मराठी कथा, लेख

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

सावित्रीच्या लेकी

 "काय रे मिलिंद, तू प्रेरणाला पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवणार आहे? ऐकले मी असं." 


अरुण आपल्या भावाला मिलिंदला विचारीत होते.


"हो दादा, तू ऐकले ते खरे आहे. मी प्रेरणाला पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवत आहे.तिला शिक्षणाची आवड आहे. ती अभ्यासात खूप हुशार आहे. तिची पुढे शिकण्याची इच्छा आहे म्हणून  पाठवतो आहे." -- मिलिंद


"हे सर्व खरे आहे पण आता दुसऱ्या गावात, परक्या ठिकाणी आणि ते पण शहरात पाठवतो आहे. तिथे कशी राहते? काय करते? हे आपल्याला इथे राहून समजेल का?मुले घरात राहतात  तोपर्यंत आपल्या धाकात राहतात, आपले ऐकतात. सुरक्षित राहतात. आता तिथे जाऊन तिथलं पाणी लागलं म्हणजे तिला? आपल्या डोक्यावर बसली म्हणजे ?" --- अरुण 


"असं काही होणार नाही दादा,आपण चांगले संस्कार केले आहे त्यांच्यावर आणि माझा विश्वास आहे माझ्या मुलींवर ..त्या काहीही चुकीचे करणार नाही. उलट त्यांच्या मुळे माझी मान उंचावेल."  -- मिलिंद


"मिलिंद एवढा जास्तीचा विश्वास नको ठेवू रे बाबा. मी पण तीन मुलींचा बाप आहे ,मला पण माझ्या मुलींची काळजी होती. मी पण त्यांना चांगले सासर पाहून लग्न लावून दिलेच ना.आता सुखाने संसार करता आहेत ना? मी काही चुकीचे केले का?" --

 अरूण


"हो ते खरे आहे पण त्यांना शिक्षणाची आवड असूनही तू  पुढे शिक्षण करू दिले नाही गावात दहावीपर्यंत शाळा होती तेवढं शिकवले आणि लावले घरकामाला.. नंतर लग्न करून लागल्या  संसाराला." -- मिलिंद


"मगं मुली कितीही शिकल्या तरी चूल आणि मूल कधी सुटले आहे का त्यांचे? शेवटी संसाराच करायचा असतो." --- अरूण 


"बरोबर आहे तुझे म्हणणे,मुलींना जरी संसाराच करायचा असतो तरी मुली शिकलेल्या असल्या की फरक पडतोच.शिकलेल्या असल्या की प्रसंगी नोकरी करून कुटुंबाला हातभार पण लावतात." -- मिलिंद 


"तुझ्याशी मी  या विषयावर आता जास्त काही बोलत नाही.. आता वेळच सांगेल तुझे म्हणणे बरोबर की माझे? आता तू एवढ्या विश्वासाने प्रेरणाला पाठवत आहेच तर पाठव ..फक्त आपल्या खानदानाची इज्जत जाणार नाही याची काळजी घे." -- अरुण 


दादाने मिलिंदचे मन वळविण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे न ऐकता  मिलिंदने आपल्या मुलीला प्रेरणाला दहावी नंतरच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले.


अरूण व मिलिंद दोघांचा  शेतीचा व्यवसाय होता आणि एक किराणा दुकानही होते.गावात दोघे एकत्र कुटुंबात  राहत होते.अरूण काही शिकलेला नव्हता पण मिलिंद थोडंफार शिकलेला होता आणि काय चांगले, काय वाईट असा  विचार करूनच तो  निर्णय घ्यायचा. 


आताही त्याने शिक्षणाचे महत्त्व ओळखूनच प्रेरणाला शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला.


प्रेरणा बाहेरगावी शिकायला गेल्यामुळे शिक्षणाचा, राहण्याचा व इतर गोष्टींचा असा खर्च वाढला.


त्यामुळे घरात भाऊ व वहिनीचे टोमणे सुरू असायचे.


"मुलींपेक्षा मुलावर खर्च केला असता तर आमचे काही म्हणणे नव्हते. पण मुलीवर एवढा खर्च करून काय उपयोग ..शेवटी सासरीच तर जाणार आहे.आणि अजून तिच्या शिक्षणाप्रमाणे मुलगा शोधावा लागेल ते वेगळचं!"


यांच्याशी बोलून वाद करण्यापेक्षा दुर्लक्ष केलेले बरे असे मिलिंदने ठरवले व तो आपल्या कामात लक्ष देऊ लागला.


