राखीला त्यांची मैत्री पाहून छान वाटायचे. मैत्रीमुळे जीवनात आनंद,उत्साह कसा येतो? हे सर्व तिला या सर्वांच्या मैत्रीतून दिसून येत होते.राखी त्या सर्वांशी छान बोलायची आणि त्याही सर्व तिच्याशी छान बोलायच्या.पण त्यांची एकमेकांशी जशी भावनिक बॉंडिंग झाली होती तशी राखीची त्यांच्याशी बॉंडिंग झालेली नव्हती आणि राखीला त्याचे कधी वाईटही वाटत नव्हते.
राखीलाही मैत्री करायला आवडायचे. शाळेतील,कॉलेजमधील आणि आता बिल्डिंगमध्ये तिच्या मैत्रीणी होत्या.
आयुष्यात आपल्याला अनेक जण भेटत असतात. कुणाचे गुण आवडतात, कुणाचा स्वभाव आवडतो तर कुणाचे व्यक्तिमत्त्व! पण प्रत्येकाशीच मैत्री होते असे नाही आणि मैत्री ही जाणूनबुजून होत नसते.ती भावनेतून होत असते.काहींशी खूप लवकर मैत्री होते तर काहींशी मैत्री होण्यासाठी वेळही लागत असतो.मैत्रीचे नाते प्रेम आणि विश्वास यावर अवलंबून असते.
राखीला मैत्रीबद्दल सर्व माहिती होते आणि तीही आपल्या मैत्रीणींसोबत मैत्रीचा आनंद घेत होती.
आदित्य, तेजस,सुजल,अथर्व, प्रतिक आणि राखीचा ओम एकमेकांचे फ्रेंड्स झाले होते.
राखी ओमच्या वाढदिवसाला या सर्वांना बोलवायची आणि ओमलाही ते वाढदिवसाला बोलवायचे.
गणपतीला व संक्रांतीच्या हळदीकुंकूला राखी या सर्वांच्या आईंना बोलवायची आणि त्याही राखीला बोलवायच्या.
राखीची या सर्वांशी मैत्री होती पण खूप अति जवळीकही नव्हती. दुरून डोंगर साजरे अशीच राखी राहत होती.
मुलांचा अभ्यास, शाळा याबरोबर मैत्रीचाही आनंद घेणे. असे हे सर्व रूटीन छान सुरू होते.
दिवसामागून दिवस आणि त्यानंतर वर्षामागून वर्षे उलटत गेली.
आणि एके दिवशी,
राखी नेहमीप्रमाणे ओमला न्यायला शाळेत गेली,तेव्हा तिला प्रतिकची आई एकटीच उभी असलेली दिसली आणि बाकीच्या तिच्या मैत्रीणी दुसऱ्या ठिकाणी उभ्या असलेल्या दिसल्या.हे दृश्य पाहून राखीला आश्चर्यच वाटले.असं कधीच होत नाही. नेहमी सोबत असणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या,हसणाऱ्या,मैत्रीचा उत्सव साजरा करणाऱ्या सर्व जणी आणि आज एकदम शांत...एक एका बाजूला तर दुसऱ्या वेगळ्या बाजूला!
हे दृश्य पाहून जसे राखीला आश्चर्य वाटले तसेच इतर स्त्रियांनाही वाटले;ज्या नेहमीच्या ओळखीच्या होत्या आणि ज्यांना या सर्वांची मैत्री माहित होती.
प्रतिकच्या आईकडे जावे की बाकीच्यांकडे ? असा विचार राखीच्या मनात आला; पण तेवढ्यात शाळा सुटली आणि मुलांना घेऊन सर्वजणी घरी गेल्या.
एवढी चांगली मैत्री ..मग असे काय झाले? हा प्रश्न राखीच्या मनात घोंघावत होता आणि त्याचे उत्तर कळेपर्यंत तिच्या मनाला शांतता मिळणार नव्हती.
