"अरे ओम, चल बाळा पटकन..उशीराने पोहोचलो तर स्कूलचे गेट बंद होईल आणि मग आज तुला स्कूलमध्ये नाही जाता येणार."
राखी आपल्या मुलाला ओमला म्हणत होती आणि त्याला घेऊन त्याच्या शाळेकडे घाईघाईने जात होती.
ओमची शाळा घरापासून जवळच होती म्हणून राखी त्याला पायीच शाळेत घेऊन जात होती.आज थोडा उशीर झाल्याने ती घाईने ओमला शाळेत घेऊन जात होती.
एकदाची राखी ओमला घेऊन शाळेत येऊन पोहोचली आणि ओमला शाळेत सोडल्यावर तिने सुटकेचा श्वास सोडला.
आज थोड्याकरता ओमची स्कूल मिस झाली असती असे तिला वाटले.
घरात कामाचा पसारा तसाच सोडून आली होती; त्यामुळे कामाच्या टेंशनमध्ये ती घराकडे घाईने जाऊ लागली.
"अहो, ओमची मम्मी.. एवढी घाई? कुठे चाललात ? "
राखीला असा आवाज ऐकू आला आणि तिने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले; तर तिथे राखीला ओमच्या क्लासमधील आदित्य, अथर्व, प्रतिक,तेजस व सुजल या मुलांच्या आई दिसल्या. त्या सर्व गप्पा मारत उभ्या होत्या आणि त्यांच्यातील एकदोन जणींनी राखीला आवाज दिला होता.
त्यांनी आवाज दिल्याने, राखीही त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली,
"काय म्हणताय तुम्ही सर्व? कशा आहात ? आज शाळेत यायला उशीर झाला आणि घरातही सर्व कामे तशीच पडून आहेत; त्यामुळे जरा घाईतच निघाली होती."
"आम्ही सर्व मजेत आहोत नेहमीप्रमाणे..तुम्ही कशा आहात? कधीच्या भेटल्या नाहीत ..आज दिसल्यात म्हणून तुम्हांला आवाज दिला."
प्रतिकची आई म्हणाली.
"मी पण मजेत आहे. पण तीनचार दिवसांपासून ओमचे बाबाच त्याला शाळेत सोडत होते आणि घरी आणत होते.त्यामुळे आपली भेट झाली नाही." राखी म्हणाली.
त्या सर्वांबरोबर थोड्याफार गप्पा मारून राखी घरी गेली.
थोड्या वेळाने त्या सर्वही घराकडे जाण्यासाठी निघाल्या.
ओमला शाळेत सोडताना व शाळेतून घरी आणताना राखीची या सर्व जणींशी ओळख झाली होती.त्याही त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला व न्यायला येत होत्या.सर्वांची मुलेही एकाच क्लासमध्ये होती;त्यामुळे मुलांच्या
स्कूलवर्क,अभ्यास वगैरे गोष्टींसंबंधी एकमेकांशी बोलणे होत होते.मुलांची एकमेकांशी चांगली गट्टी जमत होती आणि रोज रोज भेटीतून त्यांच्या आईंचीही मैत्री होऊ लागली होती.
राखीचे घर शाळेपासून जवळ असल्याने ती ओमला शाळेत वेळेवर आणायची आणि घेऊन जातानाही लवकर जायची.त्यामुळे तिला या सर्वांशी बोलायला जास्त वेळ मिळत नव्हता. ती या सर्वांशी हाय,हॅलो आणि थोड्याफार गप्पा मारत होती. इतर सर्व जणी मुलांना शाळेत आणताना व घरी घेऊन जातांना सोबत यायच्या,जायच्या आणि कोणा एकीला उशीर झाला तर तिच्यासाठी थांबायच्याही. त्यांचा घरी जाण्याचा रस्ताही एकच होता आणि त्यांची घरेही एकमेकांच्या घरापासून थोड्याफार अंतरावरच होती.त्यामुळे जातांना,येतांना एकमेकांची त्यांना चांगली सोबत होत होती.यापूर्वी त्या एकमेकींना ओळखतही नव्हत्या;पण मुलांच्या शाळेमुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते.
राखीला त्यांच्याबरोबर गप्पा मारताना कळाले होते की, तेजसची आई घरी ट्युशन घेत होती.प्रतिकच्या आईचे ब्युटीपार्लर होते. अथर्वची आई शिवणकाम करत होती.आदित्य व सुजल यांच्या आई गृहिणी होत्या.
प्रत्येकीच दिसणं,वागणं,बोलणं हे सर्व एकमेकींपेक्षा वेगळ असलं तरी त्यांच्यात मैत्रीचे नाते फुलले होते आणि त्या नात्याचा आनंद त्या सर्व घेत होत्या. संसार,आपला व्यवसाय या सर्व जबाबदारी सांभाळत त्या मैत्रीसाठी वेळही देत होत्या.
जिचा वाढदिवस असेल तेव्हा तिला इतर सर्व जणी मिळून वाढदिवसाची छानशी भेटवस्तू द्यायच्या आणि मग तीही सर्वांना वाढदिवसाची पार्टी देवून आपला वाढदिवस साजरा करायची.मुलांचा वाढदिवस तर त्या साजरा करायच्या पण स्वतः चा वाढदिवस मैत्रीणींसोबत साजरा करून वाढदिवसाच्या आनंदाबरोबर मैत्रीचाही आनंद घेत होत्या.
तेजसच्या आईकडे इतर जणी आपल्या मुलांना ट्युशनसाठी पाठवत होत्या. प्रतिकच्या आईकडे पार्लरसाठी जात होत्या आणि ब्लाऊज,ड्रेस वगैरे शिवायचे असेल तर अथर्वच्या आईकडे जात होत्या. त्या एकमेकींच्या मैत्रीणी जरी होत्या पण व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहाराप्रमाणे वागत होत्या. व्यवहाराप्रमाणे जे पैसे होत होते त्यापेक्षा थोडेसे कमी पैसे मैत्रीखातर घेत होत्या.मैत्रीही जपली जात होती व व्यवहारातही काही अडचण येत नव्हती.
या सर्व जणींची मैत्री इतरांनाही दिसून येत होती.सर्वजणी नेहमी सोबत दिसायच्या. नवरात्रीत ज्या दिवशी जो रंग असेल,त्या रंगाच्या साड्या आणि त्याही एकसारख्याच नेसून येणे.फोटो काढणे आणि स्टेटसला ठेवणे.शाळेत मुलांचा ओपन डे असेल,ऍन्यूअल डे असेल सर्व जणी सोबत असायच्या.
गणपतीला, संक्रांतीच्या हळदीकुंकूला एकमेकांच्या घरी जाणे,पिकनिकला जाणे.प्रत्येक सणसमारंभ, उत्सव साजरा करणे.अशा सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद त्या घेत होत्या.त्यांची मैत्री पाहून काहींना छान वाटत होते. मैत्री असावी तर अशी!असे पाहणाऱ्यांना वाटत होते.तर काहींना त्यांच्या मैत्रीबद्दल थोडी ईर्षाही वाटत होती.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.