मराठी कथा, लेख

बुधवार, २९ मार्च, २०२३

मीपणा

'आयुष्य किती जगलो यापेक्षा कसे जगलो! हे महत्त्वाचं!' 


वर्तमानपत्रातील साप्ताहिक पुरवणीतील लेख वाचताना विलासरावांचे लक्ष या वाक्याकडे गेले.

वाक्य वाचून ते आपल्या आयुष्याचा विचार करू लागले..खरचं आपण जे जगलो ते खरं आयुष्य.. की यापेक्षाही काही वेगळं जगलो असतो ..आपण आपले  आयुष्य ! आयुष्यात मी माझ्या मनाला वाटेल तसेचं करत गेलो. इतरांचा कधीही विचार केलाच नाही. माझे जीवन म्हणजे फक्त मी,माझेच खरे  या मीपणात माझे जीवन गेले.





विलासराव पाच भावांतील सर्वात लहान. त्यामुळे घरातील सर्वांचेच लाडके ! रूपाने देखणे होतेच आणि तितकेच हुशारही होते. त्यामुळे कोणी त्यांच्या रूपाचे,हुशारीचे कौतुक केले की,त्यांना आनंद तर व्हायचा पण त्यांची छाती गर्वाने फुलून जायची. इतर चारी भाऊही रंग,रूप,गुण,हुशारीने चांगलेच होते. पण विलासराव थोडे जास्तचं होते. त्यामुळे त्यांना स्वतः चे कौतुक करायला खूप  आवडायचे. 

 

एखाद्या व्यक्तिच्या चांगल्या गुणांचे कौतुक जरूर करावे पण ती व्यक्ती त्या गुणांचा गैरफायदा घेत  असेल तर इतरांना ते आवडत नाही. आणि इतरांनी त्या व्यक्तीला त्याच्या चुकीच्या वागण्याबद्दल बोललेच पाहिजे.


विलासरावांच्या घरातील मंडळींनाही विलासरावांच्या  वाईट वागण्याचा राग येत होता.

इतरांनी काही चांगले सांगितले तर  ते ऐकणारे नव्हते. फक्त त्यांच्या मनासारखे करायचे.कोणी त्यांचे ऐकले नाही,त्यांच्या मनासारखे झाले नाही तर आरडाओरड करायचे,रडायचे, जेवण करायचे  नाही . घरातील व्यक्तींना भावनिक त्रास द्यायचे  आणि आपल्या मनासारखं इतरांकडून करून घ्यायचे.


घरातल्यांना वाटायचे लहान आहे .मोठा झाला की आपोआप सुधारेल .

त्यांना असे वाटत होते तरी ते अधूनमधून विलासरावांना  समजाविण्याचा ,सुधारण्याचा प्रयत्न करत होते. 


विलासराव भावांबरोबर कधी बुद्धीबळ खेळत असतील ,पत्त्यांचा डाव मांडत असतील आणि त्यात हरले असतील तर स्वतः ची हार कधी मान्यचं करायचे नाही. इतरांना हरविण्यात त्यांना आनंद वाटायचा पण स्वतः हरले की, मगं जीवावर यायची आणि खेळचं बंद करायचे. 


आयुष्यात नेहमी आपलाच विजय होत नाही तर कधी हारही स्विकारावी लागते.


ही गोष्ट ते मान्य करतच नव्हते. 


सर्व भाऊ व्यवस्थित अभ्यास करत होते. पण विलासरावांना आपल्या हुशारीचा गर्व असल्याने  ते जास्त अभ्यास करत नव्हते. 


"अति आत्मविश्वासात नको राहू, कोणी कितीही हुशार असले तरी अभ्यास करावाच लागतो." 


आईवडील, भाऊ हे सर्व त्यांना समजावून सांगायचे. 

पण विलासराव आपल्याच माझेच खरे ,मीपणा या भूमिकेत असायचे. त्यांच्यावर इतरांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता.


