"नमस्कार सर , मी राजन शिंदे . श्रीकांत सर आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे."
चौकशी कक्षात बसलेल्या व्यक्तीला राजनने विचारले.
"हो,आहेत पण मीटिंगमध्ये आहेत.मीटिंग संपली की सांगतो सरांना . काही काम होते का तुमचे ? असेल तर सांगा मला."
त्या व्यक्तीने राजनला सांगितले.
"काही काम नव्हते,मला सरांना पर्सनली भेटायचे आहे. मीटिंग संपेपर्यंत थांबतो मी."
राजन त्या व्यक्तीला म्हणाला.
मीटिंग संपल्यावर श्रीकांत सर ऑफिसमधून बाहेर आले आणि कामासाठी बाहेर जायचे होते म्हणून घाईत चालले होते. तेवढ्यात ऑफिसबाहेर त्यांची वाट पाहत बसलेल्या राजनने त्यांना आवाज दिला.
"सर,..सर.."
सरांनी त्याच्याकडे पाहिले व त्याला लगेच ओळखले आणि म्हणाले,
"राजन, कसा आहेस बेटा? बऱ्याच वर्षांनी भेटतो आहेस , सर्व व्यवस्थित सुरू आहे ना?"
" हो सर, देवाच्या कृपेने आणि आपल्या आशिर्वादामुळे माझे सर्व व्यवस्थित सुरू आहे. मी तुम्हांला माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो आहे. लग्नाला जरूर यायचे तुम्ही.
मला कधी वाटलेही नव्हते की, माझे लग्न होईल असे.आयुष्यातून वाया गेलेला मुलगा म्हणून माझी ओळख होती पण आपल्या 'नवी आशा व्यसनमुक्ती केंद्र' येथे आलो आणि मला जगण्याची एक नवी दिशा मिळाली.
केंद्रातून मी जेव्हा पूर्णपणे व्यसनमुक्त होऊन बाहेर पडलो तेव्हा ,आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले करायचे ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती व त्याप्रमाणे करून दाखवले.
सुरूवातीला हे वेगळं जग स्विकारायला मला खूप त्रास झाला. पण हळूहळू सवय झाली. अपूर्ण असलेले शिक्षण पूर्ण केले, नोकरीला लागलो. माझ्यातील हा नवा बदल माझ्याप्रमाणे माझ्या कुटुंबालाही जीवन जगण्याचा खरा आनंद देऊ लागला.
आणि आता लग्न करून मी संसाराचाही आनंद घेणार आहे.सर यासाठी आशिर्वाद द्यायला तुम्ही लग्नाला नक्की यायचे ."
राजनचे हे सर्व बोलणे ऐकून श्रीकांत सरांना आनंद झाला होता व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. लग्नाला नक्की येईल असे सांगून त्यांनी राजनला आशिर्वाद दिला.
राजनही सरांचा आनंदाने निरोप घेत घरी परतला.
श्रीकांत सरांना बाहेर काम होते म्हणून ते गाडीत येऊन बसले. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि श्रीकांत सरांना राजनचे बोलणे आठवून आपला भूतकाळ आठवू लागला.
दिसायला देखणा व तल्लख बुद्धीमत्ता लाभलेला श्रीकांत घरात, नातेवाईकात व शाळेत सर्वांचा लाडका होता. तल्लख बुद्धिमत्तेमुळे शिकवलेले त्याचे लगेच लक्षात रहात होते. जास्त अभ्यास करायची त्याला गरज भासत नव्हती. इतर मुलांना त्याच्या बुद्धिमत्तेचा हेवा वाटायचा. त्यातील काही त्याच्या तोंडावर त्याचे कौतुक करायचे आणि पाठीमागे त्याच्यावर जळायचे.
मानवी गुणधर्मच आहे तो!
कोणाचे काही चांगले होत असेल तर जळणारे असतातचं!
श्रीकांतवर सरस्वती मातेचा वरदहस्त होता,म्हणून तो वर्गात नेहमी पहिला यायचा आणि दहावीलाही तो बोर्डात आला होता.त्याच्या या यशामुळे कुटुंबाला,शाळेला आनंद झाला होता आणि त्यांना त्याचा अभिमानही वाटत होता.दहावी नंतर श्रीकांतने कॉलेजला अकरावी साठी प्रवेश घेतला आणि पुढे आयुष्यातील एक वेगळाचं टर्निंग पॉइंट त्याची वाट पाहत होता.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.