"शुभदा,काय झाले गं? पहिल्यासारखी तू आनंदी राहत नाही.छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवते,चिडते. काय झाले असे ? "
प्रमोदने शुभदाला म्हणजे त्याच्या पत्नीला विचारले.
"काही नाही हो, प्रिया आपल्या घरात आल्यापासून आईंचे वागणे बदलून गेले आहे. आता तुम्ही म्हणाल, ती या घरात नवी आहे. त्यामुळे आई तिच्याशी तशा वागत असतील . सुरूवातीला मलाही तेचं वाटत होतं. म्हणून मला काही वाईट वाटले नाही. पण आता जास्तचं व्हायला लागले त्यामुळे मला आता आईंच्या वागण्याचा राग येत आहे.
तुम्हांला मी आईंबद्दल काही सांगितले तर, तुम्ही मलाच चुकीचे ठरवणार. आई कुठे चुकतेय ? का चुकतेय? हे तुम्हांला मी सांगितल्याशिवाय कळणार नाही. कारण 'आपली आई कधीचं चुकत नाही.' असे प्रत्येक मुलाला वाटत असते. आणि तुम्हांला ही असेचं वाटणार. "
शुभदा प्रमोदला म्हणाली.
"अगं, काय झाले ते स्पष्ट सांग ना . तू काय बोलते आणि आईबद्दल असे का बोलते आहे , ते काहीचं कळत नाही आहे. जे काही तुझ्या मनात असेल ते मनमोकळेपणाने सांग. तुझे मनही हलके होईल आणि जो काही प्रॉब्लेम असेल त्यावर उपायही शोधता येईल."
प्रमोद शुभदाला म्हणाला.
"अहो, मला आईंची तक्रार नाही करायची पण त्यांच्या वागण्यात जो बदल झाला आहे ना त्याचे मला वाईट वाटते आहे. आपले लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी कधी तुम्हांला त्यांच्याबद्दल काही बोलले का ? मी लग्न करून या घरात आले, तेव्हा आईंनी मला किती समजून घेतले,सांभाळून घेतले. आणि मी पण त्यांनी हक्काने मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली.त्यांनी दिलेल्या स्वयंपाकातील टिप्स मला खूप उपयोगाच्या ठरत आहे. आपल्या घरातील सणावाराच्या पद्धती त्यांनी समजून सांगितल्या आणि त्याप्रमाणे मी करू लागले. लग्नाअगोदर सासू नावाबद्दल जी भीती होती ,ती त्यांच्या बाबतीत कधी वाटली नाही. मी स्वतः ला खूप भाग्यवान समजत होते. पण माझे हे सुख विपुल भाऊजींचे लग्न होताच दुःखात रूपांतरित झाले. असेच वाटायला लागले आहे.
विपुल भाऊजींचे लग्न झाल्यावर सासूबाईंना अजून एक सून व मला जाऊ येईल यामुळे मी खूप खूश होते.पण प्रिया घरात आली आणि आईंचे माझ्याबद्दलचे मतपरिवर्तन सुरू झाले.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.