मराठी कथा, लेख

सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

माणुसकी

 

बाजारातून भाजी आणायची असेल किंवा इतर सामान माधुरी बाहेर जाताना आपल्या सोबत नेहमी कापडी पिशवी नेत असते. घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूबरोबर येणाऱ्या   प्लास्टिक पिशवीचा वापर टाळणे व पर्यावरणाचे रक्षण करणे. या हेतूने ती आपल्या कडून होईल तेवढे प्रयत्न करत असते.

आजही भाजी आणण्यासाठी पिशवी घेतली,पर्स उचलली व मैत्रीणीचा  फोन आला म्हणून फोनवर बोलता बोलता घराच्या बाहेर पडली.फोनवरचे बोलणे संपताच ती नेहमीच्या भाजीवालीकडे जाऊ लागली. थोडे अंतर पुढे जाताच एका बाईने तिला थांबवत विचारले,

"रेल्वे स्टेशन कुठे आहे ? "


माधुरी- " इकडून सरळ गेले की स्टेशन येते."


ती बाई- " आम्हांला थोडी मदत करता का ? आम्ही फार दुरून आलो आहोत. घरी जायलाही पैसे नाही. दोन दिवसापासून काही खाल्ले नाही. काही मदत करा हो ताई गरीबाची. "


माधुरीला त्या बाईचा केविलवाणा चेहरा पाहून दया आली आणि तिला काहीतरी पैसे द्यावे म्हणून तिने पर्समध्ये पाहिले. पण आज निघताना फोनच्या गडबडीत पैसे घ्यायचे विसरली होती. त्यामुळे त्या बाईला मदत करण्याची इच्छा असूनही ती तिला काही देऊ शकली नाही आणि 'माफ करा' म्हणून पुढे निघून गेली.


माधुरी भाजीवालीकडे पोहोचते न पोहोचते तोच,भाजीवालीने तिला विचारले, 

" काय विचारत होती ती बाई, ती तुमच्याशी बोलत होती तेव्हा माझे लक्ष गेले तुमच्याकडे ."


माधुरी - "स्टेशन कुठे आहे विचारत होती आणि काही मदत करता का? असे म्हणत होती."


"अहो ताई, पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट, भाजी घ्यायला येत असलेल्या बाईला असचं एका बाईने काहीतरी विचारात गुंतवले आणि त्या बाईला काय झाले ते कळलेच नाही, तिने स्वतः हून आपल्या अंगावरचे दागदागिने, जवळचे पैसे सर्व काढून  दिले त्या बाईला. ती जेव्हा थोडे अंतर पुढे चालून आली तेव्हा  तिच्या लक्षात आले की, अंगावर दागिने नाहीत ,पर्समध्ये पैसेही नाही. त्या बाईला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण ती बाई तोपर्यंत कुठेतरी पसार झाली होती. 

तुम्ही बरं तिच्यापासून लवकर दूर झाले ते ...नाही तर तुमच्या बाबतीत ही असे घडू शकले असते."


आज आपल्याजवळ पैसे नव्हते , पण गळ्यात मंगळसूत्र ,हातात  सोन्याच्या बांगड्या होत्या, सोन्याचे कानातलेही होते. मी पण हे सर्व  त्या बाईला काढून दिले असते  तर ..


या विचाराने तर माधुरीला धक्काच बसला. 'बाप रे ! आपल्यासोबतही असे घडू शकले असते. त्या बाईला आपण काही मदत करू शकलो नाही, याचे वाईट वाटत होते पण आता हे सर्व ऐकून मन सुन्न झाले. मदत मागण्याच्या आड आपली फसवणूक झाली असती म्हणजे? बरं झालं आपण वाचलो या मोठ्या संकटातून..

माधुरीचे मन अशा संमिश्र अवस्थेत होते. तिने त्याच मनस्थितीत एकदोन भाज्या घेतल्या व  पैसे आणायचे  विसरल्याने पुढच्या वेळी देते ,असे भाजीवालीला सांगून घरी परतली. 

घरी आल्यावरही माधुरीच्या डोळ्यासमोरून त्या बाईचा चेहरा जात नव्हता. खरचं त्या केविलवाण्या चेहऱ्यामागे काहीतरी कपट असेल का ? हा विचार तिच्या मनात सारखा येत होता. 

