मराठी कथा, लेख

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

खरी मैत्री ( भाग 1 )


लग्नानंतर पाच वर्षे भाड्याच्या घरात राहिल्यानंतर अश्विनी स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहायला गेली. अश्विनीचा नवरा मुंबईत कंपनीत नोकरीला होता. आईवडील  कधी गावाकडे तर कधी मुंबईत येऊन राहायचे. पण त्यांना मुंबईचे हवामान सहन होत नसल्याने ते गावीच जास्त राहत होते.


अश्विनीने  लग्नानंतर काही वर्षे  नोकरी केली पण आरूषच्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली व आरूषला आपला पूर्ण  वेळ देवू लागली.


नव्या सोसायटीत कोणी ओळखीचे नव्हते. सर्व अनोळखीचं होते. त्यामुळे नव्या घरात ,नव्या सोसायटीत रूळायला थोडा वेळ लागणार होता.

सकाळची कामे ,दुपारचा आराम झाला की, अश्विनी आरूषला संध्याकाळी सोसायटीच्या गार्डन मध्ये खेळायला आणू लागली. गार्डन मध्ये काही आरूषच्या  वयाची तर काही थोडी मोठी मुले यायची. त्यांच्याबरोबर त्यांच्या आई पण असायच्या. 

मुले खेळता खेळता एकमेकाशी बोलायची,हसायची ...आणि त्यामुळे  त्यांची  पटकन मैत्री पण झाली. 


लहान मुले निरागस ,निष्पाप ,निःस्वार्थी असतात. त्यांना फक्त प्रेमाची भावना कळत असते. त्यामुळे त्यांची कोणाशीही लवकर मैत्री होते. पण 

जसेजसे वय वाढत जाते..अनुभव यायला लागतात,मोठ्यांची शिकवण मिळत जाते.तसतसे मनात अनेक प्रश्न तयार होत असतात आणि निष्पाप, निरागस,अल्लड मन कधी स्वार्थी, व्यवहारी होऊन जातं कळतही नाही.


मुलांची मैत्री झाली होती पण अश्विनीची  त्या मुलांच्या  आईंशी हाय,हॅलो पर्यंतच ओळख झाली होती.


असेचं दिवस जात होते..

आरूषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अश्विनीने  सोसायटीतील आरूषच्या  मित्रांना बोलावले आणि त्यांच्या आईवडिलांनाही बोलावले. 

वाढदिवस खूप छान झाला. लहानांसारखे मोठ्यांनीही खूप एन्जॉय केला. हसणे,बोलणे,गप्पा गोष्टी यात इतके रंगले की, जसे आपण एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहोत ,असेच सर्वांना वाटत होते.

खरचं काही नात्यांना जुळायला वेळ लागत नाही. मन जुळले की नाते जुळते आणि मैत्रीचे नाते असेचं असते.


अश्विनीला तिच्या सोसायटीत मैत्रीचे नाते गवसले होते आणि हळूहळू ते नाते फुलत चालले होते


मुलांचे वाढदिवस, गणपती, सत्यनारायण पूजा ,हळदीकुंकू या निमित्ताने एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. गाठीभेटीतून विचार, स्वभाव कळत गेले ...जुळत गेले आणि अहो ताई वरून झालेली ओळख अगं मीरा, अगं सविता पर्यंत पोहोचली आणि अश्विनी, मीरा,सविता,अर्चना, प्रतिभा ,सीमा यांची घट्ट मैत्री झाली. मुले तर नवीन मित्र मिळाल्याने खूश होतेचं पण त्यांच्या आया  त्यांच्यापेक्षा जास्त खूश होत्या. त्या सर्व आपल्या मैत्रीचा भरपूर आनंद घेत होत्या. मूव्हीला जाणे, शॉपिंगला जाणे. पिकनिकला जाणे. किट्टी पार्टी करणे. मस्त मजा करत होत्या.सर्व खूप आनंदी, उत्साही होत्या. यापूर्वी कधीही न भेटलेल्या, एकमेकींसाठी अनोळखी असलेल्या त्या सर्व मैत्रीणी मैत्रीच्या नात्याचा मनसोक्त आनंद घेत होत्या.


क्रमशः


नलिनी बहाळकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...