"अभिनंदन अजय...अभिनंदन अजय सर .." अभिनंदनासाठी येणारे फोन,मेसेजेस यामुळे अजयला खूप आनंद झाला होता पण त्याहूनही 'एक यशस्वी उद्योजक' म्हणून आपल्याला पुरस्कार मिळाला ,आपला सन्मान झाला. याचा जास्त आनंद त्याला झाला होता.
आज आपण या पुरस्काराचे मानकरी ठरलो. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासही काही सोपा नव्हता.
व्यक्ती कठीण परिस्थितीवर मात करून जीवनात जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा मिळणाऱ्या यशाचा आनंद होतोच पण त्यासाठी केलेला खडतर प्रवासही नेहमीच लक्षात राहतो.
अजयच्या आयुष्यातही असेच काहीसे झाले होते. आज जरी अजयची 'एक यशस्वी उद्योजक' म्हणून ओळख निर्माण झाली असली; तरी त्याचा भूतकाळ खूप कठीण होता. परिस्थिती खूप वाईट होती.
आज अजयला आपला सर्व जीवनप्रवास आठवत होता.
निसर्गाच्या कुशीत वसलेले त्याच गाव,गावात बहुतेक लोकांचा व्यवसाय शेती व पशुपालन होता. ज्यांच्या कडे शेती नव्हती व इतर काही व्यवसायही नव्हता ते लोक इतरांच्या शेतात कामाला जात. आणि काही लोक शहरात कामासाठी जात होते.
अजयच्या वडिलांचा वडिलोपार्जित सावकारीचा व्यवसाय होता.
सावकारी ( Money lending) म्हणजे गरजू लोकांना पैसे देवून मदत करणे. पण त्या मोबदल्यात दिलेल्या रकमेवर ( capital) व्याज( interest) घेणे. दिलेली रक्कम (capital) परत मिळेपर्यंत त्या व्यक्तिकडून व्याज (interest) घेत राहणे. आणि ते व्याज(interest) ती व्यक्ती(debtor) देवू शकली नाही तर , त्या व्याजाच्या रकमेवरही पुन्हा व्याज ( interest) लागते त्याला चक्रवाढव्याज( compound interest) म्हणतात.
कर्ज( loan) घेणाऱ्या व्यक्तीवर विश्वास नसेल किंवा तो आपली रक्कम देवू शकणार नाही असे वाटत असल्यास.. सावकार( money lender) रक्कम देताना त्या व्यक्तिकडून तेवढ्या किमतीची किंवा त्याहून जास्त किमतीची वस्तू गहाण(mortgage) ठेवून घेतो.
कर्जफेडीच्या शाश्वतीसाठी एखाद्या विशिष्ट मिळकतीतील हक्क तारण(mortgage) ठेवणे. तारणाची रक्कम स्थावर किंवा जंगम असू शकते.
तारण ठेवणे म्हणजे ती वस्तू कागदोपत्री कर्ज देणाऱ्याकडे(lender) असते आणि कर्जदार ( debtor)त्या वस्तूचा उपयोग करू शकतो.
पण गहाण ठेवणे यात वस्तू कर्ज देणाऱ्याकडेच राहते.कर्जदार ती वापरू शकत नाही.
कर्ज फेडल्यानंतरच तारण ठेवलेली व गहाण ठेवलेली वस्तू पूर्णपणे कर्जदाराच्या मालकीची होते.
आपल्या देशात गरीब व श्रीमंत अशी खूप मोठी दरी पूर्वीपासूनच आहे.एकीकडे पोट भरण्यासाठी, जिंंवत राहण्यासाठी कर्ज(loan) काढणारे लोक आहेत तर दुसरीकडे गरीबांच्या जीवावर पैसे कमावणारेही आहेत.
कर्ज(loan) हे गरीबासाठी शाप आहे तर सावकारांसाठी ते वरदान ठरते.
वडिलांच्या सावकारी व्यवसायामुळे आणि तसेच शेती,जमीनजुमला वगैरे सर्व काही व्यवस्थित असल्याने अजयच्या घरात लक्ष्मी वास करत होती. घरात आनंदी आनंदच होता. पण त्याच्या वडिलांकडे कर्ज(loan) घेण्यासाठी येणारे गरीब,दुःखी लोक पाहून त्याला वाईट वाटायचे.
