"अरे प्रविण मी एक नवीन बिझनेस सुरू करायचे ठरवले आहे.सध्या मी जी नोकरी करत आहे,त्या नोकरीत मला काही विशेष जमत नाही आहे आणि पाहिजे तेवढा पगारही मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा एखादा बिझनेस करण्याचा विचार माझ्या मनात आला आहे. मला बिझनेससाठी तू थोडी पैशांची मदत करतो का? मी परत करेन तुला नंतर पैसे."
राजेश प्रविणला म्हणाला.
"एक भाऊ दुसऱ्या भावाच्या कामात येत असतोच.तुम्ही दोघांनी एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करायला हवी.राजेश,आता तुला पैशांची गरज आहे तर प्रविण देईल पैसे तुला.तुझे चांगले व्हावे असे प्रविणलाही वाटत असतेच..हो ना प्रविण,बरोबर बोलते आहे ना मी?"
राजेशच्या बोलण्यावर प्रविण काही बोलण्याच्या अगोदरच त्यांची आई म्हणाली.
राजेशला एखादी चांगली नोकरी मिळावी किंवा एखाद्या व्यवसायात यश तरी मिळावे. असे प्रविणलाही वाटत होते.या भावनेतूनच त्याने राजेशला व्यवसायासाठी पैसे दिले.
प्रविण मोठ्या कंपनीत नोकरीला होता;त्यामुळे त्याला पगारही चांगला होता.माधवीही पार्ट टाइम जॉब करत होती.त्यामुळे प्रविण व माधवीला पैशाची अडचण कधी भासली नाही. घरातील जवळपास सर्व घरखर्च ते दोघेच करत होते.'आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी नाही त्यामुळे घरखर्चाला मी जास्त पैसे देऊ शकत नाही.' असे म्हणून राजेश घरात कधी पैसे कमी किंवा काही वेळेस देतही नव्हता.
आपण सर्व एकाच घरात राहतो. आपले सर्वांचे एक कुटुंब आहे.एकमेकांना सांभाळून घेणे. हे कुटुंब घटकाचे काम आहे.या विचारानेच 'घरखर्चाचे पैसे मीच का देवू?' असे प्रविण कधी बोलत नव्हता. आज ना उद्या राजेश दादाची परिस्थिती सुधारेल. या आशेवर प्रविण विनातक्रार आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत होता.
प्रविणचे आपल्या कुटुंबावर प्रेम होते आणि कुटुंबाला तो आनंदही देत होता. त्याची पत्नी माधवीही त्याला याबाबतीत कधी आडकाठी करत नव्हती. आपल्या नवऱ्याच्या सुखात सुख पाहणारी ती होती.कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना ते दोघे एकमेकांच्या आवडीनिवडीही जपत होते.माधवीला काय आवडते? हे प्रविणला माहित होते आणि प्रविणचा आनंद कशात आहे?हे माधवी समजून घेत होती.असे सर्व असले तरी प्रविण व माधवी स्वतः कधी पैशांची उधळपट्टी करत नव्हते. पैशाचा चांगलाच व योग्य ठिकाणीच उपयोग व्हावा. असे दोघांनाही वाटायचे. हौसमौज करावी पण अंथरूण पाहून पाय पसरावे. या विचाराने ते दोघेही वागत होते.
'अगं, माधवी, तुझी ती नवीन आणलेली पैठणी देते का मला नेसायला? माझ्या मैत्रीणीकडे कार्यक्रमाला मला जायचे आहे. माझ्याकडे चांगल्या साड्याच नाही गं..म्हणून मागते आहे तुझी साडी.'
'माधवी, अगं, तुझा तो लग्नातील नेकलेस दे गं मला घालायला. माझ्याकडे मंगळसूत्राशिवाय एकही सोन्याचा दागिना नाही. मला दागिने घालायची खूप हौस! यांचा बिझनेस चांगला सुरू झाला की, करते मी पण माझ्यासाठी दागिने.'
असे मुक्ता माधवीला म्हणत तिच्याकडून कधी साडी,कधी एखादा दागिना तर कधी अजून काही... असे सारखे काही ना काही मागायची व आपली हौस पूर्ण करायची.
आपले माहेरचे सर्व व्यवस्थित आहे.माहेरी गेल्यावर आपले भरपूर लाड होतात आणि सणावाराला देणेघेणेही सुरू असतेच. आणि इकडेही आपण दोघे कमवत आहोत त्यामुळे वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त साडी किंवा छोटासा दागिना प्रविणकडून गिफ्ट मिळत असतो. आपल्याकडे या वस्तू आहेत म्हणून मुक्ता वहिनी त्या मागत असतात. असा विचार करून माधवी मुक्ताला त्या वस्तू आनंदाने वापरण्यास देत होती.
प्रविण व माधवी खूप समजूतदार होते म्हणून घरात सर्व व्यवस्थित सुरू होते.राजेशची परिस्थिती प्रविणसारखी नव्हती म्हणून त्यांच्या आईबाबांना राजेशबद्दल वाईट वाटायचे,राजेशविषयी व मुक्ताविषयी विशेष सहानुभूती वाटायची.
आपण घरासाठी एवढं सार करत असतो पण आईबाबांचे प्रेम आपल्यापेक्षा राजेशदादाला व मुक्तावहिनीलाच मिळत असते.
असे छोट्या मोठ्या प्रसंगातून प्रविणला व माधवीला जाणवत होते व त्यांना या गोष्टीचे वाईटही वाटायचे;पण घरात वाद होऊ नये म्हणून ते या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करत होते.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.