मराठी कथा, लेख

Breaking

बुधवार, २५ जून, २०२५

सावत्र आई 2

 


 "हो बेटा, तुझी ती सावत्र आई असेल.  जन्म देणारीच खरी आई असते.  तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.  तुझे काका तुझ्या बाबांना दुसरे लग्न करण्यास सांगत आहे.  तुझे बाबा त्यांचे ऐकून दुसरे लग्नही करतील.  नात्याने ती स्त्री तुझी आई राहील. ती तुझ्याशी कसे वागेल?  तुझ्यावर प्रेम करेल का? तुला आईची माया देईल का? हे मी आत्ताच नाही सांगू शकत.  जे पण होईल ते चांगलं होईल. असे मनात ठेवून तू तुझे जीवन जग. आता मी तुला एवढेच सांगू शकते."


 मीराताई अभयला धीर देत म्हणाल्या.


"मावशी, माझ्या एक दोन मित्रांना सावत्र आई आहे.  त्यांच्या आई त्यांच्याशी कसे वागतात?  हे त्यांच्या बोलण्यातून मला कळत असते. त्यांचे दुःख पाहून मला खूप वाईट वाटते. त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या व्यथा ऐकून माझ्या मनात सावत्र आईविषयी खूप राग निर्माण झाला आहे. मला त्यांचा त्रास ऐकूनच इतके वाईट वाटते आहे. ते तर स्वतः तसा अनुभव घेत आहे. त्यांना किती वाईट वाटत असेल ना?  'सावत्र आईच्या त्रासापेक्षा बिना आईचे राहिले असते तर चांगले झाले असते असते.'  असे त्यांना कधी कधी वाटते."


 अभय मीराताईंना आपल्या मनातील दुःख सांगत होता.


"जन्मदाती आई व सावत्र आई यांच्यात फरक असला आणि तुझ्या मित्रांच्या सावत्र आई या त्रास देणाऱ्या जरी असल्या.. तरी सर्वच सावत्र आई वाईट नसतात. काही खूप जीव लावणाऱ्याही असतात. अशी पण काही उदाहरणे असतात.  पण तू आतापासून असा विचार नको करू. थोडा धीर धर. होईल सर्व ठीक."


 मीराताई अभयला समजावत म्हणाल्या.


"मावशी, माझी आई व तू चुलत बहिणी.  तुम्ही दोन्ही एकाच गावात राहत होत्या आणि दोघींचे छान जमतही होते. मी पण लहानपणापासून तुझ्याकडे येतो आहे. आई गेल्यानंतर तूच मला जवळची गं.. म्हणून मी तुझ्याशी एवढं बोलू शकलो. तुझ्याशी बोलून मला खूप बरे वाटले."


अभय आपल्या मीरा मावशीला म्हणाला.


"तुझी आई कमल ही माझ्या काकांची मुलगी;  पण आम्ही दोन्ही सख्ख्या बहिणीप्रमाणेच राहत होतो. ती गेल्याचे तुला व तुझ्या बाबांना जेवढे दुःख झाले तेवढेच मलाही दु:ख झाले आहे. तिची मलाही आठवण येतच राहील आणि माझा रोहित आहे तसा तू ही माझा मुलगाच.  तू हक्काने माझ्याकडे ये. इथेच रहा आणि तसेही तुझ्या आईने मला तुझी काळजी घ्यायचे सांगितलेच आहे."


 मीरा मावशी प्रेमाने अभयला म्हणाली.


क्रमश:


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...