"सुरेखा,तू खरचं खूप भाग्यवान आहेस बाई.. तुझी दोन्ही मुलं खूप संस्कारी आहेत.अभ्यासातही हुशार आहे आणि त्यांच्या वागण्यात,बोलण्यात किती नम्रपणा,आपलेपणा जाणवतो.तुझा सर्वेश शिक्षण घेता घेता वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदतही करत असतो आणि तुझी प्रिया दिसायला छान आहेस पण घरातील सर्व कामे किती पटापट करते. आजी-आजोबांची काळजी घेते.लग्न करून ज्या घरी जाईल तिथे आनंदच देईल.मुलगी म्हणून या घराची जशी काळजी घेते तशीच सून म्हणून सासरचीही काळजी घेईल."
सुरेखाची मैत्रीण सुरेखाला म्हणत होती.
"तुझं म्हणणं खरं आहे. माझी दोन्ही मुलं खूप चांगली आहेत. आईवडील म्हणून आम्ही केलेले संस्कार कामी येत आहेत यातच खूप आनंद आहे.आतापर्यंत तरी सर्व व्यवस्थित आहे. पण भविष्यात काय होईल? हे आताच थोडी सांगता येते.सून कशी मिळेल? मुलीला सासर कसे मिळेल?हे आपण आताच कसे सांगू शकू?" - सुरेखा म्हणाली.
"हो..ते पण आहेच म्हणा काही गोष्टी आपल्या हातात नसतात ..समोरच्या व्यक्तिंवर किंवा परिस्थितीवरही अवलंबून असते." - सुरेखाच्या मैत्रीणीने सुरेखाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
सुरेखाच्या मैत्रीणीप्रमाणेच तिचे शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी हे देखील सुरेखाच्या दोन्ही मुलांचे खूप कौतुक करायचे. हे कौतुक ऐकून सुरेखा व तिच्या मिस्टरांना खूप आनंद व्हायचा व अभिमानही वाटायचा. सुरेखा व तिचे मिस्टर दोघेही स्वभावाने प्रेमळ होते.आईवडिलांची काळजी घ्यायचे,येणाऱ्या-जाणाऱ्यांचे छान आदरातिथ्य करायचे.नातेवाईक, शेजारी, ओळखीचे अशा सर्वांच्या सुखदुःखाला धावून जायचे.साहजिकच या सर्वांचा त्यांच्या मुलांवरही चांगला परिणाम होत होता. चांगले संस्कार त्यांच्यावर रूजले जात होते.
प्रियाने M.Com. पूर्ण केले आणि तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. आपल्या मुलीला सासर चांगले मिळावे अशीच सर्व आईवडिलांची इच्छा असते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. प्रियाचे आईवडीलही याच प्रयत्नात होते की, प्रियाला चांगले सासर मिळावे; जेणेकरून लग्नानंतर ती सुखाने,समाधानाने राहील.प्रियाला बघण्यास येणाऱ्या मुलांना प्रिया आवडत होती;पण कुठे गोत्र,कुठे नाडी दोष तर कुठे गुण जुळत नव्हते. या ना त्या कारणाने संबंध जुळायला अडचण येत होती.घाई करून लगेच लग्न ठरवण्यापेक्षा, वेळ लागला तरी चालेल पण चांगल्याच ठिकाणी आणि सर्व योग्य जुळून आले, तरच लग्नाचा विचार करू.असे प्रियाच्या आईवडिलांनी ठरवले होते.
आणि शेवटी, त्यांनी ठरवले तसेच झाले.
मनासारखे स्थळ मिळाले. मुलगा कॉलेजमध्ये प्राध्यापक होता.दिसायला प्रियाला अनुरूप असाच! प्रियालाही मुलगा आवडला होता.
मनासारखे स्थळ मिळाल्यामुळे प्रियाच्या आईवडिलांना आनंद झाला होता.प्रियाही खूप खुश होती.15 दिवसांनी एंगेजमेंट चा कार्यक्रम करण्याचे ठरले.
प्रियाचे आईबाबा,भाऊ उत्साहाने कार्यक्रमाची तयारी करू लागले.
छोटासाच पण छान असा एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडला.लग्नाची तारीख मार्च महिन्यातील निघाली.लग्नाला 3 महिने बाकी होते; त्यामुळे लग्नाच्या तयारीला बराच वेळ मिळणार होता.पण तरीही वेळेवर काही कमी पडू नये,घाई होऊ नये यासाठी दोन्हीकडे हळूहळू लग्नाची तयारी सुरू केली होती.
दोन्ही घरी आनंदाचे वातावरण होते.
पण या आनंदात दुःखाचे विरजण पडले.
कोरोना वाढल्याने सरकार मार्च महिन्यात लॉकडाउन लावणार होते. लग्न जरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होते तरी ; कोणताही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करणे धोक्याचे होते आणि नातेवाईक वगैरेही यायला तयार नव्हते.
लग्नाची तारीख नंतरची काढायची ठरवली तर..किती दिवस.. किती महिने ..की वर्ष? वाट पाहवी लागेल...त्यामुळे ठरलेल्या तारखेलाच दोन्ही घरातील लोक व काही मोजके लोक यांच्या उपस्थितीत प्रिया व शैलेशचे लग्न झाले.प्रियाच्या व शैलेशच्या ही नातेवाईकांना, मित्रमंडळींना लग्नाला येण्याची खूप हौस होती.प्रियाच्या आईवडिलांनाही प्रियाचे लग्न थाटामाटात करण्याची हौस होती; पण लग्न इतक्या साधेपणाने होईल ...अशी कोणालाच कल्पना नव्हती.
लग्न करून प्रिया सासरी आली. सत्यनारायणाची पूजा वगैरे सर्व थोडक्यात झाले. कोरोनामुळे प्रिया व शैलेश कुठे फिरायलाही जाणार नव्हते.
लॉकडाउन लागण्यापूर्वी प्रिया रीतीरिवाजाप्रमाणे माहेरी जाऊन आली.
आईवडिलांनी आपल्या लाडक्या प्रियाला सुखाच्या संसारासाठी आशीर्वाद दिले आणि आपल्या चांगल्या संस्कारांची शिदोरीही तिच्या बरोबर दिली. सासुरवाशीण प्रिया आपल्या सासरी संसाराला लागली.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.