मराठी कथा, लेख

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

नवी आशा( भाग 2 )


दहावी  चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व बोर्डात आलेल्या श्रीकांतने विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेतला.घरची परिस्थिती साधारण होती. खूप गरीबही नाही आणि खूप श्रीमंतही नाही. खाऊनपिऊन समाधानी कुटुंब होते. आपल्या मुलांच्या आनंदात आपला आनंद मानणारे आईबाबा व आईवडिलांच्या इच्छेला मान देणारे श्रीकांत व त्याची लहान बहिण , अशी  गुणी मुले.

श्रीकांतच्या बुद्धीमत्तेमुळे त्याला डॉक्टर करण्याचे स्वप्न त्याच्या आईबाबांनी पाहिले होते आणि तो आपले स्वप्न पूर्ण करेल असा त्यांना विश्वास होता.त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली व चांगले कोचिंग लावले.

शाळेतून कॉलेजच्या विश्वात आलेल्या श्रीकांतला कॉलेजचे विश्व आवडू लागले. या विश्वात त्याला नवे मित्रही मिळाले. दहावीला बोर्डात आल्याचा व आपल्या बुद्धिमत्तेचा श्रीकांतला अभिमान होता. करियर तर होईलच आपले ..पण थोडेसे कॉलेज लाइफ तर एन्जॉय करू.. असे त्याला वाटू लागले.नव्या मित्रांची मैत्री आवडू लागली. अकरावीचं तर वर्ष आहे,ते तर आपण पास होणारचं आहोत, बारावीला गेल्यावर करू अभ्यासाला सुरूवात असे त्याचे तरुण मन त्याला खुणावू लागले. त्यामुळे मित्रांसोबत हिंडणे,फिरणे, मूव्हीला जाणे, बाहेरचे खाणेपिणे सुरू झाले. त्याचे बदललेले वागणे पाहून आईवडील त्याला बोलू लागले.


या वयातील मुलांना कसे बोलायचे,कसे समजावयाचे ? हा आईवडिलांना प्रश्न पडतो. काही चांगले सांगायला गेले तर,

'किती उपदेश,किती सल्ले देतात ..आता आम्ही लहान नाही आहोत..आम्हांलाही कळते, काय चांगले आणि काय वाईट ..आम्हांलाही आमचे स्वातंत्र्य आहे ना....'

असे मुलांकडून ऐकायला मिळते.

त्यांच्याशी   रागात बोलले, कठोरपणे वागले तर ,

आईवडिलांना घाबरून काही गोष्टी सांगतच नाही आणि जीवाचे  काही बरेवाईट करून घेण्याची भीती असते.

नुकत्याच तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलांना अनेक गोष्टींचे आकर्षण वाटत असते आणि त्याकडे ते ओढले जातात.


"श्रीकांत, तू खूप हुशार आहेस .तू तुझी हुशारी अशी वाया नको जाऊ देवूस. तुझ्या आयुष्याचा हा एक टर्निंग पॉईंट आहे, येथे तू मार्ग चुकलास तर तुझे भविष्य धोक्यात येईल. चांगला अभ्यास कर. चांगल्या मित्रांची  सोबत कर आणि आपले आयुष्य चांगले घडवं."


श्रीकांतच्या आईबाबांनी त्याला असे बोलून चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.


अकरावी तर तो कसातरी पास झाला. पण त्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसे गुण न मिळाल्याने आईवडिल नाराज झाले होते. त्यांना वाईट वाटत होते. पण श्रीकांतला त्याचे काहीही वाईट वाटत नव्हते. ना गुण कमी मिळाल्याचे ना आईवडिलांना वाईट वाटण्याचे !

आपल्या मुलांचे आयुष्य चांगले व्हावे यासाठी आईवडिल मुलांवर चांगले संस्कार घडवत असतात. पण मुले  मोठी  झाल्यावर आणि ते जेव्हा  बाहेर पडू लागतात , तेव्हा कोणत्या मित्रांसोबत राहतात यानुसारही त्यांच्या आयुष्यावर परिणाम होत जातो. 

श्रीकांतला घरातून चांगले संस्कार मिळत होते.पण मित्रांच्या वाईट संगतीमुळे त्याचे आयुष्य बिघडत चालले होते.अभ्यास,कॉलेज, क्लास या आनंदापेक्षा त्याला मित्रांच्या सोबतीचा आनंद जास्त आवडू लागला. त्या आनंदालाचं तो जीवनाचा खरा आनंद समजू लागला होता  आणि आपल्या मित्रांच्या विश्वात आपले विश्व शोधू लागला होता.


क्रमशः


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...