मराठी कथा, लेख

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

जशास तसे ( अंतिम भाग )

 प्रविण व माधवी यांच्या मिळकतीवर घरखर्च चालत होता.काही वेळा तर ते आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून घरासाठी आपला पैसा खर्च करत होते.


काही वेळा आपल्यातील  अति चांगुलपणा हा आपल्यासाठी वाईटही  ठरतो.आपल्या चांगल्या वागण्याचा समोरची व्यक्ती जर गैरफायदा घेत असेल तर...आपल्यासाठी तो चांगुलपणा त्रासदायक होतो.


प्रविण व माधवीच्या बाबतीत त्यांच्या घरात असेच घडत होते.

प्रविण व माधवी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटत होते,कष्ट करत होते.एक चांगला मुलगा,एक चांगला भाऊ म्हणून प्रविण वागत होता आणि माधवी एक चांगली सून व एक चांगली पत्नी म्हणून प्रविणला साथ देत होती.पण आपल्या चांगल्या वागणुकीचा राजेश दादा व मुक्ता वहिनी गैरफायदा घेत आहेत. हे त्यांच्या वागणुकीतून जाणवायला लागले होते.राजेशदादा नोकरी व व्यवसायात पाहिजे तेवढी मेहनत घेत नव्हता. त्याचे आरामात खाणेपिणे, मौजमजा करणे सुरू होते.बेजबाबदारपणे वागत होता आणि मुक्तावहिनीही परिस्थितीची जाणीव ठेवून वागत नव्हती. त्यांचेही चांगले खाणेपिणे,मौजमजा करणे सुरू होते  आणि तेही प्रविण व माधवीच्या पैशांवर. 

राजेश दादाची कधीतरी परिस्थिती चांगली होईल या आशेवर प्रविण व माधवी होते.पण राजेश व मुक्ता वहिनी मुद्दामच असे वागत होते;जेणेकरून आपल्यावर घरातील जबाबदारी येणार नाही. आपण फक्त आपले आयुष्य आनंदाने जगावे.अशा पद्धतीने ते जगत होते.


राजेशदादा व मुक्ता वहिनी आपल्यापेक्षा वयाने,मानाने मोठे आहेत. त्यांना कसे दुखवावे. असे प्रविण व माधवी विचार करायचे.



झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते;पण झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला जागे नाही करता येत.


राजेशदादाचे व मुक्तावहिनीचे वागणे पाहून,यावर काहीतरी उपाय म्हणून प्रविण व माधवीने वेगळे राहण्याचे ठरवले म्हणजे राजेशदादा त्याच्या घराची जबाबदारी तरी पार पाडेल.


अगोदरच घर छोटे होते. आता राजेशची दोन मुले होती व  प्रविणचा एक मुलगा त्यामुळे  वाढत्या पसाऱ्यामुळे  घर छोटे व माणसे जास्त असे वाटायला लागले.त्यामुळे 

आता घर छोटे पडते आहे. हे कारण सांगून प्रविण व माधवी वेगळे राहू लागले. आईबाबा कधी राजेशकडे तर कधी प्रविणकडे राहत होते पण त्यांचा खर्च प्रविणच करत होता.



समाजात, नात्यांमध्ये, मित्रमंडळीत आपण नातेसंबंध म्हणून किंवा माणूसकी म्हणून चांगले वागतो,अडीअडचणीत इतरांना मदत करतो. कुणाला त्रास होऊ नये. असे वागतो.कोणी कसेही वागले तरी आपण चांगलेच वागावे.असे आपण वागत असतो. पण काही व्यक्ती हे धूर्त कोल्हयासारखे असतात. आपल्याकडून ते त्यांचा स्वार्थ साधून घेतात. त्यांचे काम झाले की मग साधी ओळखही दाखवत नाही.अशा लोकांशी कितीही चांगले वागले तरी ते त्यांचा धूर्तपणा कधी सोडत नाही. मग या लोकांशी 'जशास तसे' च वागायला हवे.नाहीतर असे धूर्त लोक आपल्या चांगल्या वागणुकीला आपली कमजोरी समजून आपल्याशी स्वार्थीपणाने वागतच राहतात. मग नुकसान आपलेच होते.


पुत्रप्रेमापोटी राजेशच्या आईवडिलांना त्याचे अवगुण दिसत नव्हते. उलट त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायची.

भावावरील प्रेमामुळे प्रविणही राजेशच्या वागण्याला सहन करत होता. पण  हे असेच चालू राहिले तर...आपण कष्टच करत राहू व दादा फक्त  आयते लोणी खात राहील.मजा मारत राहील. अशा लोकांशी चांगले वागून उपयोग नाही उलट आपलेच नुकसान आहे. त्यामुळे 'जशास तसे' असे वागण्याचे प्रविणने ठरवले व तो त्याप्रमाणे वागू लागला.आतापर्यंत जे झाले ते एक कर्तव्य म्हणून वागत आलो.पण यापुढे तरी शहाणे व्हावे. म्हणजे आपला चांगुलपणा हा मूर्खपणा ठरणार नाही.प्रविणने मनाशी असा निश्चय केला.


 आपले घर व आईबाबांची जबाबदारी तो व्यवस्थित सांभाळत होता.पण  राजेशदादाला यापुढे पैसे किंवा कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही. त्याला त्याच्या जबाबदारींची जाणीव झालीच पाहिजे.असे त्याने ठरवले.


प्रविणने घेतलेल्या  निर्णयामुळे राजेशला थोडे वाईट वाटले.पण आता आपला संसार आपल्यालाच सांभाळायचा आहे. याची जाणीव होऊ लागली. मूळचा स्वभाव बदलत नसला तरी परिस्थितीमुळे थोडाफार तरी फरक पडतोच. राजेशच्या वागण्यातही परिस्थितीमुळे थोडा बदल होऊ लागला.छोटासा व्यवसाय करून त्यात तो लक्ष देवू लागला. स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडू लागला.


राजेशमध्ये झालेला बदल पाहून प्रविणलाही बरे वाटले. त्यामुळे काही निर्णय योग्य वेळी घेतले तर ते आपल्यासाठी ही फायद्याचे ठरतात व इतरांसाठीही! हे त्याला समजले.


समाप्त


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...