कर्ज(loan) घेण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये जास्त करून गरीबच लोक होते. बँक(bank) किंवा इतर वित्तीय संस्था (financial institutions) यांचे नियम(rules),अटी(conditions) ,लागणारी कागदपत्रे (documents) वगैरे हे काही शक्य होत नसल्याने त्या लोकांना सावकाराकडे(lender) कर्ज(loan) घेण्यासाठी यावे लागायचे. मुलांचे शिक्षण,लग्न किंवा इतर कार्य, शेती व इतर व्यवसाय अशा अनेक कारणांसाठी कर्ज(loan) घेण्याची वेळ त्यांच्यावर येत असे.
शेतीसाठी कर्ज(loan) घेतल्यानंतर, शेतीचे उत्पन्न आले की त्यातून कर्ज(loan) फेडू आणि उरलेल्या रकमेतून संसारासाठी काहीतरी चांगले करू अशी स्वप्ने शेतकरी पाहत असतो. काही वेळेस त्याची स्वप्ने पूर्णही होतात तर काही वेळेस पाऊसही त्याची परिक्षा पाहतो.पाऊस कधी वेळेवर आला नाही तर दुबार पेरणीचे संकट तर कधी पिके तयार झालेली असताना अवेळी येणारा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. दुष्काळ, अवेळी येणारा पाऊस,गारपीट, पिकांवरील आजार, किड,टोळधाड अशा अनेक समस्या शेतकऱ्याच्या आयुष्यात येत असतात.आणि शेतीचे उत्पन्न न आल्याने कर्जाची परतफेड ( repayment of loan) तो करू शकत नाही. जगावं की मरावं ? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो.
येणाऱ्या संकटाना कंटाळून, जगाचे पोट भरणारा पोशिंदा आत्महत्या करून आपले जीवन संपवतो.
सुखी संसाराची स्वप्नं पाहूनी
कष्ट करत असतो रात्रंदिनी
पण समस्यांनी निराश होऊनी
सर्वांतून मुक्त होतो जीव देवूनी
शेतशिवार बळीराजाचा श्वास
त्याच्याविना जगणं कसं?
राहते त्याला जगण्याची आस
पण मिळतो दुःखाचा वनवास
अशा दुःखी, कष्टी शेतकऱ्यांना सावकारने कर्जमाफी( loan waiver) किंवा काही सवलत(discount) दिली, शासनाकडून(government) किंवा काही सेवाभावी संस्थाकडून मदत मिळाली. तर त्यांना जगण्याचा आधार मिळतो. पुन्हा नव्याने जगण्याची उम्मेद मिळते.
आपल्या बाबांकडे येणाऱ्या गरीब लोकांना पाहून अजयला त्यांची दया यायची व तो बाबांना म्हणायचाही ,
"बाबा,माफ करा ना त्यांचे कर्ज (loan)नाही तर काहीतरी सवलत द्या ना त्यांना."
अजयच्या या बोलण्यावर बाबा त्याला रागातच म्हणायचे,
"अरे, हा तर आपला व्यवसायच (business)आहे. एकाला मदत केली तर दुसरेही लगेच येतील मदत मागायला मग आपण व्यवसाय सोडून समाजसेवा (social work) करायची का? आणि जो तो आपल्या कर्माने जगत असतो."
अजयच्या बोलण्याचा बाबांवर तसूभरही फरक पडत नव्हता. त्यांच्या दृष्टीने पैसाच( money) सर्वकाही होता.ते आपले जीवन आपल्या पद्धतीने जगत होते.
असेच दिवस जात होते.
पण नेहमी चांगलेच दिवस राहतात असे नाही.
आयुष्यात कोणता दिवस काय परिस्थिती घेवून येईल सांगता येत नाही.
अजयच्या वडिलांकडे भरपूर ऐश्वर्य होते पण कुणा गरीबाला मदत करण्याची दानत नव्हती. उलट सावकारी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक गरीब लोकांची पिळवणूक करून संपत्ती वाढवली जात होती.
गरीबांना मदत करून त्यांचे चांगले आशीर्वाद न घेता, उलट कर्जवसुलीसाठी त्यांचे घरदार, जमीनजुमला, वस्तू ताब्यात घेऊन त्या लोकांना रस्त्यावर आणल्यामुळे त्यांचे शिव्याशाप लागले की.. त्यांच्या कर्माचे फळ म्हणून अजयच्या बाबांना दारु,जुगार यांचे व्यसन जडले. या व्यसनाच्या धुंदीत ते इतके वाहत गेले की, कधी आपण आपली संपत्ती विकत गेलो हे ही कळले नाही. गमावलेले कमावण्याच्या नादात अजूनच कंगाल होत गेले. 'काय होतो ? आणि आता काय झालो?' याचा विचार करून एक दिवस हार्ट अटॅक ने गेले. 'चुका करून ते तर गेले पण पुढे काय ?' हा यक्ष प्रश्न अजय व त्याच्या आईच्या पुढे उभा होता.
