"आई,बाबा एक आनंदाची बातमी आहे.मला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली."
प्रविणने मोठ्या उत्साहाने आईबाबांना सांगितले आणि त्यांच्या पाया पडला.
"अरे वा! छान! खूप खूप अभिनंदन."
आईबाबांनी प्रविणचे आनंदाने अभिनंदन केले.
"आज जेवणात काहीतरी गोड करा." बाबांनी घरात ऑर्डर दिली.
"मुक्ता, छान शिरा कर गं..तुझ्या दिराला चांगली नोकरी मिळाली ना ..त्याचा आनंद साजरा करू या."
प्रविणच्या आई मोठ्या सुनेला म्हणाल्या.
दिराला नोकरी मिळाल्याचा मुक्तालाही आनंद झाला होता.दिराचे अभिनंदन करून मुक्ताने शिरा करायला घेतला.
मुक्ताने बनविलेल्या शिऱ्याचा देवाला नैवेद्य दाखवला आणि सर्वांनी जेवताना शिऱ्याचा आस्वाद घेतला व मुक्ताचे खूप कौतुकही केले.
"प्रविण,तुझे खूप अभिनंदन.
प्रविणला नोकरी मिळाली ...म्हणजे आता घरखर्चाची माझ्यावरील जबाबदारी कमी होणार.."
प्रविणचा मोठा भाऊ राजेश प्रविणचे अभिनंदन करत म्हणाला.
"हो,आता भाऊजींना चांगली नोकरी मिळाली आहे...आता मला जाऊबाईही आणा घरात ..तेवढीच घरकामात मलाही मदत होईल."
मुक्ता वहिनी प्रविणची गंमत करत म्हणाली.
प्रविणचे वडील मुंबईत एका छोट्या कंपनीत नोकरीला होते.प्रविणच्या आईबाबांनी एका छोट्या घरात आपला संसार थाटला होता.त्यांना राजेश व प्रविण ही दोन मुले. दोन्ही सख्खे भाऊ ; पण दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाची!
राजेशचे लक्ष शिक्षणापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त होते.मित्रांबरोबर फिरणे,मौजमजा करणे यातच त्याला आनंद वाटत होता. शिक्षण ही पूर्ण केले नाही आणि पैसा कमविण्यासाठी एखादी नोकरी केली तर ती पण जास्त काळ टिकवत नव्हता.व्यवसाय ही केला पण त्यातही कधी हा व्यवसाय तर ..कधी तो व्यवसाय... एक ना धड भाराभर चिंध्या! अशीच त्याची अवस्था होती.
आईवडिल लग्न करण्यासाठी पाठी लागले तेव्हा
लग्न करायचे म्हणून कुठेतरी राजेश नोकरीला लागला होता.
जीवनाचा आनंद घेणे,मौजमजा करणे. असा राजेशचा स्वभाव व वागणेही तसेच होते आणि अगदी तशीच त्याला बायकोही भेटली.'खाओ,पिओ और ऐश करो!' या मंत्राचा अवलंब करणारी!एकमेकांना साजेसे नवरा बायको !
राजेशचा स्वभाव,वागणे असे रंगीन होतेच पण कोणत्याही नोकरीत,व्यवसायात त्याला यश मिळत नव्हते.
'राजेश प्रयत्न करतो पण त्याला कुठेच यश मिळत नाही.' असे आईबाबा विचार करायचे आणि त्याचे चांगले व्हावे ,यासाठी देवाला प्रार्थना करत असायचे.
आणि याउलट प्रविणचे होते.अभ्यासाची आवड असलेला,मेहनत घेणारा,जबाबदारीने वागणारा होता. इंजिनिअरिंग केल्यावर तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला .आईबाबांनी प्रविणचे कधी टेंशन घेतलेच नाही. आईबाबा,भाऊ व आपले कुटुंब यांना सुख,आनंद देणे हे आपले कर्तव्यच आहे. असे प्रविणला वाटायचे. त्यामुळे घरातील सर्वांना आनंद देण्याचा तो प्रयत्न करत असायचा.
प्रविणच्या घरात त्याच्या लग्नाचा विषय सुरू झाला होता.
प्रविण दिसायला चांगला,उच्चशिक्षित आणि नामांकित कंपनीत नोकरीला होता;त्यामुळे चांगल्या श्रीमंत घरातील मुली त्याला सांगून येत होत्या.मुलगी श्रीमंत घरातील नसली तरी चालेल पण संस्कारी हवी. अशी प्रविणची इच्छा होती.त्यामुळे अनेक मुली पाहिल्यानंतर त्याला माधवी आवडली होती.आपल्या जीवनाची सोबती कशी असावी? याची जी प्रविणने कल्पना केली होती..ती त्याला माधवीच्या रूपात दिसली.माधवीलाही प्रविण आवडला होता.आणि लवकरच प्रविण व माधवी एकमेकांचे जीवनसाथी बनले आणि आपल्या नव्या जीवनप्रवासाचा आनंद घेऊ लागले.
माधवीही शिकलेली होती.नोकरी करण्यासाठी तिने घरात विचारले तेव्हा..
'घरातील कामे कोण करणार?'
असे जाऊबाईंनी तिला विचारले.
माधवी मुक्तापेक्षा सर्वच बाबतीत सरस होती.दिसण्यात,शिक्षणात आणि वागण्या बोलण्यातही!
माधवीला याबाबत काही वेगळे वाटायचे नाही. ती मुक्ताशी चांगलेच वागत होती.पण मुक्ताच्या मनात माधवीविषयी असूया निर्माण झाली होती.माधवी नोकरी करेल तर घरातील सर्व कामे
आपल्यालाच करावी लागतील. या विचाराने माधवीने नोकरी करू नये असे
मुक्ताला वाटत होते आणि तिने मुक्ताला तसे सांगितलेही आणि माधवीच्या विरोधात सासूबाईंचे कानही भरले.
माधवीचे मन नाराज झाले होते. पण तीही जिद्दी होती.ती काही दिवसांनी एका क्लासेस मध्ये टीचर म्हणून पार्ट टाइम जॉब करू लागली.तिच्या नोकरीचा घरातील कामांवर काही परिणाम होत नव्हता. ती घरातील सर्व कामे सांभाळूनच नोकरी करत होती.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.