मराठी कथा, लेख

मंगळवार, २१ मार्च, २०२३

कणा

 'ओळखलात का सर मला'  पावसात आला कोणी..

कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी


क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून;

'गंगामाई'पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन


माहेरवाशीण पोरीसारखी ,चार भिंतित नाचली

मोकळ्या हाती जाईल, कशी बायको मात्रा वाचली


भिंत खचली , चूल विझली, होते नव्हते नेले

प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे  ठेवले



कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता शालेय अभ्यासक्रमात होती. शाळेत असताना परीक्षेसाठी अभ्यास म्हणून वाचलेली,अभ्यासलेली ही कविता आयुष्यात येणाऱ्या खऱ्या परिक्षांसाठीही मला नेहमीच प्रेरणा देत गेली. 


नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि संसार उध्वस्त होतो. क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. पुराचे पाणी पाहून डोळ्यातही आसवांचा पूर येतो. अशा संकटसमयी त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात. 

सरांना भेटून तो आपली व्यथा सांगतो. त्याची व्यथा ऐकून त्याला मदत करण्यासाठी सरांचा हात खिशाकडे जातो. पण ते पाहून तो सरांना अडवतो आणि म्हणतो," मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागण्यासाठी आलो आहे. माझ्यावर आलेली अचानक व बिकट परिस्थिती पाहून माझे मन व्यथित झाले होते,मनाला एकटेपणा जाणवत होता. म्हणून आपले धीराचे दोन शब्द ऐकायला आलो आहे. माझा संसार जरी मोडून पडला तरी माझा पाठीचा कणा ( स्वाभिमान ) अजूनही ताठ आहे. तुमचा आशिर्वाद फक्त द्या . पुढची लढाई मी लढू शकतो. "


अशी ही प्रेरणादायी कविता प्रत्येकाच्या आयुष्यात निश्चितच प्रेरणा देऊन जाते. 

ही कविता प्रत्येक मराठी वाचकाच्या, मराठी मनाच्या जवळची आहे. साध्या, सरळ भाषेत मांडलेली ,शिक्षक व विद्यार्थ्यामधील संवादाच वर्णन आणि कठीण परिस्थितीतही आपला स्वाभाविक जपायला शिकवणारी, कितीही संकटे आली तरी धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणारी ही कविता .

जीवनात जेव्हा ही संकटे आली आणि ही कविता आठवली तरी जगण्याच बळ मिळतं,मनात एक नवीन आशा निर्माण होते. 

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात,इतरांची मदत घ्यावी लागते पण त्या मदतीच्या ,उपकाराच्या ओझ्याखाली आयुष्यभर न राहता...आपला स्वाभिमान आपण जपतं त्या अडचणीतून मार्ग काढायला हवा.


शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते फक्त शाळा,कॉलेज,अभ्यास, परीक्षा यापुरतेच नसते तर शिक्षकांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी विद्यार्थी आयुष्यात लक्षात ठेवतात.आपले जीवन यशस्वी करण्यासाठी त्यांचा उपयोग करत असतात. 


या कवितेत, विद्यार्थी व शिक्षक यांचे नात्यातील ताकद सांगितली आहे.


आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात. जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज भासते. मगं ती मदत कोणत्याही प्रकारची असू शकते. पैसा किंवा इतर काही गोष्टी . या गोष्टी आपण मदत म्हणून घेतो आणि नंतर त्यांना परतही करतो. 

पण काही वेळेस या सर्व गोष्टींच्या मदतीशिवाय अजून एका गोष्टीच्या मदतीची गरज असते...ती म्हणजे धीराचे दोन शब्द! 


आपण दुःखी असताना, संकटात असताना,जर कोणी धीराचे दोन शब्द ही सांगितले तरी  संकटाशी लढण्याची ताकद येते. मनात सकारात्मक विचार येतात . तेव्हा आपल्या साठी हे धीराचे बोल अमृतासमान वाटू लागतात. 

आयुष्यात आपण कितीही यशस्वी झालो तरी , आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपले शिक्षक आणि आपले हितचिंतक यांना कधीही विसरू नये कारण कधी काळी त्यांनी आपल्याला आपल्या संकटकाळी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदत केलेली असते.


प्रत्येक कवितेत एक गोष्ट लपलेली असते. एखादा विचार, एखादा प्रसंग किंवा एखादा क्षण ,जेव्हा कवी मनाला भावतो तेव्हा त्या कवी मनाच्या  भावना कवितेतून व्यक्त होत असतात.


वाचकाने कविता वरवर वाचली तर लवकर समजत नाही. पण व्यवस्थित वाचन केले तर त्या कवितेचा अर्थ, ती कविता लिहीण्यामागील कवीचा उद्देश कळतो, वाचकासाठी काहीतरी छान संदेशही  त्यात दडलेला असतो. 


मला वाचनाची लहाणपणापासून आवड होती. शाळेत असताना अभ्यास आणि अवांतर वाचनाची सवय होती. या वाचनाच्या छंदाचा जीवनात उपयोग होत असतो. कथा,कादंबरी, कविता वाचून मनाला आनंद तर होतोचं पण जगायलाही प्रेरणा मिळत असते.


'कणा' ही कुसुमाग्रजांची गाजलेली ,अनेकांच्या मनात घर करून असलेली  कविता, मला खूप आवडते .ही कविता मला जीवनात नेहमी स्वाभिमानाने, धैर्याने जगण्याचे बळ देते,प्रेरणा देते.



समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...