एकेकाळी इतरांना कर्ज(loan) देणाऱ्यांवरचं कर्ज (loan) झाले होते.गावात राहणेही त्यांना मुश्किल झाले होते. घर आणि थोडंफार सोनं.. जे वाचवले होते , ते विकले आणि लोकांचे देणे दिले आणि कायमचे त्यांनी गाव सोडले.
अजयच्या आईच्या माहेरची परिस्थितीही म्हणावी तितकी चांगली नव्हती पण बहिणीने आपल्याला अनेक वेळा मदत केली आणि भाऊ या नात्याने आपले कर्तव्य म्हणून भावाने आपल्या घरी दोघांना आश्रय दिला.
अजय नुकताच बारावी झालेला होता. पुढील शिक्षण घेणेही महत्त्वाचे होते आणि पैसे कमविणे ही गरजेचे होते म्हणून तो काम शोधू लागला.
एका कापड दुकानात नोकरी करू लागला आणि कॉलेजचे शिक्षण ही घेऊ लागला. त्याच्या आईनेही भावाला आपला त्रास होऊ नये म्हणून एक दोन ठिकाणी स्वयंपाकाचे काम सुरू केले.
अजय दुकानात काम करता करता अनेक गोष्टी शिकत गेला. कपड्यांची गुणवत्ता, लावल्या जाणाऱ्या किंमती, गिऱ्हाईंकाना पटवून आपला माल कसा विकणे? वगैरे सर्व त्याला जमू लागले. आणि आपणही आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे त्याला वाटू लागले.शिक्षणाचा खर्च आणि मामाला घरखर्चाचे पैसे देवून थोडीसी बचत (saving) करू लागला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने एक छोटेसे दुकान भाड्याने (rent) घेऊन कपड्यांचा व्यवसाय सुरू केला.गिऱ्हाईक (customer) येत होते,विक्रीही (sale) होत होती. पण दुकानही छोटे होते आणि कपड्यांची व्हरायटीही जास्त नव्हती. त्यामुळे अनेक गिऱ्हाईक परत जात. आपले मोठे दुकान व्हावे, सर्व प्रकारचे कपडे आपण ठेवावे. असे अजयला वाटू लागले यासाठी भांडवल(capital) हवे आणि आर्थिक मदतही मिळायला हवी. याचा तो विचार करू लागला. आणि त्यासाठी प्रयत्नही करू लागला.व्यवसायासाठी कर्ज(loan) मिळविण्याची माहिती मिळवताना त्याला कळाले की,
एखाद्या लघुउद्योगासाठी व्यवसाय कर्ज( business loan) घेण्यासाठी, आपल्याला आपल्या व्यवसायासाठी किती कर्ज( loan) आवश्यक आहे? आणि ते कशा प्रकारे वापरणार आहोत? हे निश्चित केले पाहिजे.
लहान उद्योग सुरू करताना वेगवेगळ्या पद्धतीने निधी जमा करता येतो.जसे की, कार्यरत भांडवल कर्ज( working capital loan), मुदत कर्ज( term loan),सरकारी योजना( government scheme),बँकेतून कर्ज(bank loan),उपकरणे आणि बीजक कर्ज( equipment and invoice loan),क्लाऊड फंडीग , क्राऊड फंडीग.
व्यवसाय कर्ज दोन प्रकारांनी मिळू शकते.
1) तारण व्यवसाय कर्ज ( Mortgage business loan )
यात व्याजाचे दर ( rate of interest) कमी असतात. कर्ज (loan)परत करण्याचा कालावधीही (time) लवचिक(flexible) असतो. यात तारण ठेवता येत असल्यामुळे जास्त रकमेचे कर्ज(loan) मिळू शकते. तारण असलेल्या कर्जाची परतफेड केली नाही, तर कर्ज देणाऱ्यास कोर्टाचा आदेश नसतानाही कर्जदाराच्या( debtor) मालमत्तेवर दावा (claim)करण्याचा हक्क (right) असतो.
