मराठी कथा, लेख

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

खरी मैत्री ( भाग 2 )

 

जीवनात सुखाबरोबर दुःख ही असते. चांगल्या अनुभवाबरोबर वाईट अनुभव ही येत असतात. नातेवाईक, मित्रमंडळी यातही काहींशी खूप छान जमते,त्यांच्याशी चांगली  बॉंडींग होते, अशी नाती आयुष्यभर आनंद देते. पण प्रत्येक नात्यात ,मित्रमंडळीत एखादी तरी व्यक्ती अशी असते की, त्या व्यक्तीला  सांभाळून घ्यावे लागते, त्या व्यक्तिशी नाते कसेतरी निभवावे लागते.त्या व्यक्तीचे वागणे,बोलणे,स्वभाव आवडत नसला तरी नातेवाईक म्हणून ,मित्रमैत्रीण म्हणून त्या व्यक्तिशी चांगले वागण्याचा प्रयत्न करावा लागतो.

काही वेळेस काही नाती घाईघाईत इतकी पटकन जुळतात आणि नंतर एकमेकांचे  स्वभाव, गुण दोष कळायला लागले की मगं नात  तुटायला ही वेळ लागत नाही. काहीजण मनापासून नाते निभावतात पण काही स्वार्थासाठी नाते बनवतात आणि नात्यांचा उपयोग करतात. आणि वेळ आली की मग आपले खरे रूप दाखवतात.


अश्विनी आणि तिच्या मैत्रीणींचा छान ग्रुप तयार झाला होता. पण त्यांच्यात सीमा ही थोडी वेगळीच होती. इतरांपेक्षा ती थोडी जास्त श्रीमंत होती. त्यामुळे की काय, किंवा मुळात तिचा स्वभावच तसा होता की काय.. बोलण्यात उद्धट होती, कोणाला स्वतः काही मदत करायची नाही पण इतरांकडून मात्र मदतीची अपेक्षा ठेवायची, स्वतःच्या घरी कधी कोणाला खाऊपिऊ घालत नव्हती पण इतरांकडे जाऊन हक्काने खायची प्यायची. स्वभावाने तापट होती. 

सुरूवातीला बाकी मैत्रीणींना तिच्याबद्दल कळले नाही पण जसेजसे अनुभव येत गेले तसे तिच्याबद्दल कळत गेले. बाकी  मैत्रीणींचे स्वभाव छान जुळले होते. त्या एकमेकांना निःस्वार्थ मदत करत होत्या. सीमाच त्यांच्यात गैरसमज निर्माण करत होती. सर्वांना हे समजत होते पण तिच्याशी  एकदम  संबंध तरी कसे तोडायचे? हा ही प्रश्न होताच. ती तशी होती पण या सर्व मनाने खूप चांगल्या होत्या. आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेत होत्या. सीमाचे वागणे आवडत नसले तरी तिच्या मुलांवर प्रेम करायच्या,त्यांचे लाड करायच्या .


पण कधीना कधी खरा मुखवटा बाहेर पडतोच .

सीमाचेही असेच झाले.

 

तिच्या मुलाचे मीराच्या मुलाशी खेळताना  थोडे भांडण झाले. भांडण कसले लहान मुलांमध्ये ! एकीकडे भांडतातही आणि दुसरीकडे पुन्हा खेळायलाही लागतात. 

पण सीमाने त्या लुटुपुटूच्या भांडणाचा राईचा पर्वत केला आणि मोठ्यांनाही त्यात ओढले. मीरावर आणि इतर मैत्रीणींवर नको ते आरोप केले.त्या  तिला सर्व सांभाळून घेत होत्या आणि उलट तिचं सर्वांना दोष देत होती. त्यामुळे सर्व मैत्रीणींना तिचा खूप राग आला .तिच्याशी बोलणे बंद केले. सर्व व्यवस्थित शांत होत होते. पण सीमा प्रत्येकीला मेसेजेस करून त्रास देवू लागली. मग सर्वांनी तिचा नंबर ब्लॉक केला. हे करताना त्या सर्वांना वाईट वाटत होते. 

नाते जुळवणे सोपे असते पण टिकवून ठेवणे अवघड असते. 

सीमाच्या वागण्याचा सर्वांनाच त्रास झाला होता. आपण तिच्या शी इतके चांगले वागुनही तिने आपल्याशी असे वागावे ? याचे सर्वांना वाईट वाटत होते.

जीवनात असे लोक येतात आणि खूप मोठा अनुभव देऊन जातात. 


सीमाच्या अशा वागण्यामुळे,

सीमाशी नंतर कोणीही कोणता संबंध ठेवला नाही. ती  सोसायटीच्या इतर स्त्रियांशी बोलू लागली. त्यांच्याशी चांगले संबंध बनविण्याचा प्रयत्न करू लागली. 


अश्विनी आणि तिच्या मैत्रीणींना या दुःखद अनुभवातून सावरायला वेळ लागला. पण वाईट व्यक्ती साठी आपली मैत्री ,आपले आयुष्य का दुःखात ठेवायचे?  उलट 'जे होत ते चांगल्यासाठी होत' असे समजूया आणि आपल्या मैत्रीचा आनंद घेऊ या. असे सर्वांनी ठरवले आणि त्या पुन्हा छान आनंद घेऊ लागल्या.

काही व्यक्तींच आपल्या आयुष्यात असणं 

खूप महत्त्वाचं असतं

आणि काही व्यक्तींच  आपल्या आयुष्यात नसणं हेचं चांगल ठरतं.


समाप्त



नलिनी बहाळकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...