"आई,थंडी वाजते आहे का? "
या प्रश्नाला सासूबाई काही उत्तर देण्याच्या आतचं सूनबाईने आपल्या जवळील बॅगेतून शाल काढली व सासूबाईंच्या अंगावर घातलीही.
हे दृश्य पाहून स्नेहाच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
खरचं आजच्या काळात इतकी काळजी घेणारी सून मिळणे म्हणजे भाग्यचं!
आपल्याला सासूबाई असत्या तर आपलंही इतकं जमलं असतं का त्यांच्याशी ? हा ही विचार स्नेहाच्या मनात येऊन गेला.
प्रसादच्या कंपनीतील त्याच्या मित्राकडे सत्यनारायणाची पूजा होती. त्याने कंपनीतील आपल्या सहकाऱ्यांना पूजेसाठी बोलावले होते.
स्नेहा व प्रसाद पूजेसाठी आले होते आणि लग्नानंतर पहिल्यांदा ती सर्वांशी वैयक्तिक भेटत होती त्यामुळे प्रसाद तिची सर्वांशी ओळख करून देत होता.
प्रसादच्या कंपनीत स्त्रियाही नोकरीला होत्या. त्याही आपल्या जोडीदाराबरोबर पूजेला आलेल्या होत्या.
नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असल्याने , स्मिता मॅडमने आपल्या सासूला बरोबर आणले होते. आणि त्या आपल्या सासूबाईंची इतकी काळजी घेत होत्या, ते पाहून स्नेहाला त्यांच्याविषयी खूप आदर वाटला.सासूबाईही वागण्याबोलण्यातून प्रेमळ वाटत होत्या.
पहिल्याचं भेटीत स्नेहाला स्मिता मॅडम आवडू लागल्या. दिसायला तर सुंदर होत्याचं पण सर्वांशी छान बोलत होत्या..सासूबाईंना काय हवं नको ते बघत होत्या.
स्नेहाही त्यांच्याशी छान बोलत होती. तिलाही त्यांच्याशी बोलून खूप छान वाटत होते.
गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, सर्वजण आपआपल्या घरी गेले.
सर्वांना भेटून स्नेहा खूप खूश होती.
लग्नाच्या दोन वर्षे अगोदरचं प्रसादची आई देवाघरी गेली होती. त्यामुळे स्नेहाला सासूबाईंचे प्रेम मिळाले नाही. पण आज स्मिता मॅडम व त्यांच्या सासूबाईंचे नाते पाहून आपल्यालाही सासूबाई हव्या होत्या.असे तिला वाटून गेले.
असेचं छान दिवस जात होते..
प्रसादच्या कंपनीतील सहकाऱ्यांकडे काही तरी निमित्ताने जाणे येणे सुरु झाले होते.
त्यामुळे स्नेहा सर्वांना छान ओळखू लागली होती.स्मिता मॅडम भेटल्या की, तिला खूप छान वाटायचे. त्यांच्या पतीचा स्वभाव ही स्नेहाला चांगला वाटला.
सुखी कुटुंब म्हणजे काय ? तर या कुटुंबाला पाहून सुखी कुटुंब म्हणावे ..असे स्नेहाला वाटायचे. प्रेम हाच कुटुंबाचा पाया असतो आणि यांचे एकमेकांवर एवढे प्रेम आहे, त्यामुळे हे कुटुंब नक्कीचं सुखी असावं. स्नेहाने यापूर्वी अनेक कुटुंब पाहिली होती जिथे सासू-सूना,नवरा-बायको यांच्यातील भांडणामुळे पूर्ण कुटुंबाला त्रास होत होता.
पण स्मिता मॅडमच्या कुटुंबासारखी प्रेमळ कुटुंब पाहिले की, प्रेमाचे व नात्यांचे महत्त्व कळते.असा स्नेहा विचार करायची.
एके दिवशी प्रसाद नेहमीप्रमाणे ऑफिसातून घरी आला आणि स्नेहाला म्हणाला.
"स्मिता मॅडम ने नोकरीचा राजीनामा दिला आहे. कारण काही सांगितले नाही. पण ऑफिसातील स्वाती मॅडमशी त्यांचे चांगले जमायचे.
स्मिता मॅडम नोकरी सोडून गेल्यामुळे स्वाती मॅडम खूप दुःखी होत्या आणि रडतही होत्या. आणि त्यांनी जे सांगितले ते ऐकून आम्हा सर्वांना शॉकच बसला.
स्मिता मॅडम खूप आनंदी व सुखी दिसत होत्या पण सासूबाई व नवऱ्याच्या वागण्यामुळे मनातून दुःखी असायच्या.आपले दुःख सर्वांना सांगून इतरांना दुःखी करू नये. असे त्यांना वाटायचे. फक्त स्वाती मॅडमजवळ आपले मन मोकळे करायच्या. आता नोकरी सोडून त्या माहेरी राहायला गेल्या आहेत. इतके दिवस सुखाचा, आनंदाचा मुखवटा घालून समाजात एक सुखी कुटुंब म्हणून त्या वागत होत्या. पण चांगले वागूनही सासूकडून,नवऱ्याकडून वाईट वागणूक मिळत असेल तर .. का सहन करत राहयचे? त्यापेक्षा वेगळे राहिलेले चांगले! लोक काय म्हणतील? या भीतीने त्या सर्व सहन करत होत्या. कुटुंबाची बदनामी होऊ नये ,याची त्या काळजी घेत होत्या. सासूबाई व नवरा दोघेही इतरांसमोर त्यांच्याशी खूप छान वागत होते. पण घराच्या चार भिंतीच्या आत त्यांचे खरे रूप फक्त स्मिता मॅडम यांनाच माहित होते.
समाजात किती स्त्रिया असतील ,ज्या स्मिता मॅडमप्रमाणे घरातील व्यक्तिंपासून दुःखी असतील आणि आपल्यापेक्षा कुटुंबाचा विचार करून अन्याय सहन करत असतील.."
स्वाती मॅडम कडून ऐकलेले सर्व प्रसादने स्नेहाला सांगितले.
प्रसादने सांगितलेले ऐकून स्नेहाला तर काय बोलावे हेचं सूचत नव्हते.
'दुरून डोंगर साजरे' , 'दिसतं तसं नसतं'
असे जे म्हटले गेले , ते खरचं असते. असे तिला जाणवायला लागले.
स्मिता मॅडम , त्यांचे मिस्टर व सासूबाई या सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर आले.
व्यक्ती आनंदी आहे का दुःखी हे चेहऱ्यावरून लगेच समजते. चेहरा न बोलताही सर्व काही सांगून जातो.
पण स्मिता मॅडमच्या आनंदी चेहऱ्यामागे एवढे दुःख असावे आणि त्यांच्या नवऱ्याच्या व सासूबाईंच्या साध्या, सरळ चेहऱ्यामागे विकृत रूप असावे.
याची स्नेहाला कल्पनाही आली नव्हती.
पण आता जे झाले ते बरे झाले. स्मिता मॅडमने हा निर्णय घेऊन चांगले केले. त्या हुशार आहेत . नोकरी करून आपले आयुष्य सुखाने जगू शकतील.पण या मोठ्या अनुभवाने त्यांनाही खूप मोठी शिकवण दिली असेल .
जे दिसतं ते सर्व खरं नसतं
खरं खूप काही वेगळचं असतं..
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.