2)
विना तारण व्यवसाय कर्ज( Unsecured business loan)
यात काहीही तारण ठेवलेले नसल्यामुळे परतफेड करण्यास उशीर झाला किंवा परतफेड केली नाही तर कर्ज देणारे (lenders) कर्जदाराच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही पण ते केस करू शकतात. अशावेळी कर्जदारास दंड आणि कोर्टाचा खर्च होऊ शकतो.
व्यवसाय कर्जासाठी (business loan) अर्ज (application) करण्यासाठीची पात्रता(eligibility) -
1) लघुउद्योगाची वार्षिक उलाढाल( annual turnover) 15 लाख ते 1 कोटी यामध्ये असली पाहिजे.
2) अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय ( age of applicant) 21 वर्षापेक्षा कमी नसावे आणि कर्जाचा कालावधी जेव्हा संपेल तेव्हाचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे.
3) व्यवसाय कर्ज मंजूर होण्यापूर्वी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरचे मूल्यांकन ( evaluation) होते. याला सिबिल स्कोअर पण म्हणतात. तो चांगला असेल तर कर्ज लगेच आणि जास्त मिळू शकते.
4) कर्जाची रक्कम, कर्ज घेण्याचा उद्देश, उद्योग क्षेत्र, व्यवसायाचा प्रकार, ओळख क्रमांक इ. गोष्टी तपासून कर्ज दिले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजयने आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. कोणत्या बँकेतून आपल्याला कर्ज लवकर मिळू शकते आणि कर्जाचा हप्ता (installment) भरणे सोयीस्कर होईल. याचाही अभ्यास केला.आणि जी बँक योग्य वाटली त्या बँकेत कागदपत्रे ( documents) घेऊन गेला.तिथे गेल्यावर,कर्ज काढण्याविषयी चौकशी केल्यावर एका कर्मचारीने चव्हाण साहेबांकडे जाण्यास सांगितले. चव्हाण साहेबांकडे गेल्यावर अजय त्यांच्याकडे पाहतच राहिला.
आणि मनात म्हणाला,'अरे, हा तर आपल्या गावाचा प्रदीप चव्हाण. आपल्या वडिलांकडे कर्ज घेण्यासाठी त्याच्या वडिलांसोबत यायचा.'
चव्हाण साहेबांना, अजयला ओळखायला थोडा वेळ लागला पण ओळखले.
गावातील व्यक्ती भेटल्यानंतर आनंद तर होणारचं!
दोघांनाही खूप आनंद झाला. दोघांनाही एकमेकांविषयी खूप जाणून घ्यायचे होते..खूप बोलायचे होते. पण आता कामाविषयी बोलणे जास्त महत्त्वाचे वाटले. चव्हाण साहेबांनी कर्ज काढण्यापासून ते परतफेडी पर्यंतची सर्व प्रोसिजर व्यवस्थित समजावून सांगितली. त्याने आणलेल्या कागदपत्रातील त्रुटी दुरूस्त करून कागदपत्रे जमा करून घेतली आणि पुढे काय करायचे ते पण सांगितले.बँकेत खूप गर्दी होती आणि कामही खूप होते म्हणून जास्त काही न बोलता दोघांनी निरोप घेतला आणि एकमेकांचे फोन नंबर घेतले.
घरी आल्यावर अजयला वाटले, 'आपल्या वडिलांनी चव्हाण साहेबांच्या वडिलांसारख्या किती लोकांना पैशासाठी त्रास दिला..त्या लोकांना आपल्या वडिलांचा,आणि आमचाही राग येत असेल. चव्हाण सरांना माझ्याबद्दल राग असेल तर ते आपलं काम करतील की नाही?
कधी कधी वडिलांच्या कर्माची फळे मुलांनाही भोगावी लागतात. तसे काही होणार तर नाही ना? '
पण अजयचे हे विचार निष्फळ ठरले. कारण रात्री चव्हाण साहेबांचा अजयला फोन आला .
साहेबांना अजयच्या भूतकाळाविषयी थोडंफार माहित होतं. बोलता बोलता अजयने आपली आजपर्यंतची पूर्ण कहाणी सांगितली. अजयची कहाणी ऐकून त्यांनी त्याचे कौतुक केले.त्यांनीही आपली कहाणी सांगितली.
