मराठी कथा, लेख

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

स्वप्न झाले खरे ! ( भाग 1 )

 


"अरे विजय,काय करतोय सध्या?" शेजारी राहणाऱ्या सुनील काकांची मुलगी , पूनमने विजयला विचारले.


"बारावी सायन्सला होतो,आताच परीक्षा संपली." विजयने सांगितले.


"पुढचे काय ठरवले आहे,काय करायचे आहे तुला?"पूनमने विचारले.


"अजून तरी काही ठरवले नाही. रिझल्ट कसा येतो त्यावरून ठरवेल " - विजय 


"आता सध्या तू काही करत नसणार तर येतो का माझ्याबरोबर मुंबईला? आमचे मेडिकल शॉप आहे. मला कामासाठी मुलाची गरज आहे.तू करशील का काम तिथे? तुझ्या घरची परिस्थिती सांगितले आईने मला.तुम्हांलाही पैशांची गरज आहेच ना ? तुझ्या आईवडिलांना मी विचारते." पूनम विजयला म्हणाली.


"आईवडिलांनी परवानगी दिली तर नक्की येईन मी." - विजय 


पूनमला तिच्या आईकडून विजयच्या घराची परिस्थिती कळाली होती.


विजयचे वडील एका कापड मिलमध्ये कामाला होते. नोकरी होती तोपर्यंत बरे चालू होते.पण मिल बंद पडली आणि यांचे कामही बंद झाले.लगेच काम मिळणेही शक्य नव्हते. तरी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. एकदोन ठिकाणी नोकरीचा प्रयत्नही केला पण कुठेच यश आले नाही. व्यवसाय करून पाहिला त्यातही जम बसला नाही. अडचण कमी न होता उलट कर्ज होत गेले.घरखर्च, मुलांचे शिक्षण व इतर जबाबदाऱ्या पार पाडणे अवघड होत चालले होते.विजयच्या काकांनी एकदोनदा मदत केली. पण तेही कितीदा मदत करणार. प्रत्येकाला आपला संसार, जबाबदारी असतेच ना! विजयची आई पापड,कुरडई असे वाळवणाचे पदार्थ करून विकू लागली, दोन-तीन घरांचे स्वयंपाकाचे काम घेतले.तेवढाच  घरखर्चाचा भार हलका झाला. विजयला परिस्थिती समजत होती त्यामुळे आपण घरासाठी काही करू शकतो का ? हाच विचार तो करत होता आणि पूनमताईने कामाचे विचारल्यावर लगेच तयार झाला.पूनमने विजयच्या आईवडिलांना त्याला मुंबईला घेऊन जाण्याविषयी विचारले तेव्हा ते ही पटकन तयार झाले. सुनील काका व त्यांच्या मुलीला पूनमताईला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे;यासाठी आपण काही करू शकतो का? या विचारानेच त्यांनी आपल्या विजयला कामासाठी विचारले असेल...आणि त्यामुळेच त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळेच विजयच्या आईवडिलांनी विजयला पूनमताईबरोबर मुंबईला पाठवले.

पहिल्यांदाच आईवडील,भाऊबहिण यांना सोडून, घरापासून दूर विजय मुंबईला आला होता. त्यामुळे त्याला वाईट तर वाटतच होते. पण काहीतरी चांगले करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतोच. आपल्या कुटुंबाची परिस्थिती चांगली करण्यासाठी आपल्याला हा त्रास सहन करावाच लागेल.भविष्यात चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला आता कष्ट घ्यावेच लागतील.गावाकडे जास्त पगारही मिळाला नसता आणि पूनमताई आपल्या घरासारखीच आहे. त्यामुळे तिलाही आपली मदत होतेच आहे आणि आपल्यालाही पैसे मिळत आहे.


पूनमताईंनी विजयची मेडीकलमध्येच राहण्याची सोय केली. घरगुती जेवणाच्या डब्याची सोय करून दिली. जेवणाचा खर्च विजय स्वतः करणार ,बाकी राहण्याचा खर्च वगैरे नाही. विजय हुशार होताच व त्याला  व्यावसायिक ज्ञानही खूप होते.त्यामुळे कमी दिवसातच तो मेडीकलची सर्व कामे पटकन शिकला. त्याचे काम,त्याचा प्रामाणिकपणा पाहून पूनमताई व तिचे मिस्टर खूश होते.एक महिना काम केल्यानंतर, हातात आलेला पहिला पगार पाहून विजयला अतिशय आनंद झाला. त्याच्या डोळ्यातून पाणीच आले.कष्ट करून मिळालेल्या पैशाचा आनंद काही औरच असतो! याची त्याला जाणीव होऊ लागली. त्याने ते सर्व पैसे गावाला आईवडिलांकडे पाठवले. आपल्या घरासाठी आपण काहीतरी चांगले करतो आहे, याचे त्याला समाधान वाटत होते.विजयचा बारावीचा  रिझल्ट लागला. तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. 'D. Pharmacy करं.' असे पूनमताईंनी त्याला सूचवले. आपल्याला आता मेडिकलचे सर्व समजायला लागले व यात आवडही निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याने D.Pharmacy  करायचे ठरवले.

पूनमताईंच्या मिस्टरांनी त्याचे मुंबईतच D.Pharmacy  ला ऍडमिशन करून दिले.सध्या फी व इतर खर्च त्यांनी केला व दर  महिन्याला विजयच्या पगारातून ते कमी करणार होते.कॉलेज सुरू झाल्यावर,मेडीकलला पूर्ण वेळ देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने कॉलेजनंतरचा वेळ आणि रात्री उशिरापर्यंत मेडिकलमध्ये काम करण्याचे ठरवले. पगारही सुरू राहील व कॉलेजही करता येईल.मेडिकल 24*7 सुरू असायचे आणि चांगले चालायचेही.त्यामुळे पूनमताईंना कामासाठी जास्त लोकांची गरज होतीच.विजयला हे सर्व करत असताना, खूप कष्ट पडणार होते; पण आपल्या स्वतः चे D.Pharmacy चे सर्टिफिकेट आले तर कधीना कधी स्वतः चे मेडिकल सुरू करू शकू. आपल्या स्वतः चे एक तरी मेडिकल व एक छोटेसे का असेना पण स्वतः चे एक घर व्हावे. अशी विजयची स्वप्न होती. आणि त्याची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कष्ट करायला तयार होता.


क्रमशः 


नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...