मराठी कथा, लेख

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

अलक

  फळ 


"साहेब,साहेब" असे आदराने  आपल्या मुलाशी ऑफिसातील सर्व लोक बोलत होते व कलेक्टरच्या खुर्चीवर मानात बसलेल्या आपल्या मुलाला पाहून आईला, आईची व वडिलांची अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्याच्या व  त्यासाठी आयुष्यभर केलेल्या कष्टाचे चांगले फळ दिसत होते व डोळ्यात सुखाचे अश्रू जमा झाले होते.





सरबत


उन्हाळ्याचे दिवस होते.

भर दुपारची वेळ होती.सूर्यही चांगला तापलेला होता. अंगाची लाही लाही होत होती. घशाला कोरड पडत होती. एक म्हातारे आजोबा सरबताच्या गाडीजवळ आले. त्यांच्या डोळ्यातील करूण भाव पाहून,त्याला दया आली व त्यांच्याकडून पैसेही न घेता त्याने आजोबांना सरबत पाजले आणि दोघांचेही मन तृप्त झाले होते.




 चव


उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला मुलगा खूप वर्षांनी घरी आला होता, घरात स्वयंपाकाला बाई असूनही , स्वतः आईने आपल्या मुलासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. ते आवडीने खाऊन मुलाला खूप वर्षांनी आईच्या हाताच्या पदार्थांची चव चाखण्यास मिळाली होती.




 भर


घरी महत्त्वाची कागदपत्रे विसरली होती व आज कॉलेजला ती देणे गरजेची होती,तिला घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने घरी तसा फोन करताच, वडील भर पावसात तिला होस्टेलला ती कागदपत्रे देण्यास आलेले पाहून प्रेमाच्या,कृतज्ञतेच्या भावनांनी तिचे मन ओलेचिंब झाले होते.




 छत


पाऊस काही थांबत नव्हता. नदीही धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदीकिनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरत होते. अगोदरचं  कच्ची घरे,गळणारे छत आणि पूरामुळे घरात राहणे धोक्याचे होते.आपला जीव वाचविण्यासाठी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सर्व प्रयत्न करत होते.मदतीच्या अपेक्षेत वाट पाहत होते.




 झळ


अगोदरचा डोक्यावर कर्जाचा भार होता. शेताचे चांगले उत्पन्न आल्यानंतरच कर्जाचा भार कमी होणार होता. पण पावसाने दडी मारल्याने, पाण्याअभावी पिके जळून गेली.कर्जाचे ओझे,पिकांचे नुकसान असे सर्व बाजूंनी शेतकऱ्याला दुःखाची झळ सोसावी लागत होती.




 करमत 


दिवाळीला सासरी गेलेल्या मुली,नातवंडे घरी आली होती. घरात कसे आनंदाचे,चैतन्याचे वातावरण होते. दिवस कुठे उगवत होता आणि कुठे मावळत होता हे सुद्धा कळत नव्हते. सुट्टी संपताच मुली सासरी निघून गेल्या. मुलींच्या व नातवंडांच्या आठवणीने घर खायला उठत होते. आजी- आजोबांना करमत नव्हते. फोनवर त्या सर्वांशी बोलून  त्यांना बरे वाटत होते.

 



अडसर


जीवनातील अनेक अडसर दूर करत, ती जेव्हा यशस्वी उद्योजिका झाली, तेव्हा तिला खूप आनंद होत होता.आपल्या ऑफिसातील खुर्चीचा मान आईवडीलांना देत ती म्हणाली,"तुमच्या आशीर्वादाने हे सर्व शक्य झाले. हे सर्व तुमचेच आहे." 

मुलीची प्रगती व तिचे बोलणे ऐकून आईवडिल धन्य झाले.



 पदर


चारित्र्यावरुन संशय घेऊन, सासरच्या लोकांनी तिला तिच्या छोट्या बाळासह घरातून हकलून दिले. माहेरच्यांनीही हात वर केले. तिने सर्वांकडे मदतीसाठी पदर पसरला, विनंती केली.जगण्यासाठी मिळेल ते काम करू लागली, जागा मिळेल तिथे राहू लागली. कष्ट करू लागली व आपल्या बाळाला मायेच्या पदराखाली वाढवू लागली.



मदत 



अचानक नोकरीवरून काढून टाकल्यामुळे,तो खूप चितेंत होता. आता पुढे काय होणार ? या काळजीने तो विचारत होता. " काळजी करू नको." या आवाजाने पाठीवर थाप पडताच त्याने मागे वळून पाहिले. "तुला मी माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर करतो."

संकटकाळी आपला मित्र आपल्याला मदत करत आहे. ही खरी मैत्री पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले व मित्राला मनापासून धन्यवाद केले.




 कळ 



उच्च शिक्षण घेऊन नोकरीतनिमित्त बायको मुलासह परदेशी राहणारा मुलगा,सून,व नातू दिवाळीला घरी येणार होते,म्हणून आईवडिलांनी  जोराची तयारी सुरू केली होती, दोघेही खूप आनंदात होते. खूप वर्षांनी सर्व मिळून, एकत्र दिवाळी साजरी करणार होते. पण त्यांच्या विमानाला अपघात झाला होता,मुलगा,सून व नातू हे कोणीही वाचले नव्हते. ही बातमी ऐकताचं आईवडिलांचे ह्रदय दुःखाची, वेदनेची कळ येऊन रडू लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...