचा नाही तर फार फार पूर्वीपासूनचा संबंध. 'चार धाम यात्रा करणे ' या गोष्टीला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचे मानले जाते.
धाम म्हणजे ठिकाण. बद्रीनाथ, जगन्नाथपुरी,रामेश्वर आणि द्वारका येथे श्रीविष्णूंचे वास्तव्य होते. म्हणून या ठिकाणांना महत्त्वाचे तीर्थस्थान, धाम मानले जाते.
या चार ठिकाणी श्रीविष्णूंना वेगवेगळ्या रूपात पूजले जाते.
ही चार ठिकाणे मुख्य चार धाम तर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमनोत्री ही छोटी चार धाम आहेत.
लहानपणापासून ते आतापर्यंत ऐकत आले आहे की चार धाम यात्रा केल्याने पुण्य मिळते. सर्व पापांचा नाश होतो. जन्माला येऊन चार धाम यात्रा केली तर आयुष्याचे सार्थकी होते.अशा अनेक गोष्टी वडीलधाऱ्या व अनुभवी लोकांकडून ऐकण्यात येतात. ही यात्रा करणे प्रत्येकाला शक्य नसते कारण शारीरिक, मानसिक आणि इतर अनेक अडचणी येत असतात. नशिबात असेल तरच यात्रा व्यवस्थित होते असेही म्हणतात. त्यामुळे जे लोक ही यात्रा सुखरूप पूर्ण करून घरी येतात , त्यांचे पूजन केले जाते. खूप मोठे दिव्य पार केले. अशी त्यांच्याबद्दल भावना असते.
पवित्र तीर्थस्थानी जाऊन देवाचे दर्शन घेणे आणि तेही खूप खडतर मार्गाने प्रवास करून,वेगवेगळ्या अडचणींवर मात करून जाणे म्हणजे देवाला भेटून देवस्वरूप झाल्यासारखेचं!
जेव्हा कोणी चार धाम यात्रा करून आले की त्यांना भेटल्यानंतर आनंद होतो.
मला कधीही वाटले नव्हते की माझ्या आयुष्यात चार धाम यात्रा करण्याचा योग येईल.
पण...
ज्या गोष्टींची मनात इच्छा असल्यावर ती जेव्हा पूर्ण होते; तेव्हा आनंद होतोच पण त्यापेक्षाही कितीतरी पटीने आनंद तेव्हा होतो जेव्हा आपल्याला अनपेक्षित यश मिळते,सुख मिळते किंवा काहीतरी चांगले घडते.
सात,आठ वर्षांपूर्वी मला छोट्या चार धाम यात्रेला जाण्याची संधी मिळाली होती. पण काही कारणास्तव मी जाऊ शकले नाही. कदाचित तेव्हा योग नसावा जाण्याचा...
'चार धाम यात्रेला यायचे आहे का ? ' असे जेव्हा मला विचारण्यात आले तेव्हा माझ्या तोंडून पटकन 'हो' आले.
यात्रेला जाण्याअगोदर 3,4 महिन्यांपूर्वी जाण्याचे रिझर्वेशन करण्यासाठी विचारले होते. तेव्हा मी पटकन तयार झाले.
मी ऐकलेले होते की , ही यात्रा इतकी सोपी नाही. शारीरिक आणि मानसिक तयारीनिशी जावे लागते. त्यात मी हार्ट पेशंट त्यामुळे मनात भीती होतीच. पण जे होईल ते..पुढे बघू. आपण जाऊ या . असे ठरविले.
जाण्याच्या तारखेच्या दहा,बारा दिवस अगोदर मी,माझा मुलगा व माझे पती आम्ही तिघेही आजारी पडलो. ४,५ दिवसांत मुलाला व यांना बरे वाटू लागले. पण मला अजूनही बरे वाटत नव्हते. खूप अशक्तपणा जाणवत होता. घरातील कामेही करू शकत नव्हती. चालण्याचेही बळ नव्हते. माझी ही अवस्था पाहून यात्रेला जाण्याचे तिकिट कॅन्सल करावे . असा विचारही आला...
आणि त्यामुळे यात्रेला जाण्याची जी तयारी करावी लागते तीही आम्ही केली नाही.
देवाचे आशिर्वाद, औषधोपचार आणि माझ्या मनाने केलेली तयारी, यामुळे की काय ? यात्रेला जाण्याच्या दोन दिवस अगोदर मला थोडे बरे वाटायला लागले. आणि आम्ही फक्त एका दिवसात सर्व तयारीही केली.
आणि आम्ही हरिद्वार एक्सप्रेस ने चार धाम प्रवासास निघालो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.