'शरीर माध्यम खलू धर्म साधनम्' ही संस्कृत उक्ती अतिशय महत्त्वाची आहे.म्हणजे कोणतेही सत्कार्य करायचे असेल तर शरीर चांगले राहणे महत्त्वाचे आणि शरीर चांगले तर चं ते कार्य व्यवस्थित होऊ शकते.
शरीर चांगले म्हणजे काय ? तर शरीर निरोगी असणे म्हणजेचं शरीराच्या सर्व संस्था ( श्वसन संस्था, पचनसंस्था इ.) सुरळीत काम करीत असाव्यात ,कोणतीही व्याधी नसावी.
शारीरिक व्याधी या मानसिक स्थिती वर पण अवलंबून असतात. मन निरोगी तर शरीर निरोगी! शरीर आणि मन यांना जोडणे म्हणजे 'योग' .
भारतात फार पूर्वीपासून योगाचे महत्त्व आहे.ऋषी मुनींनी योगाद्वारे अनेक सिद्धी, शक्ती प्राप्त केल्या होत्या. पुष्कळ लोकांचा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे.गुरूदेव श्री.श्री. रविशंकर म्हणतात ," योग म्हणजे हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत आध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे."
योग हे अष्टांग योग वर आधारलेले आहे.यामध्ये यम,नियम,आसन,प्राणायम, प्रत्याहार, धारणा,ध्यान,समाधी यांचा अभ्यास केला जातो.यामधील प्रत्येक अंगाला अनन्य साधारण महत्व आहे.मानवाला सामान्य जीवन जगत असताना उपयोगी असणारे अंग म्हणजे यम आणि नियम ..
यम म्हणजे सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण केलेली अशी तत्त्वे की ज्यामुळे समाजाचे स्वास्थ नीट राहू शकते.तर नियम म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्यासाठी असलेले काही नियम व यामधील पुढील पायरी म्हणजे आसन.
ताण-तणावामुळे मनावर परिणाम होतो ,शरीरावर परिणाम होऊन मांसपेशी कडक होतात.स्नायू व्यवस्थित कार्य करीत नाही. यामुळे शरिराची लवचिकता देखील नाहीशी होते.ही लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आसन करणे गरजेचे असते.
मानसिक स्वास्थ व सोबत जीवनात उठण्याबसण्याचे व खाण्यापिण्याचे नियम घालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी स्वरुपाचे कार्य होईल. गीतेत म्हटले आहे "योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले,योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले. "
" न फार खावूनि किंवा खाणेचि सोडुनि निजणे जागणे ,खाणे,फिरणे आणि कार्य ही मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन ."
एकदा आपण स्वतःला साधारण सुलभ चाकोरीत बसवून घेतलं की योगाला पूरक अशी शरीर-मनाची पार्श्वभूमी तयार होते.अर्थात आपण जिथे राहतो ते घर,अंगण ,परिसर,मित्र,काया ,वाचा,पूजाविधी, पद्धती, चिंतन- मननाचे विषय ,शरीरासाठी किती वेळ देता ?
जेवणासाठी, झोपण्यासाठी वेळ देतोचं.व्यायाम-योग-आसन-प्राणायाम याला विहित वेळ देणे गरजेचे आहे.
आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण सुख मिळवण्यासाठी धडपड करीत आहे.खुप काम,
खुप पैसा सर्व सुखसोयी म्हणजे सुखी आयुष्य असे प्रत्येकाला वाटत असते म्हणून प्रत्येक जण अनेक मार्गाने पैसा मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो.पण त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते,ताणतणाव तयार होतात ,अनेक शारिरीक ,मानसिक व्याधी जडतात. सुखसोयीच्या वस्तू आल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते.बसून बसून कामे होतात त्यामुळे शरीराचा व्यायाम होत नाही.
गरीबाकडे पैसा नसल्याने आजार आणि श्रीमंताकडे पैसा असला तरी अनेक व्याधी!
Prevention is better than cure
म्हणजे आजार होण्यापूर्वीच आपण काळजी घेतलेली बरी.
नियमितपणे योग,व्यायाम केल्याने शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आजार झाला तरी त्यातून लवकर बरे होतो.आता कोरोनाच्या आजारात ही रुग्णांना प्राणायाम, योगासने करण्यास सांगितले गेले आणि त्याचा त्यांना फायदा ही झाला.
आपल्या कडे सर्व गोष्टींसाठी वेळ असतो मग आपल्या शरीरासाठी, मनासाठी का वेळ देवू नये ? दिवसातील थोडा वेळ जरी दिला तरी त्याचे फायदे आयुष्यभरासाठी मिळत राहतात.
21 जून हा 'योग दिवस ' म्हणून जगात साजरा केला जातो.यामुळे योगबद्दल लोकांना माहिती कळते,लोक आरोग्याबाबत जागरूक होतात.विविध कार्यक्रम, शिबिरे याद्वारे लोकांना योगाभ्यास शिकवला जातो.योग बद्दल लोकांमध्ये आवड निर्माण केली जाते.
आपण योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शारीरिक तक्रारी, समस्या समजून जे शक्य आहे ते योग करावेत.
चला तर मगं आपण सर्वांनी नियमित योग करुया आणि आपले आरोग्य निरोगी ठेवुया ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.