रूपाली खूप सुंदर होती.कॉलेजातील ज्या मुलांना तिच्या सुंदरतेची भुरळ पडली होती;त्यातील दोन तीन मुलांनी तिला प्रपोज केले होते.पण रूपालीने त्यांना काही भाव दिला नाही. रूपालीला अभ्यासात जास्त गोडी नव्हती. कसेतरी तिने कॉलेज पूर्ण केले. तिने कॉलेज पूर्ण केल्यानंतर घरात तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला होता.तिच्या आत्याच्या मुलाला ती खूप आवडत होती व रूपाली आपल्या घरची सून व्हावी ,अशी आत्याचीही इच्छा होती. आत्याने तसे एकदोनदा रूपालीच्या वडिलांकडे बोलूनही दाखवले होते.
रूपालीच्या आत्याचा मुलगा दिसायला रूपालीच्या मानाने साधारण होता व घरची परिस्थितीही ठीकठाकच होती.
आपला होणारा नवरा हा सुंदर,देखणा असावा.अशी रूपालीची इच्छा होती.आणि रूपालीच्या सासरची परिस्थिती चांगली असावी.अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती.त्यामुळे रूपालीचे आत्याच्या मुलाशी लग्न करण्याची ना रूपालीची इच्छा होती ना तिच्या आईवडिलांची.आत्याला वाईट वाटले तरी चालेल पण रूपालीच्या भविष्याचा विचार करून रूपालीच्या आईवडिलांनी आत्याला आपले म्हणणे सांगितले. ते ऐकून आत्याला वाईट वाटले;पण शेवटी सत्य परिस्थिती त्यांनी स्विकारली.
रूपालीला लग्नासाठी सांगून येणाऱ्या मुलांना रूपाली आवडत होती;पण मुलगा देखणा,सुंदर व घरची परिस्थितीही चांगली हे सर्व पाहता इकडूनच स्थळे नाकारली जात होती.असे करता करता शेवटी एकदा मनासारखे स्थळ भेटले.
रूपालीला व तिच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला होता.
लग्नात रूपाली अगदी दृष्ट लागावी इतकी सुंदर दिसत होती.आणि तिचा नवराही खूप छान दिसत होता.
'लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो आहे.' असे म्हणत लोक त्यांचे कौतुक करत होते.
'सासरी कशी वागते काय माहित? आपल्याशी तर कधी चांगली बोलली नाही ..की कधी चांगली वागली नाही. नेहमी तिच्या तोऱ्यातच असायची.नुसतं दिसायला सुंदर असून काय उपयोग ..स्वभाव ,वागणे,
बोलणे पण चांगले असायला हवे ना ? '
लग्नात आलेल्या रूपालीच्या माहेराकडील स्त्रिया बोलत होत्या.
लग्न करून रूपाली आपल्या संसारात रमायला लागली.
निशाला अभ्यासाची आवड होती. तिने कॉलेजनंतर बी.एड. केले. पुढे नोकरीसाठी प्रयत्नही करत होती.
एका भावाने तर त्याची मुलगी आपल्याकडे देण्यास नकार दिला म्हणून रूपाली व निशाच्या आत्या थोड्या नाराज होत्या. त्यामुळे आता दुसऱ्या भावाकडे निशाच्या लग्नाची बोलणी कशी करावी? हा प्रश्न त्यांच्या मनात होता. पण एक प्रयत्न करावा म्हणून त्यांनी त्यांच्या मुलासाठी निशाच्या आईवडिलांकडे निशाचा हात मागितला.
आत्याचा मुलगा शिक्षक म्हणून नुकताच नोकरीला लागलेला होता. घरची परिस्थितीही ठीकठाक होती.पण तरीही
निशाची संमती,मुलाचे शिक्षण व नोकरी यांचा विचार करून निशाच्या आईवडिलांनी निशाचे लग्न आत्याच्या मुलाबरोबर ठरवले.
रूपाली इतकी सुंदर नसलेल्या निशाचा रूपालीच्या नवऱ्याइतका देखणा,श्रीमंत नसलेल्या नवऱ्यासोबत संसार सुरू झाला होता.
घरात सासूबाईंची मदत होत होती त्यामुळे निशाने नोकरी करण्याचे ठरवले आणि घरातून तिला परवानगीही मिळाली.
'अंथरूण पाहून पाय पसरावे' याप्रमाणे निशा आपल्या घरातील परिस्थिती पाहून वागत होती. आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करत होती.निशाचे तिच्या माहेरी सर्वजण कौतुक करायचेच आणि आता सासरीही तिच्या गुणांचे,स्वभावाचे सर्वजण कौतुक करत होते.यामुळे निशाचा नवरा व सासूबाई एकदम खूश होते आणि 'जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं' असे त्यांना वाटायला लागले होते.
आपण रूपाच्यामागे धावतो होतो पण गुणांकडे कधी पाहिलेच नाही. असेही त्यांच्या मनात येत होते.
मनासारखा नवरा मिळाल्यामुळे रूपालीला तर स्वर्ग दोन बोटे राहिला आहे. इतका आनंद होत होता.तिची सर्व हौसमौज पूर्ण होत होती. नवरा ही तिच्या सौंदर्यावर खूश होता. रूपालीच्या सुंदरतेचे जेव्हा सर्व कौतुक करायचे तेव्हा सासूबाईही खूश व्हायच्या.
अगोदर रूप दिसते आणि नंतर स्वभाव, गुण समजतात. त्याप्रमाणे रूपालीचे रूप पाहून सर्वजण तर तिचे कौतुक करत होते;पण हळूहळू तिचा स्वभाव, तिचे गुण कळू लागले आणि मग तेव्हा 'आलिया भोगासी असावे सादर ' याप्रमाणे जसे आहे तसे स्विकारणे आणि पुढे काहीतरी चांगले होईल अशी आशा ठेवून सर्व चालले होते.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.