मराठी कथा, लेख

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

स्वप्न झाले खरे ! ( भाग 2 )

 


मुंबईला सर्व स्वप्ननगरी म्हणतात. मनात  स्वप्न घेऊनच लोक मुंबईत येतात. कोणी ऍक्टर,कोणी सिंगर,कोणी डान्सर ,कोणी बिझिनेसमन तर कोणी अजून काही.. होण्यासाठी मुंबईत येतात आणि आपले नशीब आजमवतात.सोबत फक्त नशीब असून चालत नाही तर पाहिलेले  स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची ताकद, जिद्द या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. विजयने हे सर्व यशस्वी व्यक्तिंच्या मुलाखतीतून ऐकलेले होते. आणि आज त्यालाही तसा अनुभव येत होता. स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मेहनत व जिद्द हवीचं!


आपली स्वप्न या यशस्वी लोकांच्या स्वप्नाइतकी मोठी नाहीत.छोटी छोटी स्वप्न आहेत.पण आपल्याला ती सुद्धा खूप मोठी वाटत आहेत.

या स्वप्नामागे धावता धावता विजयला त्याच्या घराची आठवण यायची. प्रत्येक गोष्टीवर बाबांचे छान समजावून सांगणे,भाऊ-बहिणीबरोबर केलेली मौजमजा आणि आईच्या हातचे स्वादिष्ट जेवण!


येथे जरी घरगुती जेवण मिळत होते; पण त्याला आईच्या हाताचा प्रेमळ स्पर्श कुठे होता! 


आपल्या कुटुंबाच्या बाबतीत विजय खूप भावनाशील होता.लहान होता तोपर्यंत त्याला काही कळत नव्हते. पण मोठा झाल्यावर घरातील परिस्थिती कशी आहे हे त्याला समजू लागले होते.बाबांची नोकरी गेली आणि त्यानंतर त्यांचा नव्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी सुरू असलेला संघर्ष,घरातील सर्व कामे करून  वाळवणाचे पदार्थ बनवून ते विकणे,लोकांचे स्वयंपाकाचे काम हे सर्व करताना आईला होणारा त्रास,तिचे कष्ट हे सर्व तो पाहत होता.

आईला देवदर्शनाची व चांगली चांगली ठिकाणे पाहण्याची हौस होती.दागिने व साड्याही कधी स्वतः च्या हौशीने घेतल्या नाही. लग्नातले आहे तेवढेच एकदोन दागिने. भाऊबीज व रक्षाबंधनला मामांनी घेतलेल्या साड्याच वापरायची.पण आईने कधी कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही. आहे त्यात समाधान मानून काटकसरीने संसार केला.आई व बाबा दोघांनीही स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या व संसार, आपली मुले यासाठी कष्ट करत राहिले.


गरीब असो की श्रीमंत ..प्रत्येकाची काहीतरी स्वप्ने असतातच ! 


आईबाबांचीही खूप स्वप्न होती ; पण पैशाअभावी ती पूर्ण होऊ शकली नाही.


पैसा असला की, खूप सारी स्वप्न पूर्ण करू शकतो. 

जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घ्यावी लागते. त्यामुळे स्वप्न पूर्ण करायची असतील तर पैसा हवाच!


आईबाबा  त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही पण आता मुलगा म्हणून मी त्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आईला साडी व एखादा दागिना,बाबांना कपडे व भाऊ-बहिणी साठी छानशी भेटवस्तू  हे तर नक्की घेणार.

या गोष्टीतूनही त्यांना किती आनंद होणार!


आईबाबा  त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. आता मुलगा म्हणून मलाही त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत.


मनात ही भावना ठेवून विजय कॉलेज,अभ्यास व कामही करत होता.पगारातील काही पैसे घरी पाठवायचा आणि उरलेल्या पैशातून पूनमताईंचे पैसेही द्यायचा.गावाकडे आईवडील होईल तसे आपल्या परीने संसाराचा गाडा ओढत होते. विजयने पाठवलेल्या पैशांमुळे थोडी मदत होत होती.


बघता बघता, विजयचे D. Pharmacy पूर्ण झाले. त्याला स्वतः चे मेडिकलसाठी सर्टिफिकेट मिळाले होते.आता तो पूर्ण वेळ मेडीकलमध्ये काम करू लागला. त्यामुळे त्याचा पगारही वाढला.हळूहळू करत त्याने पूनमताईंचे पैसेही दिले.


एक दोन वर्षांनी पूनमताईंनी त्याच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला.


"विजय,मेहनत तुझी व भांडवल माझे याप्रमाणे आपण एक नवीन मेडिकल सुरू करू.सध्या तुझ्याकडेही इतके भांडवल नाही. येणारी मिळकत आपण नियमानुसार घेऊ. तुझाही त्यात फायदाच आहे ना? " 


विजयला हे सर्व योग्य वाटले आणि तो नवीन मेडिकलसाठी तयार झाला. विजयचे नशीब खूप चांगले होते, नवीन मेडिकल लवकरच चांगले चालायला लागले.येणाऱ्या मिळकतीतून काही वर्षात त्याने  पूनमताईंचे भांडवल त्यांना परत दिले. ताईनेच त्याला तसे सांगितले. ताई ते पैसे दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार होती.आता विजय एका दुकानाचा स्वतः पूर्णपणे  मालक झाला होता. त्याचे एक स्वप्न पूर्ण झाले होते.


क्रमशः


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...