मराठी कथा, लेख

सोमवार, २० मार्च, २०२३

माझा आवडता ड्रेस ( भाग 2 )

 माझ्या वाढदिवसाला अचानक येऊन मला सरप्राइज देणाऱ्या मावशीने मला हवा असलेला ड्रेस गिफ्ट म्हणून दिल्यानंतर मी तर खूप आनंदात होते. मला तर आकाश जणू ठेंगणेच झाले होते. 

देवावर असलेला माझा  विश्वास,अजून वाढला होता. 

आपल्या मनात जर एखादी चांगली इच्छा असेल तर देव ती कोणत्याही प्रकारे पूर्ण करतो. असे मला वाटू लागले.


माझा हा आनंद मी स्वतः पुरता ठेवला नाही तर माझ्या मैत्रीणींना तो ड्रेस आनंदाने दाखवत व्यक्त केला. 


त्या काळी  सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहणे वगैरे या गोष्टी  आमच्या घरात नव्हत्या.  टि.व्ही जास्त पाहत नव्हतो. तेव्हा मोजकेच कार्यक्रम असायचे आणि त्यात  आईबाबा अभ्यास करायला सांगत.  मैत्रीणींबरोबर खेळणे,वाचन वगैरे या गोष्टींत आमचा वेळ जात होता. 


मैंने प्यार किया मधील ड्रेस घातल्यापासून मला तो सिनेमा पाहण्याची इच्छा झाली. आणि ती कधी पूर्ण होते याची मी वाट पाहत होते.


अभ्यास, खेळ ,वाचन या गोष्टीत मला त्या गोष्टीचा विसरही पडला. 

आणि एके दिवशी अचानक माझ्या मैत्रीणीने तिच्या घरी मला सिनेमा पाहण्यास बोलावले. 

तिच्या आईवडिलांना सिनेमा पाहण्यास खूप आवडत होते. आवडते सिनेमे सिनेमागृहात पाहिल्यावर ते घरी व्हिडिओ कॅसेट आणून पाहत होते. 

मैंने प्यार किया हा सिनेमा त्यांना खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनी त्याची व्हिडिओ  

 कॅसेट आणली होती. माझ्या मैत्रीणीला  तो सिनेमा पाहण्याची माझी इच्छा माहित होती. त्यामुळे तिने मला तो पाहण्यास बोलावले.

तो सिनेमा मला आवडलाच पण हिरोईनने घातलेला तो ड्रेस पाहून मला जास्त आनंद होत होता.

सिनेमा पाहिल्यापासून, मी ही तो ड्रेस घालून त्या हिरोईन प्रमाणे डायलॉग बोलत होती. 

पण नंतर लक्षात आले..फक्त तसा ड्रेस घालून हिरोईन होता येत नाही.. तर अंगी तसे गुणही असावे लागतात.



अभ्यास, खेळ ,वाचन एवढेच विश्व असणाऱ्या माझ्या मनात सिनेमातील हिरोईन, त्यांचे कपडे,त्यांची हेअरस्टाईल वगैरे या गोष्टीही आवडू लागल्या. 

आणि शाळेनंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या स्वतः वर ट्राय करू लागली. 


आपण भारतीय लोक आपल्या टिपीकल देशी चित्रपटांमधून फॅशनची प्रेरणा घेत असतो. कारण भारतीय जनमाणसांवर बॉलिवूड चित्रपटांचा प्रभाव फारच मोठा आहे. आणि कलाकारांचा खूप मोठा चाहतावर्ग ही आहे. त्यामुळे ह्या कलाकारांनी जी नवी स्टाईल केली, नवा फॅशन ट्रेड आणला की,चाहत्यांना ते आवडते आणि ते ही तसेच करू लागतात.

90 च्या दशकातील चित्रपटातील फॅशन त्या काळात खूप चालली होती.


आम्ही मैत्रीणींमध्ये हा तर चर्चेचा विषय असायचा. कोणत्या हिरोईनने कसा ड्रेस घातला, कशी हेअरस्टाईल केली ..वगैरे.

मगं आम्ही पण तसे करत असू. घरातील व्यक्तिंना आमचे हे वागणे थोडे वेगळे वाटायचे. पण आम्ही सांगायचो,"ही तर आता फॅशनच आहे."


खरचं बॉलिवूडमध्ये आजपर्यंत भारत आणि भारतीय घरांमध्ये फॅशनची एक प्रमुख प्रेरक शक्ती आहे.


काळ बदलला, परिस्थिती बदलली . कॉलेज,शिक्षण यानंतर लग्न ,संसार यात गुंतत गेलो. काळाप्रमाणे बदलणे ही मानवी प्रवृत्ती असते. काळाप्रमाणे कपडे,हेअरस्टाईल, दागदागिने, राहणीमान बदलत गेले आणि त्यानुसार आपणही स्वतः त बदल करत गेलो. 

बॉलिवूडच्या फॅशनचा  प्रभाव पूर्वीपासून  आतापर्यंत सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहणार. पूर्वी नवीन वाटणारी फॅशन आता ओल्ड फॅशन वाटते. आताची नवीन फॅशन काही दिवसांनी, वर्षांनी ओल्ड फॅशन म्हणून ओळखली जाईल.

शालेय जीवन,कॉलेज आणि  नंतर संसारातील गृहिणी इथपर्यंतच्या प्रवासात बॉलिवूड च्या हिरोईन प्रमाणे फॅशन करण्याचा प्रयत्न करत गेली. आनंद घेत गेली. पण ज्या गोष्टीमुळे मला याचे वेड लागले तो माझा आवडता ड्रेस माझ्या नेहमीच लक्षात राहिला. 


समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...