"बाळा, अनघा, नशीब काढलसं हं तू, चांगला जीवनसाथी मिळाला तुला, दिसायला ही खूपचं चांगला आहे. घरचा मोठा बिझनेस आहे आणि घरातील सर्व माणसांचे वागणे,बोलणेही किती नम्र व प्रेमळ आहे.
तुझ्या बाबांच्या अकाली जाण्याने मला तर तुझ्या लग्नाची खूप चिंता होती. तुझे दोघे भाऊही इतके मोठे नाही की, तुझ्या लग्नाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतील.
मोठा विनोद तर आताच नोकरीला लागला आहे व छोटा विवेक तर अजून शिक्षण घेत आहे.तुझे नशीब चांगले म्हणून घरबसल्या एवढं चांगल स्थळ आलं, खरचं माझा देवावर विश्वास होता आणि आपले हे हि दिवस जातील व सुखाचे दिवस येतील याची खात्री होती. 'आता यापुढचे सर्व व्यवस्थित होऊ दे.'
अशी प्रार्थना देवाला करते."
अनघाची आई,अनघाचे लग्न ठरल्यामुळे आनंदी होऊन अनघाला म्हणत होती.
अनघालाही प्रणवला पाहताच तो आवडला होता.दिसायला खरचं इतका छान होता की, त्याला पाहताच कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडली असती.
अनघाही दिसायला सुंदर होती. सर्व कामात हुशार होती.शिक्षणही चांगले झालेले होते. पण वडिलांना हार्ट अटॅक आला व त्यातच ते गेले. त्यामुळे घरात दुःखाचे वातावरण होते. आयुष्यात पुढे काय होईल या विचाराने सर्व चिंतेत असायचे.
आपल्या दुःखाला कुठेतरी सुखाचा मार्ग दिसतो आहे हे अनघाला आलेल्या स्थळामुळे सर्वांना वाटत होते.आणि सर्वांना कुठेतरी जगण्याचा,आशेचा किरण दिसू लागला .
वडील नव्हते तरी आई या नात्याने, अनघाच्या आईने आपल्या पद्धतीने, आपल्याकडून शक्य होईल तितके अनघाच्या लग्नात देणेघेणे केले. सासरच्या मंडळींनी फक्त मुलीचीच त्यांच्याकडून अपेक्षा केली होती पण आपल्या मुलीला नंतर काही बोलणे नको,त्रास नको म्हणून अनघाच्या आईने आपले कर्तव्य पार पाडले होते.
अपेक्षेपेक्षा खूप छान लग्न झाले. दोन्ही घरात आनंद ओसंडून वाहत होता. अनघाला चांगले सासर मिळाले व तिचे लग्न व्यवस्थित पार पाडल्याच्या जबाबदारीतून आपण मुक्त झालो, याचे समाधान अनघाच्या आईला व भावांना होते. तर प्रणवला सुंदर, हुशार, संस्कारी जीवनसाथी मिळाली, आता प्रणवचे आयुष्य सुखाचे होईल यामुळे त्याच्या घरातील सर्वांना समाधान वाटत होते.
लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर प्रणव व अनघा हनिमूनसाठी फिरायला गेले.
तेथे निसर्गसौंदर्याबरोबर दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत होते. एकमेकांना समजून घेत होते,आनंद देत होते व घेत होते.
हे दिवस कधी संपूच नये असे दोघांना वाटत होते.
हनीमूनचा आनंद घेऊन दोघे घरी परतले. त्यांचे आनंदी चेहरे पाहून घरातल्यांनाही समाधान वाटले.
दोन दिवसांनी अनघा माहेरी गेली. माहेरी ती आपल्या सासरचे कौतुक करत होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आईला, भावांना ही आनंद होत होता.
तीन-चार दिवस माहेरी राहून, अनघा सासरी परतली. रोजचे रूटीन सुरू झाले. सासू-सासरे तिच्याशी खूप प्रेमाने वागत होते.तिची काळजी घेत होते. दीर, जाऊ हे ही तिच्याशी छान बोलायचे, वागायचे,तिची विचारपूस करायचे, काळजी घ्यायचे. घरात श्रीमंतीचा थाट होता.कपडेलत्ते, दागदागिने, खाण्यापिण्याची हौसमौज सर्व काही होते. कशाचीही कुठेही काही कमतरता नव्हती. पण लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस प्रणवबरोबर सुखात गेल्यानंतर , अनघाला हळूहळू प्रणवच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवायला लागला.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.