"अगं रूपाली,थांब जरा ..तू आज खूपचं सुंदर दिसते आहेस.तुला कुणाची नजर लागू नये म्हणून मी तिट लावून देते."
आईने असे म्हणताच,रूपाली थांबली व तिने आईकडून तिट लावून घेतली.
"काकू,काकू..मला ही लावा ना तिट." रूपालीची चुलत बहीण निशा रूपालीच्या आईला उत्सुकतेने म्हणाली.
"अगं,तुला काय गरज आहे तिट लावण्याची.. कुणाची नजर तुला का लागेल? नजर तर सुंदर दिसणाऱ्यांना लागते आणि आपण दोघी सोबत असताना तुझ्याकडे कोणी बघणार आहे का?"
रूपाली निशाकडे बघत म्हणाली.
"निशा तुलाही लावते गं तिट."
रूपालीच्या बोलण्याने निशाचा पडलेला चेहरा पाहून,आपल्या मुलीची चूक सुधारण्यासाठी रूपालीची आई निशाला म्हणाली.
"रूपाली,असे नाही बोलायचे गं ..निशाला राग आला असेल ना ..तुझ्या बोलण्याचा." रूपालीच्या आईने रूपालीला समजावले.
"आई मी तर गंमतीने बोलली गं..तिला नाही वाईट वाटणार आम्ही मैत्रीणी पण आहोत एकमेकींच्या ; त्यामुळे आम्ही एकमेकींना असे गंमतीने बोलत असतो.अशा गंमतीने बोलण्याचा राग वगैरे येत नाही." आईला असे सांगत रूपाली व निशा घराबाहेर पडल्या.
निशाला रूपालीच्या बोलण्याचा राग येऊ नये,म्हणून रूपालीच्या आईने रूपालीची बाजू सावरत निशालाही तिट लावली आणि रूपालीला समजावले; पण त्यांना मनात वाटत होते,आपली रूपाली निशापेक्षा खरचं खूप सुंदर आहे आणि रूपाली खरं तेच बोलली होती.
रूपालीला आपल्या सौदर्यांचा खूप अभिमान होता आणि हळूहळू कधी त्याचे गर्वात रूपांतर झाले हे ही तिला कळाले नाही. आणि रूपालीच्या आईलाही रूपालीच्या सौदर्यांचा खूप अभिमान होता आणि ते त्यांच्या बोलण्यातून अनेकदा इतरांना जाणवत होते.
'मी गंमतीने म्हणाली.' असे जरी रूपाली म्हणाली होती.तरी निशाला तिच्या बोलण्याचे वाईट वाटले होते.पण रूपालीला काही न बोलता निशा तिच्या सोबत कॉलेजला गेली.
कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यामुळे सर्व मुले मुली छान तयार होऊन आले होते.छान छान ड्रेस, मेकअप यामुळे सर्व छान दिसत होते.
रूपाली मुळातच खूप सुंदर होती आणि आज कार्यक्रमानिमित्त छानसा ड्रेस व साजेसा मेकअप यामुळे अजून सुंदर दिसत होती व ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.तिला सर्वांकडून छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळत होत्या आणि यामुळे होणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता.
रूपालीला सर्व छान कॉम्प्लिमेंट्स देत होते;पण काही मुली अशा होत्या की,त्यांनी रूपालीला छान म्हणून कॉम्प्लिमेंट्स दिल्या पण नंतर एकमेकीजवळ म्हणत होत्या,
'रूपाली स्वतः ला खूपचं सुंदर समजते गं..सुंदर आहे म्हणून काय ॲटीट्युड दाखवत असते.'
'हो..ना..इतरांना तर काही महत्त्वच देत नाही.'
'फक्त पाहण्यातच आहे... अभ्यास वगैरे कशातच नाही.'
'तिच्याइतक्या नाही;पण आपणही सुंदर आहोतचं ना!'
निशा हे सर्व फक्त ऐकत होती.इतर मुलींप्रमाणे ती रूपालीबद्दल काहीही बोलत नव्हती.
तोंडासमोर गोड बोलणारे, कौतुक करणारे आणि नंतर पाठीमागे नावे ठेवणारे सर्वत्र असतात.
हे निशाला चांगलेच माहित होते.याबाबतीत आपण न बोललेच बरे! असे तिला वाटत होते.
रूपाली आपल्यापेक्षा खूप सुंदर आहे.यामुळे निशाला कधी वाईट वाटत नव्हते. आपल्याला जसे रंग, रूप मिळाले त्यात आपण समाधानी असावे.
प्रत्येक गोष्ट देवाने निर्माण केली आहे आणि देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट सुंदर असतेच.प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असते..ते फक्त बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असते.रंग,रूप,ठेवण यात थोडाफार फरक हा असतो.आणि इतरांच्या रंगारूपाचा,सौंदर्याचा हेवा करून आपल्या रंगरूपात बदल होणार आहे का? फक्त नशिबाने ज्यांना छान रंग,रुप,सौंदर्य मिळाले त्यांनी त्याचा आनंद जरूर घ्यावा पण त्यांनी त्या गोष्टीचा गर्व करून इतरांना तुच्छ लेखू नये. असे निशाला वाटायचे.
निशा रूपाली इतकी सुंदर नव्हती. पण जसे आहे त्यात समाधानी असणारी निशा अभ्यासात रूपालीपेक्षा हुशार होती. निशा आपल्या हुशारीचा,बुद्धीमत्तेचा कधी गर्व करत नव्हती. मैत्रीणी तिच्या हुशारीचे,बुद्धीमत्तेचे कौतुक करायच्या तेव्हा निशाला आनंद व्हायचा पण आपण इतरांपेक्षा हुशार आहोत म्हणून ती इतरांना कधी कमी लेखत नव्हती. उलट सर्वांना अभ्यासात मदत करायची,समजून सांगायची.निशा कधीच रूपालीच्या सौंदर्याचा हेवा करत नव्हती; पण रूपाली नेहमीच निशाच्या हुशारीचा हेवा करत होती. आणि इतर मैत्रीणी निशाच्या हुशारीचे कौतुक करायचे तेव्हा तिला वाईटही वाटायचे.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.