मराठी कथा, लेख

बुधवार, २९ मार्च, २०२३

जीवन एक रंगभूमी !

 व्यक्तिने किंवा समुदायाने ललितकथा सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी.


रंगभूमी म्हणजे कलाकारांसाठी असते एक पूजास्थान! 


रंगभूमी म्हणजे जिथे कलाकार आपले खरे स्वरूप,आपले खरे जग  विसरून एका वेगळ्या जगात वावरत असतो.जिथे वेगवेगळ्या भूमिकेसाठी  वेगळे रूप,वेगळे नाव कलाकाराला दिले जाते. कलाकाराला  जी भूमिका दिली जाते त्यासाठी त्याने  काय बोलायचे? कसे बोलायचे हे  त्याला सांगितले जाते. त्याला फक्त  आपल्यातील कलागुणांनी त्या पात्राला जिंवतपणा  द्यायचा असतो.आपली भूमिका इतकी छान पार पाडायची असते की, प्रेषकांना ती खरी वाटली पाहिजे. प्रेषकांच्या मनात ती उमटली पाहिजे. कलाकाराला आपली भूमिका चांगली झाली की नाही हे प्रेषकांच्या प्रतिसादातून कळत असते. प्रेषकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबरोबरच कलाकाराचाही उत्साह वाढत जातो.

प्रेषकांना माहित असते की, हे सर्व खरे नसते,तरी प्रेषकांना ते सर्व आवडत असते.

 

रंगभूमीवर कला सादर करणाऱ्या लोकांचे खरे आयुष्य  हे रंगमंचावरील आयुष्यापेक्षा वेगळे असते. ते आपले खरे जीवन आणि रंगभूमीवरील जीवन असे दोन्ही प्रकारचे जीवन जगत असतात. खऱ्या जीवनात कितीही दुःखे असली तरी रंगमंचावर हसत हसत त्यांना  आपली भूमिका पार पाडायची असते. 


रंगभूमीवर कला सादर करण्याची संधी प्रत्येकालाच मिळतेच  असे नाही. प्रत्येक व्यक्ती रंगभूमीवर जाऊन आपली कला दाखवू शकत नाही. पण प्रत्येक जण आपल्या अंतरंगातील रंगभूमीचा अनुभव, जीवनरूपी रंगमंचावर कधी ना कधी घेत असतो, इतरांनाही  दाखवत असतो.


अगदी छोट्या बाळापासून ते वयस्कर व्यक्तिपर्यंत.सर्वजण आपल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतात. 


भूक लागलेली असताना रडणारे बाळ,भूक भागताच लगेच हसायलाही लागते. एका क्षणात चेहऱ्यावरील हावभाव बदलून जातात.

हा अभिनय शिकायला ते कुठे जात नाही तर जन्मतःच आपोआप या गोष्टी होत असतात. हसणे,रडणे,राग,आनंद,दुःख  या भावना तर जीवनातील वेगवेगळ्या कृतीतून व्यक्त होत असतात. 


वय वाढू लागते तसे  प्रत्येक जण आपल्यात असणाऱ्या अभिनयाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करू लागतो. 


लहान मुलांना शाळेत जाण्याचा कंटाळा आला असेल ,अभ्यास करायचा नसेल तर ,आपण किती आजारी आहोत! हे आईवडिलांना चांगल्या प्रकारे पटवून देतात.


लहानांप्रमाणे मोठ्यांनाही आपल्या आयुष्यात आपल्या अंतरंगातील रंगभूमीचा अनुभव येतो. 


घरात कितीही गरीबी असली,दुःख असले तरी आईवडिलांना आपल्या मुलांसमोर आनंदी राहवेच लागते. 

दिवसभर काम करून थकलेली पत्नी,संध्याकाळी कामावरून आलेल्या पतीचे हसत हसत स्वागत करत असते.


कामाच्या ठिकाणी कितीही टेंशन असले तरी ,घरी परतताना बायकोसाठी, मुलांसाठी हसरा चेहरा करून जाणारा नवरा,बाप हा पण अभिनयच करत असतो.


