मैत्रीणीने तिच्या वाढदिवसाला बोलावले होते. तेव्हाचे वाढदिवस आतासारखे मोठे होत नव्हते. घरीच होत होते आणि ते ही अगदी साधेपणाने. आई औक्षण करायची व वाढदिवसाला आलेल्या मुलांना काहीतरी खाऊ दिला जायचा. दिले जाणारे गिफ्ट्स पण खूप महागडे नसायचे. वाढदिवस साधाचं असायचा पण त्यातही खूप आनंद असायचा.
मैत्रीणीने घातलेला नवीन ड्रेस खूप छान होता. मला खूप आवडला.
मी तिला म्हटलेही " किती छान गं तुझा ड्रेस!"
मगं मैत्रीण आनंदाने म्हणाली, " मैंने प्यार किया मधील हिरोईनचा पण असाच ड्रेस आहे. माझ्या आईबाबांना तो चित्रपट खूप आवडला.आणि त्यांनी माझ्यासाठी हा ड्रेस आणला. मला पण खूप आवडला."
मैत्रीणीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून माझ्या मनात आले,'मी पण आईबाबांना असाचं ड्रेस आणायला सांगते माझ्या वाढदिवसाला.' आणि या विचाराने माझ्या चेहराही आनंदी झाला.
पुढच्याच आठवड्यात माझाही वाढदिवस होता. आतासारखे इतके नवीन कपडे घेत नव्हतो. फक्त वाढदिवस आणि दिवाळीला नवीन कपडे घेतले जायचे. त्यामुळे नवीन कपड्यांसाठी दिवाळी व वाढदिवसाची खूप उत्सुकतेने वाट पाहयचो.
मैत्रीणीचा वाढदिवस करून घरी आल्यानंतर आईला मी तसाच ड्रेस घेण्याचे सांगितले.
माझे बोलणे ऐकल्यावर आई म्हणाली, "अगं पण मी व
बाबांनी तुझ्या वाढदिवसासाठी अगोदरचं नवीन ड्रेस आणला आहे. तुला तो नक्की आवडेल ."
आईने असे सांगितल्यावर माझे मन थोडे नाराज झाले. आता नवीन ड्रेस घेतल्यावर आईबाबा पुन्हा माझ्यासाठी नवीन ड्रेस घेतील का ?
या विचाराने माझे मन नाराज झाले होते.
आणि मी जर मला तोच ड्रेस हवा , असे सांगितले तर आईबाबा दोघेही रागावतील. म्हणून मी मनात असूनही तसे काही बोलली नाही.
वाढदिवसाच्या दिवशी आईबाबांनी आणलेला नवीन ड्रेस घालून मी तयार झाले. माझ्या मैत्रीणींना ही बोलावले. आणि त्या दिवशी माझ्या मावशीने वाढदिवसाला येऊन आश्चर्याचा धक्का दिला होता. तिला मुलगी नसल्याने ती माझे जास्त लाड करायची. प्रत्येक वेळी माझ्यासाठी काहीना काही आणायची. वाढदिवसाची भेट म्हणून तिने माझ्या हातात एक बॉक्स दिला आणि तो बॉक्स उघडून पाहताच मला खूप मोठा आश्चर्याचा धक्काचं बसला. कारण त्या बॉक्समध्ये होता ..तो ड्रेस जो मला हवा होता..मैंने प्यार किया मधील हिरोईनचा! माझ्या मावशीला चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. आणि तिला मैंने प्यार किया हा चित्रपट खूप आवडला होता. माझ्यासाठी ड्रेस आणण्यासाठी ती दुकानात गेली तेव्हा तिला हा ड्रेस दिसला आणि तिने तो पटकन घेतलाही. आणि माझ्या मनातील सुप्त इच्छा मावशीने नकळतपणे पूर्ण केली होती.
माझे लाड पुरवणारी ,मला नेहमीच आवडणारी माझी मावशी त्या दिवशी मला खूप जास्त आवडू लागली .
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.