विजय मुंबईत आला तसा काम,कॉलेज,अभ्यास यात इतका गुंतून गेला की,
स्वतःचा विचार करायलाही त्याला वेळ मिळाला नाही. त्याला फिरण्याची आवड होती. मुंबईत लोक खास फिरण्यासाठी येतात आणि आपण कधीचे मुंबईत असूनही अजून कुठे फिरलो नाही. आता कामाच्या दगदगीतून थोडासा निवांत मिळाला आहे तर आपले मुंबई फिरण्याचे स्वप्न ही पूर्ण करू. या विचाराने तो कामातून वेळ काढून अधूनमधून मुंबई फिरायला जाऊ लागला. छोटे छोटे स्वप्न ही खूप आनंद देऊन जातात. याचा तो अनुभव घेत होता.मुंबईत फिरत असताना,त्याला वाटायचे की हे खरे आहे की स्वप्न? गावी असताना आपण कधी विचारही केला नव्हता की मुंबईला जाऊ...मुंबई फिरू,मजा करू .. असे! आयुष्यात नशीब कुठे काय घडवून आणते काही सांगता येत नाही!
विजय मुंबईत चांगला रूळला होता. अधूनमधून गावाकडे सर्वांना भेटायला जायचा.आता भावाचे शिक्षण पूर्ण होत आले होते.बहिणीचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे तिचे लग्न करायचे आईबाबांनी ठरवले .
विजयच्या आईवडिलांनी मुलीच्या लग्नासाठी पैशांची थोडीफार बचत केलेली होती.आणि विजयने पूनमताईंकडून लग्नासाठी उसनवार पैसेही घेतले. बहिणीच्या लग्नाची हौस म्हणून विजयने आईसाठी तिच्या मनासारखी साडी, छोटासा का होईना एक दागिना घेतला. विजयच्या आईला त्या साडीपेक्षा, दागिन्यापेक्षा आपल्या मुलाने आपल्यासाठी इतके कष्ट घेतले याचाच जास्त आनंद होत होता.
बाबांनी,भावाने, बहिणीने व विजयनेही आपली छान हौस करून घेतली.लग्नाचा मस्त आनंद घेतला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर भावाने गावातच नोकरी करून राहण्याचे ठरवले.आता तो ही घरासाठी मदत करू लागला होता. विजयला आता गावाकडची एवढी
पहिल्यासारखी जबाबदारी राहिली नव्हती.
आईवडिल विजयला लग्न करण्यासाठी विचारू लागले.
"आई-बाबा इथे एक स्वतः चे घर होऊ दे मग लग्नाचा विचार करू." विजय त्यांना म्हणाला.
"मगं लग्नाला खूप उशीर होऊन जाईल. तू सध्या भाड्याच्या घरात रहा मग घे स्वतःचे घर.आणि आम्ही एक मुलगी शोधूनही ठेवली आहे.आणि ती काय तुझ्यासाठी इतकी वर्षे थांबेल का?" आईबाबाही लग्नासाठी त्याच्या पाठीच लागले.
विजयलाही ती मुलगी आवडली. आणि लग्न करून एका भाड्याच्या घरात त्याचा संसारही सुरू झाला. आईबाबा कधी गावी तर कधी विजयकडे राहत होते.
विजय एकटा होता तेव्हा त्याचा एवढा खर्च नव्हता. पण आता लग्न झाल्यावर खर्च वाढला.त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न थोडे दूरच वाटायला लागले.
वाढता घरखर्च, पूनमताईंचे देणे,आईवडिलांची छोटी मोठी दुखणी आणि भावाचे लग्न यात बराचसा पैसा खर्च होत गेला.स्वतःचे घर घेण्याचे विजयने पाहिलेल्या स्वप्नाला खरे करण्यासाठी त्याची बायकोही नोकरी करून मदत करू लागली. आता दोघे मिळून घराचे स्वप्न पाहू लागले.
असेच दिवस व त्यानंतर वर्षे उलटत गेली...
विजयने एका नवीनच बांधण्यात येणाऱ्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट बुक केला. यासाठी त्याने बँकेतून होमलोन काढले. घर पूर्ण व्हायला तीन,चार वर्षे लागणार होती.
घर पूर्ण व्हायला वेळ होता तरी, आपले स्वतः चे घर होणार या विचाराने विजयला आनंद झाला होता.
आणि शेवटी तो दिवस आला.. ज्या दिवसाची विजय आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस.. त्याने पाहिलेले स्वप्न खरे होण्याचा दिवस!
विजयने नव्या घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी छोटीशी पूजा केली. आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना बोलावले आणि सर्वांना छान पार्टी देवून आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.त्याच्या आईवडिलांना, भावाबहिणीलाही खूप आनंद झाला.
आईवडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून विजयला खूप समाधान वाटत होते. आपण पाहिलेले स्वप्न आज खरे झाले त्यामागे आपण घेतलेली मेहनत आहेच. पण आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. आईवडिलांनी,भावाने व बहिणीने अनेकदा केलेली मदत हे ही महत्त्वाचे! आणि पूनमताई,त्यांचे मिस्टर यांच्या मुळे तर आज हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांनी मला मुंबईत आणले..वेळोवेळी मदत केली. म्हणून तर हे सर्व शक्य झाले. यासाठी
विजयने सर्वांचे मनापासून आभार मानले.
काही वर्षांत विजयचे बाबा होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.