विलासरावांचा अशा हेकेखोर स्वभावामुळे घरात,शाळेत सर्वांना त्रास होत होता.   


मी ,माझेच खरे  असे  वागत असणाऱ्या लोकांमुळे इतरांना खूप त्रास होत असतो. 


विलासरावांच्या अशा स्वभावामुळे घरातल्यांना टेंशन  आले होते.


विलासराव लहान होते,मोठे झाले की हळूहळू  सुधारतील.

असे घरातील व्यक्तिंना वाटत होते.


पण विलासरावांच्या  वागण्यात सुधारणा तर झालीच नाही उलट  त्यांचा स्वभाव अजूनच जिद्दी झाला. 

आपल्या अशा स्वभावामुळे आईवडील, भावांनी सांगितलेले त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष झाले आणि हुशार असूनही आपले चांगले करियर ते घडवू शकले नाही.

आपले एवढे नुकसान झाले तरी त्यांना त्याचा पश्चाताप नव्हता. त्यांच्यातील मीपणा कमी झाला नव्हता.

त्यांचे चारी भाऊ चांगले शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला होते व लग्न करून संसाराला लागले होते. 


प्रत्येकात जिद्द असावी पण चांगल्या गोष्टीची!  आणि इतरांनी सांगितलेले आपल्या फायद्याचे असेल तर ते ऐकूनही घ्यावे. 

पण ही गोष्ट विलासरावांना समजत नव्हती.याचेच सर्वांना वाईट वाटत होते.


विलासरावांनी चांगली नोकरी करावी किंवा एखादा व्यवसाय करावा. यासाठी आईवडील, भाऊ हे सर्व त्यांना सांगत होते. सर्वोतोपरी मदत  करत होते.


आपल्या मुलाची,आपल्या भावाची स्थिती पाहून त्यांना वाईटही वाटायचे आणि त्यांचा रागही यायचा. ते सर्व आपल्या  परीने त्यांना समजावून सांगण्याचा,मदत करण्याचा प्रयत्न करीत होते.


पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. त्याप्रमाणे आईवडील,भाऊ हे सर्व विलासरावांना सांगून, समजावून थकले होते आणि 

 ते  आपल्या संसारात लक्ष देवू लागले होते.


चारी भावांचे नोकरी,संसार सर्व व्यवस्थित चालू होते. हे पाहून नातेवाईक, समाजातील इतर लोक हे सर्व विलासरावांना न बोलता या सर्वांनाच बोलत होते.


"आपल्या भावाचेही पाहत जा,त्यालाही  नोकरी, व्यवसायाला लावून द्या.त्याचे  लग्न करून द्या." 


घरातील एखादी व्यक्ती वाईट वागत असेल तर त्या व्यक्तिला समाजाच्या बोलण्याचा त्रास होतो की नाही  हे माहित नाही  पण इतर लोकांना या त्रासाला सामोरे जावे लागते.हे सत्य आहे.त्यांना 

त्या व्यक्तिचा त्रास तर सहन करावा लागतोच आणि अजून लोकांचे टोमणे,बोलणेही ऐकावे लागतेच.


मुलगा म्हणून, भाऊ म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने घरातील व्यक्तिंना विलासरावांचे जीवन सुखात जावे  असे वाटत होते आणि त्यांचे प्रयत्न ही असायचे. पण विलासरावांच्या अशा स्वभावामुळे,आपल्या आयुष्याला ते स्वतः जबाबदार आहेत ..हे ही त्यांना माहित होते.


जोपर्यंत एखादी व्यक्ती आपले आयुष्य सुखी करण्यासाठी स्वतः हून प्रयत्न करीत नाही तोपर्यंत इतरांनी कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग होत नाही.


विलासरावांचे लग्न व्हावे म्हणून खूप प्रयत्नांनी विलासरावांना भावांनी व्यवसाय सुरू करून दिला.पण  त्यातही ते आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागले. 


विलासरावांचे नशीब चांगले की काय ? त्यांना मीनासारखी चांगली पत्नी मिळाली. 

