20 मार्च म्हणजे माझा आनंदाचा दिवस कारण 20 मार्च हा 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून जगभर साजरा होत असतो.
माझ्यासाठी हा खरचं आनंदाचा दिवस.. कारण सणसमारंभ,लहानमोठे उत्सव, महान लोकांच्या जयंती, पुण्यतिथी आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिवस हे सर्व जसे साजरे होत असतात. तसेच माझ्यासारख्या लहान पक्ष्यांच्या नावानेही एक दिवस साजरा व्हावा..यासारखा आनंद काही वेगळाचं!
आनंदाबरोबर मनात एक खंतही असते.. मी निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक असूनही,माझे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी,लोकांना माझे महत्त्व समजून सांगण्यासाठी एक दिवस साजरा करावा लागतो आहे...
माझ्या या बोलण्यातून मी कोण आहे ते आपण ओळखलेचं असेल...हो,ना?
हो, अगदी बरोबर ..'चिऊताई, चिऊताई, दार उघड ..' असे म्हणणारा कावळा व त्याला मदत करणारी मी . या
लहानमोठ्या अशा सर्वांच्या आवडत्या कथेतील मी चिमणी.
'चिऊताई, चिऊताई माझ्या अंगणात ये..'
'चिव चिव चिमणी छान...'
अशी कितीतरी गाणे,कविता माझ्यावर लिहिली गेली आणि लहान मुलांना शिकवली गेली.
कविता, गाणे याबरोबरच 'चिमणी व गोगलगाय','चिमणी व हत्ती' अशा अनेक गोष्टींतूनही मी मुलांना कळू लागली.
आता माझ्या बद्दल सांगायचे म्हटले तर ..सांगण्यासारखे खूप नाही पण थोडेसे सांगते..
भारतात सर्वांत जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून मी परिचयाची आहे. माणसाच्या अगदी जवळचा,ओळखीचा,परिचयाचा पक्षी!
माझे खाद्य म्हणजे कीटक, धान्य, मध,शिजवलेले अन्न, सूर्यफूलाच्या बिया इ.
गवत,कापूस, पिसे अशा मिळतील त्या वस्तू वापरून, घराचे छत,वळचणीच्या जागा,दिव्यांच्या मागे, झाडांवर कुठेही घरटे बांधते. विणीचा हंगाम वर्षभर करणारा पक्षी . अशी माझी ओळख आहे.
माझे आयुष्य जास्त नसते.6 महिने ते 3 वर्षांपर्यंत असते.
माझ्या बाबतीत एक वदंता आहे की, ' एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले ,तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला आपल्यात घेत नाही, चोचीने मारतात, बहिष्कृत करतात, प्रसंगी जीव देखील घेतात.'
त्यामुळे आम्ही माणसांपासून खूप घाबरून राहतो.
आम्हांला मानवी वस्तीपेक्षा निसर्गचं जास्त आवडतो.
पण आता मानवाने आपला विकास करण्यासाठी निसर्गावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे माझ्याप्रमाणे इतर पशुपक्षी यांचेही जीवन धोक्यात आले आहे.
जंगले तोडून मानवी वस्त्या बांधल्या गेल्या.
वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले आहे. या सर्वांचा परिणाम आमच्या जीवनावरही होतो आहे. वीजेच्या तारा,मोबाईलचे टॉवर यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि दिवसेंदिवस आमची संख्या कमी होत चालली आहे.
खेड्यागावांमध्ये तरी आम्ही लोकांना दिसत आहोत पण शहरात तर आम्ही खूप क्वचितच दिसतो.
शहरातील मुलांना आम्ही फक्त गाणे,गोष्टी,चित्रांतून दिसत असतो.
आता मॉडर्न काळात मराठी बालगीतांची जागा इंग्रजी बडबडगीतांनी घेतल्यामुळे, चिवचिव चिमणी ऐवजी 'टेडी बिअर टेडी बिअर' यासारखे गाणे ऐकू येत असतात.
निसर्ग नियमात माझे काय स्थान आहे. हे मी उदाहरण देऊन सांगते.
सन 1950 मध्ये चिमण्यामुळे चीन मधील पिकांचे होत असलेले नुकसान पाहून चिनी शासनाने चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले. या मुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या मारण्यात आल्या. परंतु याचे परिणाम उलट झाले. चीनमध्ये इतर किडे, जीवजंतू आणि मुंग्या ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हे किडे पिकांचे चिमण्या पेक्षा जास्त नुकसान करू लागले. आणि चीन मध्ये लोकांना अन्नाची कमी व उपासमारीची दिवस आले.
यावर उपाय म्हणून चीनने सोव्हिएत राष्ट्रसंघाकडून चिमण्या आयात केल्या.व हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली.
निसर्गातील एकही घटक नष्ट झाला तरी निसर्गाचा समतोल बिघडतो. हे यावरून सिद्ध झाले.
या घटनेपासून काही तरी शिकून यापुढे तरी निसर्गाचा प्रत्येक घटक वाचला पाहिजे.याची काळजी घेतली पाहिजे.
मानव हा इतर सर्व पशुपक्षी, प्राणी मात्रांपेक्षा प्रगत आहे. बुद्धिमान आहे. त्यामुळेचं तर मानवाने आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण आपली प्रगती करता करता इतर अन्य जीवांना, निसर्गाला धोका होणार नाही याची काळजी निश्चितच घेतली पाहिजे.
जागतिक चिमणी दिवस साजरा होत असल्यापासून, लोकांना माझे महत्त्व समजू लागले आहे. खेड्यागावांपासून मोठ्या शहरांपर्यंत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण आमची काळजी घेऊ लागले आहेत. आमच्या साठी पाणी,दाणे ठेवू लागले आहेत. घरटी बनवू लागली आहेत .मानवाचे आमच्यावरील हे प्रेम पाहून खूप बरे वाटत आहे आणि धन्यवाद द्यावेसे वाटत आहे.
आणि शेवटी एवढेचं सांगवेसे वाटते आहे,
विकासाच्या नावाखाली
नका करू पर्यावरणाची हानी
मिळावा आम्हांला दानापाणी
सदैव ऋणी राहील मी चिमणी
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.