रूपाली व निशा जेव्हाही माहेरी यायच्या तेव्हा; रूपाली आपल्या सुखी संसाराचे,श्रीमंतीचे कौतुक करायची. मी किती सुखात आहे,मी किती भाग्यवान आहे! हे निशाला सांगायची.रूपालीची आईही रूपालीचे नेहमीच कौतुक करायची. निशाला व तिच्या आईवडिलांना त्या गोष्टीचा ना कधी राग यायचा ना कधी आपल्या परिस्थितीबद्दल वाईट वाटायचे.आपण किती चांगले आहोत...आपण किती सुखात आहोत. या गोष्टीचा दिखावा का करायचा? आपण चांगले की वाईट? हे आपल्या वागण्यातून लोकांना समजत असतेच ना! असे त्यांचे म्हणणे होते.
अगोदरच आपल्या सुंदरतेचा अन् सासरच्या श्रीमंतीचा गर्व असणाऱ्या रूपालीला एक सुंदर,गोंडस मुलगा होतो. मग आता तर विचारायलाच नको ...
देव सर्व सुखे आपल्याच पदरात टाकत आहे...असेच काहीसे रूपालीला झाले होते.
निशालाही एक छानशी मुलगी झाली. आपल्याला मुलगा का झाला नाही? म्हणून निशाला कधी वाईट वाटले नाही. मुलगी झाली याचाही तिला आनंदच झाला होता.
रूपालीच्या आईवडिलांनी रूपालीच्या मुलाच्या बारशाचा मोठा कार्यक्रम करून आनंद साजरा केला. कार्यक्रमातून श्रीमंती झळकत होती.कार्यक्रमाला आलेल्या सर्वांनी रूपालीच्या मुलाला आशीर्वाद दिले आणि कार्यक्रम किती छान झाला! याचे गुणगान केले.हे सर्व ऐकून रूपालीला, तिच्या आईवडिलांना आकाश ठेंगणे झाले होते.
रूपालीचा मुलगा दिसायला खूप सुंदर होता.सर्वजण त्याचे खूप लाड करत होते. रूपाली व तिच्या सासरच्या,माहेरच्या मंडळींनी मुलाच्या भविष्याबद्दल अनेक स्वप्ने पाहायला सुरूवात केली होती.देवाने सर्व भरभरून दिल्यामुळे आनंदच आनंद होता.पण या आनंदाला दुःखाचा स्पर्श व्हावा,असे झाले होते.
बाळ मोठे होत होते पण बाळाची पाहिजे तशी हालचाल, प्रगती दिसत नव्हती.डॉक्टरांना दाखवल्यावर कळाले की, बाळाच्या मेंदूची कार्यक्षमता कमी आहे.शारीरिक वाढ होत राहिल पण मानसिकदृष्ट्या थोडा प्रॉब्लेम राहील. यासाठी बाळाची विशेष काळजी घ्यावी लागणार.असेही डॉक्टरांनी सांगितले होते.
डॉक्टरांनी सांगितलेले ऐकून रूपालीला व तिच्या घरातील सर्वांना वाईट वाटले.यात आता कोणाला दोष न देता,आहे ती परिस्थिती स्विकारून बाळाची काळजी घेणे एवढेच त्यांच्या हातात होते.
रूपालीच्या मुलाविषयी असे कळताच निशाला व तिच्या आईवडिलांना वाईट वाटले.
आपल्याशी कोणी कितीही वाईट वागले,तरी आपण त्यांच्याशी चांगलेच वागावे.
अशा विचारांचे ते होते.
निशाची मुलगी 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,' त्याप्रमाणेच होती.चालणे,बोलणे याबरोबरच प्रत्येक गोष्ट ती पटकन लक्षात ठेवून करत होती.निशा व तिचे आईवडील यांना या गोष्टींचा आनंद होत होता.पण याचा त्यांनी कधी दिखावा केला नाही. रूपालीला तिच्या मुलाच्या आजारामुळे आलेल्या दुखऱ्या बाजूला ही त्यांनी कधी दुखवले नाही.
मुलाच्या बाबतीत कोणी रूपालीला प्रत्यक्ष बोलत नव्हते. पण ज्यांनाही तिच्या मुलाविषयी कळत होते. त्यांना मुलाविषयी वाईट वाटत होते व सहानुभूतीही वाटत होती.पण त्यांच्या मनात कुठेतरी विचार येत होते की,
रूपालीला तिच्या सुंदरतेचा,श्रीमंतीचा गर्व झालेला होता आणि तो कमी करण्यासाठी की काय देवाने तिच्या मुलाच्या आजारपणाच्या रूपात तिला दुःख दिले.
ससा आणि कासव यांच्या गोष्टीत ज्याप्रमाणे सशाला वाटत होते की, माझ्याप्रमाणे कासव धावू शकत नाही, चालू शकत नाही. तो मला शर्यतीत हरवू शकत नाही. या गर्वामुळेच तो बिनधास्त राहतो;पण कासव आपल्या पुढे कधी निघून गेला आणि कधी शर्यत जिंकला हे ही कळाले नाही. आणि जेव्हा कळाले तेव्हा सशाला आपल्या गर्वाचा पश्चाताप होतो.आपण कासवला कमी लेखत होतो पण शेवटी शर्यत तर त्यानेच जिंकली. शर्यत जिंकून त्याने मला हरवलेच पण मला झालेल्या गर्वालाही हरवले आहे.त्यामुळे कधीही कोणालाही कमी लेखू नये. असे सशाने ठरवले.
अगदी तसेच,
देवाने प्रत्येकात काही ना काही गुण दिलेले असतात;पण त्याबरोबर काही दोषही दिलेले असतात. कधी त्या गुणांचा कोणाला गर्व झाला की,त्याच्या अंगी असलेल्या दोषांमुळे त्याच्या गर्वाचे हरण होतेच!
कुणाला आपल्या रूपाचा,कुणाला आपल्या हुशारीचा,कुणाला श्रीमंतीचा तर कुणाला अजून कशाचा गर्व होऊ शकतो.या गर्वामुळे ती व्यक्ती इतरांना कमी लेखू लागते.मग देव त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करतो किंवा त्या व्यक्तिचे कर्माचे फळ म्हणा ...एक दिवस त्या
व्यक्तीच्या गर्वाचे घर खाली होतेच!
निशाला ना रूपालीसारखे सौदर्य मिळाले होते ना तिच्यासारखा देखणा,श्रीमंत नवरा. देवाने जे गुण व दोषही दिले ते तिने स्विकारून आनंदाने राहत होती.जसे आपल्यातील कमीपणांचे कधी वाईट वाटले नाही तसे आपल्यातील हुशारीचा,चांगल्या गुणांचा,स्वभावाचा गर्वही केला नाही.आणि तिच्या पोटी एक हुशार मुलगी जन्माला आली ..हे जणू तिच्या चांगल्या कर्माचे फळच होते.
मानसिकदृष्टीने कमजोर असलेले मुल जन्माला आले म्हणून त्यांचा कोणी तिटकारा करत नाही, त्यांचा राग करत नाही. उलट त्यांची जास्त काळजी घेतात.
हे सर्व रूपालीला माहित होते. तिचेही आपल्या मुलावर खूप प्रेम होते.ती त्याची काळजीही घेत होती. पण अगोदरची रूपाली आणि आताची रूपाली खूप बदलली होती. आपण कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व करू नये.कधी कुणाला कमी लेखू नये. आयुष्यात कधी कोणती परिस्थिती येईल सांगता येत नाही. म्हणून सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करावा. हे रूपालीला कळले होते.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.