आता लग्न झाल्यावर,संसाराच्या जबाबदारीमुळे विलासरावांच्या वागण्यात फरक पडेल असे घरातील व्यक्तिंना वाटू लागले.


मीना खरचं खूप समजूतदार होती त्यामुळे ती विलासरावांबरोबर संसार करत होती. पण 

संसार म्हटला की, नवरा बायको दोघांचा! दोघांनी एकमेकांचे ऐकून घेतले तर संसार सुखाचा! 


स्त्री सहनशील असते पण  सहन करण्यालाही काही मर्यादा असते.विलासरावांसारखा मी,माझेच खरे आणि मीपणा  असे तत्व असणाऱ्या व्यक्तिबरोबर संसार करणे म्हणजे खूपच अवघड! 


आपला पत्नीधर्म चांगल्या प्रकारे निभावणाऱ्या मीनालाही विलासरावांच्या अशा  स्वभावाचा राग येऊ लागला. संसारातील अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यत विलासराव माझेच खरे हा पवित्रा घेऊ लागले. 

जुळवून तरी किती घ्यायचे? असे मीनाला वाटू लागले आणि आपले व आपल्या श्रेयाचे भविष्य या घरात तरी चांगले होणार नाही. त्यामुळे मीना आपली मुलगी  श्रेयाला घेऊन कायमची माहेरी निघून  गेली. 

विलासरावांच्या घरातील व्यक्तिंची पुन्हा निराशा झाली.

आता तर त्यांनी विलासरावांना सांगणे,समजावणे सर्व सोडून दिले. त्यांचा स्वतः चा व्यवसाय होताच आणि आता  त्यांचे वेगळे घरही करून दिले. 


आपल्या चारी मुलांचे सुखाचे संसार पाहून आईवडील समाधानी होते. पण विलासरावांच्या वागण्याने त्यांचे आयुष्य पाहून दुःखी राहयचे आणि एकदोन वर्षाच्या अंतराने दोघांनीही या जगाचा निरोप घेतला.

आता भाऊही आपली नोकरी, संसार यातच व्यस्त राहू  लागले.विलासरावांशी फक्त कामापुरतेचं बोलू लागले. 


विलासरावांचे आयुष्य असेच एकटे जात होते. ते त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करून आपले एकटे जीवन जगत होते. नातेवाईक लोकही जास्त संबंध ठेवत नव्हते. फक्त कामापुरतेचं. 


आपल्या जीवनावर,आपल्या विचारांवर कोणाचा काही अधिकार नाही. आपण आपल्या जीवनाचे राजे आहोत. 

असेच विलासरावांना वाटत असायचे. 


जीवनात आपण स्वतः च्या आनंदासाठी जगतोच पण जीवन  जगत असताना.. कुटुंबाचा,नातेवाईकांचा,समाजाचा विचार तर करावाचा लागतो. 

आपलेचं खरे व  मीपणाची  भावना कायम ठेवली तर परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड होते आणि हळूहळू  लोकांशी,समाजाशी आपले  संबंध दुरावत जातात आणि जीवनात एकटेपणा येऊ लागतो. 

आपल्याला पाहिजे ते मिळवून ही एकटेपणामुळे आपण तो आनंद साजराही करू शकत नाही. 


नातेवाईक, मित्रमंडळी, समाज आहे . म्हणून तर आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे. सुखदुःखाच्या भावनांना अर्थ आहे. 

पण हे जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि उरतो फक्त पश्चात्ताप ! 


आज वर्तमानपत्रातील आयुष्यावरील वाक्य वाचून विलासरावांना ही नक्कीच आपल्या माझेच खरे व आपल्या मीपणा या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता आणि यापुढचे आयुष्य तरी  चांगले घालवू जेणेकरून आयुष्यातील आनंद सर्वांसोबत साजरा करू.  असे  त्यांनी मनाशी ठरवले.


 


समाप्त


नलिनी बहाळकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...