दुसऱ्या दिवशी राखी जेव्हा ओमला शाळेत सोडून घरी परतत होती; तेव्हा तिला प्रतिकची आई भेटली. तिच्या त्या मैत्रीणी अगोदरच निघून गेल्या होत्या.राखीने तिला काही विचारण्याअगोदरच ती सांगू लागली,
"मैत्री ही जातपात, रूपरंग वगैरे पाहून होत नसते. मैत्री ही प्रेमाच्या भावनेतून होत असते.मैत्रीत प्रेमाची,विश्वासाची,
सहकार्याची भावना असते तशीच एकमेकांबद्दल आदराची ही भावना असते.मैत्रीत जरी राग,रूसवे,फुगवे या गोष्टी सुरू असतात. सॉरी, थँक्यू या गोष्टींना जास्त महत्त्व दिले जात नाही. माझंतुझं यापेक्षा आपली मैत्री हे गृहीत धरून सर्व सुरू असतं.हे जरी सर्व खरे असले तरी काही गोष्टी मैत्रीच्या नात्यामुळे बोलल्या जात नाही.. मैत्रीत हे सुरूच असते. असे सांगितले जाते.आमच्या मैत्रीत पण असेच काहीसे होत गेले. तेजसची आई खूप हुशार पण इतरांनी तिचेच ऐकावे असा तिचा हेका असतो. मला हे काही पटत नव्हते. मैत्रीत प्रत्येकाच्या मताला अर्थ असतो.कोणा एकाचे म्हणणे इतर
सर्वांनाच पटेल असे नाही. सर्वानुमते आणि जे योग्य वाटते तसा निर्णय घेतला जातो. पण आमच्या मैत्रीत 'राजा बोले दल हाले' तशी परिस्थिती होती. बाकीच्यांना हे सर्व आवडत होते म्हणा किंवा त्यांना नकार देणे,विरोध करणे हे जमत नव्हते. पण मला हे सर्व खटकत होते. मैत्रीच्या नात्याने मी वागत होती. जे पटत होते ते आनंदाने मान्य करत होती ;पण जे आवडत नव्हते तेही बोलून दाखवत होती.तर मीच एकटी पडत होती.मीचं वाईट ठरत होती. माझ्या म्हणण्याला काही अर्थही दिला जायचा नाही.मैत्रीचा आनंद घ्या आणि द्याही पण मैत्रीच्या बंधनात कोणाचे विचार, मत ,तत्व यावर तरी इतरांचा अधिकार नसावा.प्रत्येकाचा विचार,मत याचाही विचार केला जावा. प्रत्येकाला स्वतः ची एक स्पेस हवी. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असावी नाहीतर मग 'अति तिथे माती' होते. त्यांच्यापासून दूर होताना मलाही त्रास होतो आहे; पण जिथे आपल्या मताला काही महत्त्व नसेल तिथे तरी आपले कसे जमेल? त्यांच्याशी मी पहिल्याप्रमाणे जरी मैत्री ठेवली नाही तरी मी त्यांच्याशी बोलत राहीन. पण आपला स्वाभाविक सांभाळून.. जर त्या माझ्याशी नाही बोलल्या तर मी ही नाही बोलणार."
हे सर्व ऐकून राखीलाही वाईट वाटले.
खरचं अति तिथे माती असे जे म्हटले आहे..ते किती खरे आहे.
कोणतीही गोष्ट मर्यादेतच चांगली वाटते.
पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न गरजेचे असते.जास्त खाल्ले तर अपचन होते.झाडांना जगण्यासाठी पाणी आवश्यक असते पण जास्तीचे पाणी झाडांना मारूनही टाकते.
नात्यांमध्ये,मैत्रीमध्ये प्रेम,विश्वास, राग,रूसवे सर्व काही असावे पण नात्यांचा,मैत्रीचा आनंद घेण्यासाठी काही गोष्टींना मर्यादाही ठेवाव्यात ;जेणेकरून नाते,मैत्री तुटण्याऐवजी दिवसेंदिवस फुलत राहील.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.