"पवार ताई, तुमच्या ओळखीत कोणी मुलगी असेल तर सांगा हो, आमच्या योगेशसाठी. "
योगेशची आई पवार ताईंना सांगत होती. योगेशची आई आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी मिळावी यासाठी खूप प्रयत्न करत होती. अनेकांना विचारत होती,सांगत होती .
मुली सांगूनही येत होत्या. पण त्यांना गाव नको होते. प्रत्येकीला शहरात राहणारा नवरा हवा होता.काही लग्नासाठी तयारही होत्या पण योगेशने शहरात राहवे या अटीवर.
योगेश गावात राहत असला तरी, चांगले शिक्षण घेतलेले होते, दिसायलाही चांगला होता. गावात वडिलोपार्जित शेती,जमीनजुमला व किराणा चे मोठे दुकान होते आणि त्यापासून चांगले उत्पन्नही मिळत होते. घरचा चांगला व्यवसाय असताना नोकरी करणे योगेशला पटत नव्हते.
सर्व सुखसोयी असलेले घरही गावात बांधलेले होते.
सर्व काही चांगले होते फक्त प्रतिक्षा होती , चांगल्या जीवनसाथीची!
आपले घर, व्यवसाय व आईवडील यांना सोडून योगेश शहरात जायला तयार नव्हता. त्यामुळे त्यानेही अनेक मुलींना नाकारले होते.
आज योगेशसारखे अनेक मुले असतात, ज्यांना लग्नासाठी मुली मिळण्यास अडचणी येतात.
कारण का, तर ते शहरात नाही तर गावात राहतात म्हणून.
पूर्वी मुलींच्याही व मुलांच्याही बाबतीत, लग्नासाठी इतक्या अडचणी येत नव्हत्या,जितक्या आता येत असतात.
मुलगा कसा आहे? शिक्षण वगैरे या गोष्टींपेक्षा मुलगा कमवता हवा हे पाहिले जात होते व मुलीला घरकाम करता येते का ? एवढे पाहिले जात होते.
आईवडिलांनी ठरविलेल्या मुलामुलीशीच लग्न होत होते..
पण आता काळ बदलला, मुलींची शिक्षणात प्रगती झाली. सर्व क्षेत्रात मुली मुलांपेक्षा सरस ठरू लागल्या.मुली परावलंबी न राहता स्वावलंबी बनत गेल्या.
पुरूषांकडून स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकाराने होणारा अन्याय, अत्याचार, छळ रोखण्यासाठी स्त्रियांच्या रक्षणासाठी कायदे निघाले, महिला आयोगाची स्थापना झाली. वेगवेगळे NGO स्त्रियांच्या अधिकारांसाठी काम करू लागल्या. त्यामुळे स्त्रियांना अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळत गेली.त्या अबला न राहता सबला होत गेल्या. व प्रत्येकीत आत्मविश्वास निर्माण होत गेला.
'स्त्री- पुरुष समानता' असे करता करता बाजू पलटू लागली. अगोदर स्त्रिया पीडित, शोषित होत्या व पुरूष शोषण करणारे होते. आता काही ठिकाणी पुरूष दुःखी,पीडित होऊ लागले.
खूप प्रयत्नानंतर योगेशला लग्नासाठी मुलगी मिळाली जी त्याच्याबरोबर गावात राहण्यास तयार होती.
योगेशबरोबर त्याच्या घरातील सर्वांना खूप आनंद झाला. व योगेशचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नाचा सर्व खर्च योगेशच्या घरच्यांनी केला होता, त्या अटीवरच लग्न ठरले होते.
योगेशची पत्नी जया, ही तीन बहीणीतील तिसरी व तिच्या नंतर एक भाऊ. वडिलांची परिस्थिती साधारण होती . मुलींना जास्त शिकवू शकले नाही. कॉलेजला असतानाच दोन्ही मुलींचे लग्न केले .
समाजात मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने,मुलाकडील परिस्थिती चांगली असली की, मुलींचे आईवडील लग्नाचा काहीही खर्च न करता मुलींचे लग्न लावून देतात. जयाच्या दोन्ही बहिणींचेही असेच लग्न झाले होते.
पूर्वी मुली म्हणजे हुंडा, लग्नाची जबाबदारी यामुळे मुलीपेक्षा मुलगाच हवा असे आईवडिलांना वाटत होते.
पण आता सर्व चित्र पालटले आहे. मुली म्हणजे जबाबदारी असे न राहता मुली म्हणजे जीवनाचा आधार! असे झाले आहे.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.