"वडिलांना शेतीच्या उत्पन्नात परवडत नव्हते आणि सावकाराचे कर्जही वाढतच होते. त्यामुळे वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते वाचले,तेव्हा माझे शिक्षण सुरू होते. कर्ज फेडण्यासाठी नाईलाजाने आम्हांला शेतीचा काही भाग विकावा लागला आणि राहिलेला भाग दुसऱ्या शेतकऱ्याला करायला दिला. याबदल्यात तो आम्हांला काही रक्कम देणार होता.जे मिळेल त्यात समाधान मानले आणि आईवडील व मी कामाच्या शोधात शहरात आलो.जगणे महत्त्वाचे त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याचे ठरवले. आईवडील दोघेही मिळेल ते काम करू लागले. मी ही पार्ट टाइम नोकरी करत शिक्षण पूर्ण केले आणि बॅंकेत नोकरीला लागलो. आता मी नोकरी करून शेतीकडेही लक्ष देतो. आईवडील दोघेही आरामात आहेत.
वडिलांना कळाले की, आपल्यावर कितीही संकटे आली तरी आत्महत्या न करता ..आलेल्या संकटाना तोंड देत जगण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे.. मार्ग आपोआप सापडत जातो.शेतकरी बांधवांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता , दुसरा पर्याय म्हणून उद्योग किंवा नोकरी केली पाहिजे."
साहेबांची कहाणी ऐकून, आणि त्यांच्याशी बोलणे झाल्यावर.. अजयला जीवनात अजून काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळाली.
कर्ज मिळण्यासाठीची सर्व प्रकिया पूर्ण झाल्यानंतर, अजयला बँकेतून व्यवसाय कर्ज ( business loan) मिळाले आणि त्याने आपले कपड्यांचे दुकान सुरू केले. वाजवी दर (reasonable rate),
मालाची गुणवत्ता(quality of goods) आणि अजयच्या बोलक्या स्वभावामुळे त्याच्या व्यवसायाने वेग घेतला. कर्जाचा हप्ता (loan installment) ही दिलेल्या वेळेत पूर्ण होऊ लागला. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे गेली. एका दुकानाचे दोन दुकान करता करता अजयचा कामाचा व्याप वाढत गेला. त्याने अनेक गरजू लोकांना नोकरी दिली,काम मिळवून दिले. फक्त कापड व्यवसायापुरता मर्यादित न राहता, त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग सुरू केले.शेतकऱ्यांना काही मदत करता येईल का या हेतूने सामाजिक संस्था काढली. आपल्यासारख्या
व्यावसायिक(businessman) लोकांनी आपल्या नफ्यातून(profit) थोडी जरी रक्कम शेतकऱ्यांसाठी खर्च केली तरी शेतकऱ्यांचे दुःख दूर होईल. या विचाराने तो स्वतः आणि ओळखीतील लोकांना तसे सांगून कार्य करू लागला. त्याची मेहनत, जिद्द आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले करण्याचा उद्देश यामुळे तो 'एक यशस्वी उद्योजक' म्हणून नावारूपाला येऊ लागला. चव्हाण साहेबांनी आणि त्याने आपल्या गावात खूप सुधारणा करून गावाचा विकास केला.
आज पुरस्काराच्या निमित्ताने अजयला जीवनप्रवास आठवला आणि पुरस्कार सोहळ्यात काय बोलायचे तेही ठरवले...
गरीबीला शाप समजू नये व कठीण परिस्थिती आल्यावर पळवाटा न काढता ..मेहनतीने व चांगल्या मार्गाने पैसा कमवावा. वाईट मार्गाने मिळवलेल्या पैशापेक्षा चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा खूप आनंद व समाधान देतो आणि इतरांसाठी काही चांगले करता आले तर जरूर करावे.
पैसा येतोही आणि जातोही. आयुष्यभर पैशाचा खेळ सुरूच असतो.आपण फक्त आपली भूमिका पार पाडत असतो.
जीवनाच्या प्रवासात
पैशाचा खेळ सुरू असतो
कधी हसवतो,कधी रडवतो
कधी नात्यांतील प्रेम वाढवतो
कधी नात्यांत दुरावाही आणतो
कधी गरीबाला श्रीमंत करतो
कधी श्रीमंताला गरीब बनवतो
जगण्यासाठी पैसा लागतो
की पैशासाठी जीवन जगतो
जीवन व पैशाचा मेळ साधतो
तोचं जीवनाचा आनंद घेतो
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.