"अहो,राधा काकूंनी आपल्या हर्षासाठी एक स्थळ सूचवलं आहे. त्यांच्या बहीणीची मुलगी सीमा, तिचा दीर आहे . सीमा खूप सुखात आहे. असे राधा काकू म्हणत होत्या. मुलगा ओळखीतील आहे त्यामुळे आपल्याला जास्त काळजी करण्याची गरज नाही ,असेही त्या सांगत होत्या. करायची का आपण तिथे हर्षासाठी लग्नाची बोलणी? "
उषाताई आपल्या पतीला म्हणाल्या.
" अगोदर सीमाशी व्यवस्थित बोलू मग पुढचे काय ते ठरवू .."
हर्षाचे वडील तिच्या आईला म्हणाले.
सीमाने जेव्हा ती सासरी खूप सुखात आहे,माणसेही चांगली आहेत,सर्व काही व्यवस्थित आहे, हर्षाला काहीही त्रास होणार नाही. आम्ही दोघी आनंदाने राहू . एवढे सर्व सांगितले आणि हर्षाच्या आईवडिलांना मुलगा,इतर माणसे ही बरी वाटली तेव्हा त्यांनी हर्षाचे लग्न ठरविले.
हर्षा ही साधी,सरळ व आपल्यापेक्षा इतरांचा विचार करणारी होती. अभ्यासात ही हुशार होती. चांगले शिक्षण घेऊन नोकरी करण्याची तिची इच्छा होती.पण शिक्षण पूर्ण होताच आईवडिलांनी तिच्या लग्नाचा विषय काढला. तिचे लग्न व्हावे ही आईवडिलांची इच्छा यामुळे तीही लग्नाला तयार झाली.आपली मुलगी साधी,सरळ स्वभावाची. कोणाचेही मन दुखावेल असे ती वागत नाही. इतरांच्या सुखांना महत्त्व देणारी आहे. पण तिला खोटारडेपणा, विश्वासघात या गोष्टी अजिबात आवडत नाही. ती स्वतः कधी कोणाशी असे करत नाही त्यामुळे साहजिकच समोरच्या व्यक्तीने जर विश्वासघात केला, खोटारडेपणा केला तर ती बोलल्याशिवाय राहत नव्हती. प्रसंगी ती आपले म्हणणे पटवून देण्यासाठी वाद विवादही करते.
आपल्या मुलीच्या या स्वभावाची आईवडिलांना जाणीव होती. सासरी सर्वच लोक सारखी नसतात. एखादी व्यक्ती अशी असतेच, जी आपल्याला त्रास देते. सासरी आपल्या मुलीला काही त्रास होऊ नये किंवा तिच्या वागण्याचा कोणाला त्रास होणार नाही यासाठी हर्षाच्या आईवडिलांनी तिला सर्व समजावून सांगितले. सासरी सर्वांशी प्रेमाने,आदराने वागायचे,कोणाला वाईट वाटेल असे बोलायचे नाही. असे सर्व सांगून आईवडिलांचे कर्तव्य पूर्ण करीत होते.
हर्षाने आपल्या आईवडिलांनी सांगितलेले हे सर्व लक्षात ठेवले. आईवडिलांवर तिचे खूप प्रेम होते त्यामुळे आईवडिलांच्या इच्छेसाठी नोकरी करण्याची आपली इच्छा मनात ठेवूनच ती लग्नाला तयार झाली.
सीमाच्या मध्यस्थीने पाहण्याचा कार्यक्रम वगैरे छान झाला. तिकडच्या लोकांना हर्षा आवडली होती. हर्षाच्या आईवडिलांना ही मुलगा आवडला होता. पण मुलाला पाहून हर्षाच्या मनाने पाहिजे तसा तिला कौल दिला नव्हता. म्हणजे जी एक वेगळीचं फिलिंग वाटायला हवी होती, ती वाटत नव्हती. आईवडिलांना आवडले आणि बाकी सर्व काही छान आहे , तर आपण नकार तरी कोणत्या गोष्टीसाठी दयायचा . त्यामुळे तिनेही लग्नाला संमती दिली.
लग्नाची तारीख खूप जवळची आणि खूप उशीराची निघत होती. त्यामुळे सासरच्या लोकांनी जवळची तारीखच ठरवू . असे सांगितले.
लग्नाच्या तयारीला कमी दिवस मिळत होते, पण तरीही दिवसरात्र एक करून दोघी कडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागले होते. हर्षाही आपली सर्व तयारी करत होती. कमी वेळात जास्त काम यामुळे खूप टेंशन येत होते. या सर्व धावपळीमुळे हर्षाचे व तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे कधी भेटणेही झाले नाही आणि फोनवरही जास्त बोलणे होत नव्हते. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यास त्यांना वेळही मिळाला नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.