प्रेरणाने  बारावी नंतर पदवीचे शिक्षण करायचे ठरवले. तिच्या आईवडिलांनीही तिला परवानगीही दिली. 


इकडे अरूणचे बोलणे  सुरूच होते, 


"आता एखादे चांगले स्थळ आले की लग्न करून टाक प्रेरणाचे. हेचं वय असते लग्नाचे. माझ्या मुली बघं कशा संसारात रमल्या आहेत.आहे का काही टेंशन?" 


मिलिंदला हे सर्व ऐकण्याची सवय झाली होती. या गोष्टीकडे दुर्लक्ष करत  तो मुलींना शिकवत होता. दुसरी मुलगीही दहावी नंतर शहरात गेली.


पदवीनंतर प्रेरणाने बी.एड.पण पूर्ण केले.घरात आता तिच्या लग्नाविषयी बोलणे सुरू झाले.

आलेल्या स्थळापैंकी शिक्षक असलेल्या मुलाचे स्थळ सर्व बाबतीत चांगले वाटल्याने ते स्थळ आवडले.प्रेरणाचीही पसंती मिळाली आणि लग्नही  झाले.


प्रेरणाला  एका गावात शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. तिच्या मिस्टरांची शाळा दुसऱ्या गावात होती.प्रेरणाला ज्या गावात नोकरी मिळाली तिथे त्यांनी राहण्याचे ठरवले व तिचे मिस्टर तेथून जाऊन येऊन नोकरी करू लागले.


नोकरी व संसार असे  प्रेरणाचे रूटीन सुरू झाले.गावात हळूहळू ओळखी होऊ लागल्या. आजूबाजूच्या स्त्रिया तिच्या कडे मदतीसाठी येऊ लागल्या. त्यातील काही थोडंफार शिकलेल्या होत्या तर काही काहीच शिकलेल्या नव्हत्या. काही वाचायचे असेल ,काही लिहून द्यायचे असेल तर त्या प्रेरणाकडे येत. त्या शेतात कामाला जात होत्या. त्या काही रक्कम प्रेरणाकडे आणून जमा करत. संकटकाळी आपल्याला कामात येईल म्हणून. प्रेरणाही त्यांची मदत मनापासुन  करायची.प्रामाणिकपणे  त्यांचे  पैसे त्यांना लागेल तेव्हा परत करायची. ती एका वहीत नोंदच करून ठेवायची. प्रेरणाने विचार केला,"आपण यांना अशी किती दिवस मदत करू ..त्यापेक्षा यांनाच लिहायला, वाचायला शिकवले तर ..त्यांचे ते काम करू शकतील आणि एक वेगळाच आनंद त्यांना मिळेल!


प्रेरणाने आपली मनातली कल्पना त्या स्रियांजवळ बोलून दाखवली.


"ताई, आता ह्या वयात काय करायचे आहे शिकून?" "आम्हांला वेळ पण नाही भेटत ,घरातले काम शेतातले काम असते."

" माझा  नवऱ्याला नाही आवडले तर? " 


हे सर्व तिला ऐकायला मिळाले.


पण तीही जिद्दी होती. तिने तिचे म्हणणे प्रत्येकीला ऐकायला भाग पाडलेच. 


आपल्या घरात रात्री घरातील सर्व कामे झाले की प्रेरणा त्या स्रियांना शिकवू लागली. सुरूवातीला एक दोनच येत होत्या.पण हळूहळू संख्या वाढू लागली.त्यांना ही प्रेरणाचे शिकवणे आवडू लागले व त्यांचा  शिक्षण घेण्याचा उत्साह वाढू लागला. प्रेरणा ही उत्साहाने ,जीव ओतून शिकवू लागली.

प्रत्येक चांगल्या कार्याला सर्वच चांगले म्हणतात. असे नाही.काही नाव ठेवणारे, त्रास देणारेही असतात.


जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईं फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना किती त्रास सहन करावा लागला ! त्यामानाने आपल्याला तर काहीच त्रास नाही. जर त्यांनी त्या त्रासाला कंटाळून स्त्रीशिक्षण बंद केले असते तर...आज मुलींच्या बाबतीत चित्र वेगळे दिसले असते.आज प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मोठमोठी पदे भूषवित आहेत. देशाचा कारभार चालवत आहे. हे सर्व शक्य झाले ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीकारी विचारानेच! मुलींना शिक्षण देऊन त्यांनी एक क्रांतीच घडवून आणली.त्यांनी  त्या काळी पेटवलेल्या एका क्रांतीच्या ज्योतीमुळे आज घराघरात अज्ञानरूपी अंधाराचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकार पसरला आहे. देश प्रगती करत आहे. 