कधी वर्तमानपत्रातून ,कधी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या कडून तिने अशा फसवणुकीच्या घटनांविषयी ऐकलेले होते.

आज आपल्या बाबतीतही असेच काही घडू शकले असते. असे माधुरी विचार करू लागली. 

माणुसकीच्या नात्याने आपण ओळखीच्या लोकांना मदत करतोच पण काही वेळेस अनोळखी व्यक्तींनाही मदत करत असतो.पण समोरची व्यक्ती आपल्या चांगुलपणाचा,आपल्यातील माणुसकीचा गैरफायदा घेत असेल तर... आणि आपल्याच जीवाला त्यामुळे धोका निर्माण होत असेल तर... आपले मन  इतरांना मदत करायला तयार होईल का? सर्वांना अगोदर आपल्या जीवाची काळजी असते ना! आपण चांगले राहू तरच इतरांना मदत करू शकू ना !


आपल्या संस्कृतीत दानधर्म करणे,इतरांना मदत करणे या गोष्टींना खूप महत्त्व आहे. पुण्यांचे काम समजले जाते.आपल्यावर लहानपणापासून तसे संस्कार ही केले जातात. अडीअडचणी त एकमेकांना मदत करावी.दारापुढे कोणी मदत मागणारा आला तर त्याला मदत करावी.  

आपण अन्न, वस्त्र, पैसा अशा वेगवेगळ्या प्रकारे दानधर्म करून गरजूंची मदत करत असतो.देणाऱ्याला आपण पुण्यांचे काम केल्याचे समाधान मिळते व गरजूंची गरजही भागत असते.

भारतात आर्थिक विषमता बरीच असल्याने एकीकडे खूप श्रीमंती आहे तर दुसरीकडे तितकीच गरीबी !

त्यामुळे दानधर्म करून,इतरांना मदत करणारेही भरपूर आहेत व गरजवंतही खूप आहेत.

पण आजकाल विश्वासघात, फसवणूक, लुबाडणूक याप्रकारांमुळे खरा गरजवंत कोण ? हे समजण्यास अवघड झाले आहे. आपण माणुसकीच्या नात्याने समोरच्या व्यक्तिला  मदत करावी आणि त्याच्या भोळ्या चेहऱ्यामागील खरे रूप पाहण्यास मिळाले म्हणजे ...आपणच आपल्या पायावर धोंडा मारण्यासारखे होते. 

आपले पोट भरण्यासाठी भीक मागणारेही खूप असतात आणि चोरी करणारेही असतात. 

 आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी प्रत्येक जण काही तरी काम करतच असतो. पण इतरांना फसवून ,चोरी करून अशा अनेक मार्गांनी पैसे मिळवून जीवन जगणे याला खरचं जीवन म्हणतात का? 

फसवणुकीच्या घटना ऐकल्यावर,अनुभव घेतल्यानंतर आपला इतरांवर विश्वास राहील का? समोरच्या व्यक्तीला खरचं गरज आहे की तो आपल्याला फसवतो आहे ,हे कळणार तरी कसे ? आणि आपले संशयी मन कोणावर विश्वास ठेवेल का ? माणसातील माणुसकी जर हरवत गेली तर .. माणूस कोणाला म्हणायचे ? 


प्रत्येक वेळी वाईटच अनुभव येईल असे नाही. चांगले अनुभव,चांगले व्यक्ती भेटले की, कुठेतरी माणुसकी जिंवत आहे असे वाटते.

माधुरीच्या  मनात असे असंख्य विचार सुरू असताना शाळेतील  मैत्रीणींच्या ग्रुप वर एका मैत्रीणीने पाठविलेला ,

 'एका गरीब आईने तिच्या मुलाच्या महागड्या उपचारासाठी पैशांची मदत मागितली आहे .'

असा मेसेज वाचला.


माधुरीच्या मैत्रीणींनी माणुसकीच्या नात्याने आपणही काहीतरी मदत करू.  असे ठरवले होते. 

माधुरीच्या डोक्यात पुन्हा तोचं प्रश्न ...गरज की फसवणूक ? 



समाप्त 


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...