सासरी दुःख सहन करणारी सासुरवाशीण जेव्हा माहेरवाशीण म्हणून माहेरी येते,तेव्हा आपल्या माहेरच्यांना सुखात ठेवण्यासाठी ..आपण सासरी किती सुखात आहोत ! हे आपल्या वागण्या बोलण्यातून दाखवत असते. 

याउलट माहेरची गरीबी, माहेरची परिस्थिती यामुळे सासरी हसू होऊ नये म्हणून सासुरवाशीण आपल्या माहेराचे कौतुकच करत असते. 


स्त्री ही कोणत्याही रूपात असली तरी तिला आपल्या मनातील खऱ्या भावना लपवाव्या लागतात. 

कधी मनात दुःखात असतानाही हसावं लागतं तर कधी मनात आनंद असतानाही  रडावं लागतं.


 नाटक,सिनेमे यातील कलाकार सर्वांना माहित असतात. पण जीवनात आपल्याला असे अनेक व्यक्ती भेटत असतात,ज्यांनी आपल्या चेहऱ्यावर अनेक मुखवटे धारण केलेले असते. त्यांचे खरे रूप कोणते? हे कोणालाचं समजत नसते. कधी गोड बोलून, कधी हसून तर कधी रडून इतरांच्या भावनांशी खेळून त्यांना फसवत असतात. 

रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळतात, ते त्यांचे कामच आहे. आपल्या अभिनयातून ते लोकांचे मनोरंजन करत असतात. प्रेषकांना आनंद देत असतात. त्यामागे कोणताही स्वार्थ, वाईट हेतू नसतो. पण खऱ्या आयुष्यात जे लोक आपल्या नाटकी स्वभावामुळे इतरांना त्रास देत असतात, त्यांना आयुष्यात काय मिळते ?

आपल्या आनंदासाठी इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून यांना मिळते तरी काय ? 


'दिसतं तसं नसतं' याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे पहिल्यांदा आपल्याला वेगळेच वाटतात पण प्रसंगानुरूप त्यांचे खरे रूप कळू लागते. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती हा जीवनात छोट्या मोठ्या प्रमाणात अभिनय करतचं असतो. फरक एवढाचं कोणी चांगल्यासाठी तर कोणी स्वार्थासाठी! 

समाजात मान,प्रतिष्ठा मिळविण्यासाठी काही व्यक्ती लोकांसमोर खूप चांगली वागतात पण घरात त्यांचे वेगळेचं रूप असते.

असे दुहेरी जीवन जगणारे लोकही रंगभूमीवरील कलाकारांपेक्षा कमी नसतात.

जीवनात आपल्या ज्याही व्यक्तिंशी संबंध येत असतो मग ते नातेवाईक असो,मित्रमंडळी असो की अनोळखी ..त्याच्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक वेगळाच चेहरा जरूर लपलेला असतो. आणि प्रसंगानुसार आपल्याला त्याचे दर्शन घडत असते.


सर्वांप्रमाणे आपणही आपल्या जीवनात कधी खोटे हसून तर कधी खोटे रडून अभिनय करतच असतो. कुटुंबातील व्यक्तिसोबत एक आदर्श पत्नी, आई,सून अशी भूमिका. आणि माहेरी अल्लड,निरागस लहानमुलांसारखी.कामाच्या ठिकाणी शिस्तबद्ध भूमिका तर  मैत्रीणींमध्ये मस्तीखोर, नटखट. 

अशा किती भूमिका आपण वेगवेगळ्या प्रकारे पार पाडत असतो. कधी स्वतः साठी तर कधी इतरांसाठी!


शेवटी काय ? 



जीवन ही एक रंगभूमी आहे

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला आपली भूमिका पार पाडायची  असते

आपल्याला दिलेली वेळ संपताच,

शेवटचा श्वासाबरोबर एक्सिटही घ्यायची असते.


समाप्त

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...