मराठी कथा, लेख

रविवार, २१ जानेवारी, २०२४

ऐकावे जनाचे करावे मनाचे ( भाग 3 )

'सुनांचे जास्त कौतुक करू नये,त्यांना धाकात नाही ठेवले तर ..त्या आपल्याच डोक्यावर बसतात आणि मग नंतर  आपल्यालाच त्याचा त्रास होतो.


गोड गोड बोलून त्या आपल्या मुलांना कधी आपल्यापासून दूर करतात. हे कळतही नाही. त्यामुळे सुरूवातीपासूनच सुनेशी सासूप्रमाणेच वागावे.'


असे मैत्रीणींनी दिलेले सल्ले ऐकलेले होते आणि काही इकडच्या तिकडच्या 'घर घर की कहाणी' प्रमाणे सासू सुनांच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या.त्यामुळे मी ही प्रियाशी सासूप्रमाणे वागू लागली.आपला शैलेश आपल्यापासून खरचं दूर जाईल का?नेहमी मनात असा विचार यायचा. पण शैलेश हा प्रियाचा नवराही आहे. त्याच्यावर तिचाही हक्क आहे. हा विचार मनात एकदाही आला नाही.प्रिया खरचं खूप छान स्वयंपाक बनवायची;पण मी मुद्दामच त्यात चुका काढायची.प्रियाला या गोष्टीचे वाईट वाटत असेल..असे माझ्या मनाला का जाणवले नाही? मी स्वतः तर तिच्याशी चांगली वागली नाही आणि शैलेशला ही तिच्याशी चांगली वागण्याची कधी संधी दिली नाही. कारण इतर सासू-सुनांच्या गोष्टी ऐकून,मैत्रीणींचे सल्ले ऐकून माझे मन कलुषित झाले होते.आपल्या वागण्याचा प्रियाला रागही येत असेल पण ; तिने कधी आपल्याला तसे जाणवू दिले नाही. ती तिचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होती.कदाचित आपल्या व शैलेशच्या वागणुकीला कंटाळून ती आता इकडे येण्यास तयार नसावी.प्रिया सारख्या सुशील,संस्कारी सुनेला आपण घरी आणण्याचा नक्की प्रयत्न करू.'


प्रियाच्या सासूबाईंना आपल्या वागणुकीचा पश्चाताप होत होता.


शैलेशलाही आपण चुकत होतो. हे समजून आले होते. प्रियाला पुन्हा इकडे आणण्यासाठी आपण आईशी बोलू असे त्याने ठरवले.


आईचे व शैलेशचे त्याबाबतीत बोलणे झाले आणि मध्यस्थांच्या मदतीने प्रियाच्या आईवडिलांशी बोलू .असा त्यांनी निर्णय घेतला.


इकडे प्रियाच्या मनातही अनेक विचार येत होते, 'आपण तिकडे सासरी नाही गेलो..घटस्फोट घेतला ..तर पुढे काय करायचे ?  नाही म्हटले तरी आईवडिलांना आपले टेंशन येईलच आणि त्यांना त्रास झालेला मला आवडणार नाही. अजून भावाचेही लग्न राहिले आहे. माझ्यामुळे त्याच्या लग्नाला काही प्रॉब्लेम नको यायला.समजा झालेही लग्न ..आणि येणारी वहिनी चांगली असली तर ठिक ,नाही तर माझ्या मुळे भावाच्या संसारात वादविवाद व्हायचे.स्वतः वेगळे राहून,नोकरी करून स्वतंत्र राहिले तरी समाजाच्या आपल्याकडे बघण्याच्या नजरा चांगल्याच असतील कशावरून? दुसरे लग्न केले आणि ते करूनही जर अजून प्रॉब्लेम वाढले म्हणजे ..आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे होईल.

त्यामुळे  एकदम टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ..एक संधी म्हणून मी सासरी राहून बघते. काही चांगला बदल वाटला तर छानच ..आणि नाही काही झाला तर...मग बघू पुढे काय करायचे ते..' 



प्रियाला सासरी पाठवावे किंवा नाही याविषयी इतरांकडून वेगवेगळे सल्ले मिळत होते.काहींनी प्रियाला सासरी पाठवूच नका तर काहींनी एक संधी म्हणून प्रियाला सासरी पाठवण्यास सांगितले होते.प्रियाच्या आईवडिलांनी प्रियाला सांगितले.

"प्रिया, ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीप्रमाणे - 

तू ही तुझ्या मनाला जे योग्य वाटते तेचं करं. आमच्या सर्वांचे काम  फक्त समजवण्याचे,सांगण्याचे,

सल्ले देण्याचे आहे. पण त्या घरात तुला राहायचे आहे ; त्यामुळे निर्णय तुलाच घ्यायचा आहे.सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात, मनासारख्या मिळतही नसतात..कुठेतरी,काहीतरी ऍडजस्टमेंट करावीच लागते. पण सासरी खूप त्रास होत असेल तर तू लगेच माहेरी येऊ शकते.आम्ही तुला मदतच करू.आताही तू सासरी जावे.असे आम्ही सांगत नाही. तू जो निर्णय घेणार तो आम्हांला मान्य आहे. आमचा तुझ्यावर ,आमच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे."


आईवडिलांनी छान समजून सांगितले आणि आपले मनही आपल्याला सासरी जाण्यास सांगत आहे. या विचाराने प्रियाने सासरी जाण्याचे ठरवले.


 प्रियाच्या आयुष्यात  भविष्यात पुन्हा कधी असा प्रसंग येऊ नये. असा आशीर्वाद देऊन प्रियाच्या आईवडिलांनी प्रियाला सासरी पाठवले. 


प्रिया आपल्या घरी आल्यामुळे सासूबाईं व शैलेशला खूप आनंद झाला होता.इतरांचे चुकीचे सल्ले ऐकून आपल्या घरात दुःख निर्माण करण्यापेक्षा आपल्या मनाला जे योग्य वाटते..तेचं करावे आणि घरात आनंद आणावा. हे त्यांना कळाले होते आणि 

'ऐकावे जनाचे करावे मनाचे' या म्हणीची प्रचितीही आली होती.



समाप्त


नलिनी बहाळकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...