हा विचार मनात ठेवून प्रेरणाने,त्रास देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपले काम चालूच ठेवले.आपण शाळेत मुलांना शिकवतो त्याचा तर आपल्याला पगार मिळतो. पण या स्रियांना शिकवताना होणारा आनंद वेगळाच! एक वेगळेच समाधान!

त्या स्रियांनाही तिची धडपड,तळमळ दिसत होती,त्यामुळे त्याही मन लावून शिकू लागल्या आणि मनापासून केलेली गोष्ट चांगली होत असते.यामुळेच त्यांना छान लिहीता यायला लागले, वाचायला येऊ लागले. छोटी छोटी गणिते सोडवू लागल्या. आपल्याला हे सर्व येते याचा त्यांना अतिशय आनंद होऊ लागला. वर्तमानपत्र वाचून जगात काय चालू आहे कळू लागले.गोष्टीच्या पुस्तकातील गोष्ट वाचून आनंद होऊ लागला. हिशोब करायला जमू लागले. प्रेरणाने गावातील बँकेत त्यांचे खाते उघडून दिले आणि हळूहळू सर्व शिकवून दिले. सुरूवातीला विरोध करणारे त्या स्त्रियांच्या  पतींना  आपली  बायको किती छान वाचते,किती छान लिहीते ते पाहून आनंद होऊ लागला. 


प्रेरणाच्या माहेरी,तिच्या अरूण काकांची लहान मुलगी तिच्या मुलीसह माहेरी येऊन राहत होती. तिचा नवरा अपघाताने वारला आणि तिच्या सासरच्यांनी तिची व मुलीची जबाबदारी नको म्हणून माहेरी पाठवून दिले. 


प्रेरणाने तिला समजावले,


"तू आयुष्यभर अशीच राहणार का? तुझे आणि मुलीचे काय भविष्य राहणार? आता जे झाले ते झाले. तू हुशार आहेस. तू तुझे दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण कर."


प्रेरणाने तिच्या काकांनाही विनवणी करून सांगितले.


काकांनीही खूप विचार करून त्यांच्या मुलीला शिकण्यास परवानगी दिली.त्यांच्या मुलीने आपले दुःख बाजूला ठेवत शिक्षणास सुरूवात केली. 

शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत  नोकरीलाही लागली.

आपण आपल्या पायावर उभे आहोत याचा तिला आनंद होत होता. अरूणला  आपल्या भावाचे,मिलिंदचे  म्हणणे पटू लागले होते. शिक्षणामुळे मुली बिघडत नाही तर शिक्षणामुळे मुलींची प्रगतीच होते.



सुरूवातीला प्रेरणाच्या  नवऱ्याला तिचे हे समाजकार्य आवडत नव्हते. पण तिच्या जिद्दीपणापुढे त्याने हार मानली आणि तो ही आनंदाने तिला तिच्या कामात मदत करू लागला. 



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणाने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. सावित्रीबाई फुले यांची माहिती सांगितली आणि आपण शिक्षित केलेल्या स्रियांना त्यांचे अनुभव सांगायला सांगितले. सर्व स्रियांनी खूप छान लिहिले होते आणि छान बोलल्याही. 

प्रेरणाने सर्वांचे खूप कौतुक केले आणि सर्वांना बक्षिस म्हणून पुस्तक दिले.त्या स्रियांनी प्रेरणालाही बोलण्यास सांगितले तेव्हा, 

प्रेरणा बोलली,

"तुमच्यातील इच्छा शक्तीमुळे हे सर्व शक्य झाले आहे. मी तर फक्त मार्ग दाखवण्याचे काम केले ,चालायचे काम तर तुम्हींच केले. शेवटी एकच सांगावेसे वाटते,


'चूल आणि मूल' हीच नाही आमची ओळख

बनूनी सावित्रीच्या लेकी,कर्तव्य पार पाडतो आम्ही चोख

आता अबला नाही सबला झालो

अन्यायाचा प्रतिकार करण्यास शिकलो

सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या  बरोबरीने काम करतो

संसाराची जबाबदारी ही पार पाडतो 

नको वाटतो स्रियांवर होणारा अत्याचार ,अपमान

नको सहानुभूती पण करावा  आमच्या स्त्रीत्वाचा सन्मान


समाप्त 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...