मराठी कथा, लेख

Breaking

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

हे ही दिवस जातील ( भाग 2 )

 सुरुवातीला आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा प्रणव कुठेतरी हरवला आहे. हे तिला जाणवायला लागले.प्रणव रोज रात्री उशिरा घरी येऊ  लागला. सासरे व दीर जसे सकाळी लवकर ऑफिसमध्ये जातात, तसा प्रणव जात नाही,उशिरापर्यंत झोपून राहतो. सासरे व दीर बिझिनेस विषयी बोलत असताना, प्रणव त्यात कधीही भाग घेत नाही. या सर्व गोष्टी अनघाच्या लक्षात येऊ लागल्या. 

याबद्दल तिने प्रेमाने व बायकोच्या अधिकाराने प्रणवला विचारलेही. पण तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

अनघाने सासूबाई,जाऊबाई यांनाही त्याबद्दल विचारले पण त्यांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. 

अनघाने ही गोष्ट आपल्या आईलाही सांगितली.


तेव्हा आईने तिला सांगितले, "बेटा, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. संसारात थोड्याफार गोष्टी समजून घ्याव्या लागतात. नात्यांना समजून घ्यायला वेळ लागतो. थोडा धीर धरं .. हे हि दिवस जातील आणि सर्व सुरळीत होईल. "


आईच्या अशा सांगण्यामुळे ती आहे तसे स्विकारून जगत होती..संसार करत होती..परिस्थिती बदलण्याची वाट पाहत होती. 


परिस्थिती काही बदलत नव्हती पण अनघाला मातृत्वाची चाहूल लागली होती. तिच्या आई होण्याच्या या बातमीने सासरी व माहेरी सर्वांना आनंद झाला होता.प्रणवलाही  आनंद झाला होता. पण त्याचा चेहरा काहीतरी वेगळचं सांगत होता. 


"अरे, प्रणव आता तू बाप होणार आहे, आता तरी सुधरं.. तुझे लग्न  झाले आहे, चांगली बायको मिळाली हे भाग्य समजं तुझं  याचे तरी भान ठेवं.

आम्हांला वाटले, तू लग्न केल्यानंतर संसारात लक्ष देशील, बिझनेस मध्ये आम्हांला मदत करशील, जबाबदारीने वागशील ..पण तुझ्या वागण्यात काहीच सुधारणा नाही. रात्री उशिराने घरी येणे, पार्ट्या करणे, वेगवेगळे व्यसन , अफेयर्स हे सर्व शोभते का आपल्या घरात ? आता तरी हे सर्व बंद कर.. तुझे चांगले व्हावे म्हणून तर तुझे लग्न केले ना आम्ही? " 


असे आईबाबा प्रणवला सांगत होते,त्याच्यावर ओरडत होते आणि हे बाहेरून घरात येणाऱ्या अनघाने ऐकले. हे ऐकून तिला चक्करच आली. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आपली खूप मोठी फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आले होते.


अनघाने आपली फसवणूक का केली ? याचे उत्तर सासूसासऱ्यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, 

" प्रणवला कॉलेजच्या दिवसांपासून वाईट व्यसने लागली होती , आम्ही खूप प्रयत्न करूनही तो सुधारत नव्हता. आम्हांला वाटले लग्न झाल्यानंतर संसारात रमेल आणि सुधारेल यामुळे त्याचे लग्न केले. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्यात बदल झाला नाही. 

अनघा, मुलाच्या प्रेमापोटीचं हे केले गं..तुला या घरात काहीही कमी पडणार नाही गं...तू सुखात राहशील फक्त प्रणवला थोडा वेळ दे..होईल तो चांगला.. आपण सर्व मिळून त्याला चांगला करू..हळूहळू हे हि  दिवस जातील.. तू थोडी वाट बघं..."


सासूसासऱ्यांचे हे बोलणे ऐकून प्रणवबद्दलचे त्यांचे प्रेम तिला जाणवत होते, पण आपल्या मनाचे काय ? आपल्या सुखाचे काय ? घरात सुखसोयी आहेत..बाकी सर्व खूप चांगले आहे..पण आपला नवरा व्यसनी, बेजबाबदार, त्याच्याच विश्वात रमणारा ..मग आपल्या संसाराला काय अर्थ? आपल्या होणाऱ्या बाळाचे काय भविष्य?


अजून एक संधी म्हणून तिने सासूसासऱ्यांचे ऐकून, प्रणवला चांगल्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न केले.पण पदरी निराशाच आली.


'हे हि दिवस जातील...' सर्वांच्या म्हणण्यानुसार तिने ऐकले आणि वागलीही पण तिच्या मनाला एक प्रश्न त्रास देत होता..

' हे हि दिवस जातील मान्य,... पण कधी? अजून किती दिवस..किती वर्ष..की पूर्ण आयुष्य... वाट पाहवी लागेल ?'


गोंडस अशा शर्विंलच्या येण्याने प्रत्येक जण आनंदी होता. बाळाचे कौतुक करण्यात सर्वांचा दिवस आनंदात जात होता. पण त्याच्या वडिलांच्या वागण्यात काहीही चांगला बदल होत नव्हता. वडीलांची जबाबदारी ही त्याला कळत नव्हती. त्यामुळे शर्विलच्या भविष्याचा विचार करता, अनघा सासरच्या सर्व सुखसोयी सोडून बाळासाठी कायमची  माहेरी निघून गेली.


तिने सर्व गोष्टींचा विचार करूनचं हा निर्णय घेतला होता. 

' हे हि दिवस जातील ...' याची किती वाट पाहत बघायची ..त्यापेक्षा त्यातून काहीतरी चांगला मार्ग काढून ..येणारा प्रत्येक दिवस आपल्या पद्धतीने आनंदी करण्याचा प्रयत्न का करू नये ? असे अनघाला वाटले व तिने आयुष्यातील हा मोठा निर्णय घेऊन, माहेरी राहू लागली. चांगले शिक्षण व आपल्या ज्ञानामुळे तिला चांगली नोकरीही मिळाली. ती आपल्या शर्विलला प्रेम व चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू लागली.

आणि मनाला सांगू लागली,


' हे हि दिवस जातील

याची किती वाट पाहशील? 

यातूनी चांगला मार्ग शोधूनी

आनंद घे तू या जीवनी'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

आईचा त्याग

 "आई, आई, तुझा जय आला बघं. आता  तू लवकर बरी होशील  आणि तू बोलत का नाहीयेस?  आई, बोल ना माझ्याशी..."  जय आपल्या आईशी बोलत होता.  ...