"।।सौभाग्याचं कुंकू लावूनी कपाळी
ओवाळते शंकराला सांज सकाळी।।"
असा छान अभंग नित्यनेमाने म्हणणाऱ्या आपल्या आजीला पाहून गौरीला खूप आनंद व्हायचा. स्वच्छ, सुंदर नऊवारी साडी,हातात भरगच्च बांगड्या, पायात शोभून दिसणारी जोडवी, गळ्यात मोठे मंगळसूत्र आणि कपाळाला रूपयाच्या आकाराएवढे ठसठशीत कुंकू! ,आजीचे हे रूप म्हणजे नावाप्रमाणेच लक्ष्मीचं रूपचं!
आजीचं आपल्या
कुंकवावर खूपचं प्रेम!सकाळी आंघोळीनंतर आजी कुंकू घेऊन आरशासमोर बसायची. कितीही घाई असो,कुठे जायचे असो आणि कधी आजारी असली तरी आजीला चांगले ठसठशीत कुंकू लावल्याशिवाय चैन पडत नव्हते. कुंकू वर जेवढे प्रेम होते,तितकेच त्या कुंकवाच्या धनीवरही आजीचे प्रेम होते. आजोबांची काळजी घेण्यासाठी घरात मुले,सुना,नातवंडे होती.पण तरीही आजी स्वतः आवडीने आजोबांची काळजी घ्यायची. त्यांना काय हवं नको ते पहायची. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आजीही खूश व्हायची आणि त्यामुळे आजीच्या चेहऱ्यावरील कुंकवाला अजून रंग यायचा.
आजोबांचेही आजीवर खूप प्रेम होते. आजी लग्न करून सासरी आली आणि तिच्या येण्याने त्यांच्या घरी लक्ष्मीचं घरी आली होती. त्यांचे गरीबीचे दिवस संपून सुखाचे दिवस आले होते. असे आजोबा सर्वांना अभिमानाने व कौतुकाने सांगत असत.
आजीने आपल्या गुणांनी, संस्कारांनी आपला सुखाचा संसार सांभाळला होता. आणि आताही मुले,सूना,नातवंडे या सर्वांना मायेच्या पदराखाली जपत होती.
"आजी, आई व काकू तर टिकली लावतात मगं तू का कुंकू लावते? तू पण लाव ना टिकली.."
गौरी आपल्या आजीला म्हणायची.
"त्यांना लावू दे टिकली, मी तर कुंकूच लावणार . हे कुंकू म्हणजे तुझ्या आजोबांचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व आहे. रोज हे कुंकू कपाळावर लावताना, मी देवाला तुझ्या आजोबांसाठी प्रार्थना करत असते, माझं कुंकू... माझं सौभाग्याचं लेणं असचं राहू दे...मला कुंकूभरल्या कपाळानेच सौभाग्याचं मरण येऊ दे.."
आजीचे हे बोलणे ऐकून गौरीला आजी-आजोबांच्या नात्याचे कौतुक वाटायचे.
खरचं, भारतीय स्त्रिया आपल्या स्वतः पेक्षा आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करतात ना ! हे तिला कळायचे.
घरात असे सर्व सुखाचे व आनंदाचे वातावरण होते. पण गौरीची मोठी आत्या,लग्न होऊनही माहेरीचं राहयची.तिला तिच्या सासरी खूप त्रास होत होता. नवरा व्यसनी होता व तिला मारझोड ही करायचा. एकदोनदा तर त्याने तिला जीवे मारण्याचही प्रयत्न केला होता. त्यामुळे आजोबांनी आत्याला कायमचे माहेरी आणलेले होते.
आजोबांचे आजीवर खूप होते, आजोबा आजीची काळजी घ्यायचे आणि आजीही तितकीच आजोबांची काळजी घ्यायची. आजी-आजोबांचे नाते हे नवरा- बायकोचे खरे नाते! आणि त्यामुळे आजीला आपल्या कुंकवावर विशेष प्रेम ! असे गौरीला वाटायचे.
आई,काकू या कुंकू न लावता टिकली लावत असल्या तरी, त्यांचेही आपल्या नवऱ्यांवर प्रेम होतेचं, बाबा व काका हे ही आपल्या बायकोची किती काळजी घेतात हे दिसत होते.
पण आत्याला तर तिचा नवरा प्रेमही करत नव्हता,उलट मारायचा,त्रास द्यायचा आणि आता तर आत्या किती वर्षांपासून इकडेचं राहते आहे तरीही आत्या कुंकू लावते ....का ??
असा प्रश्न गौरीला कायम पडायचा.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.