"अगं..मंगल तुझा मोबाईल एकसारखा वाजतो आहे. घे ना लवकर."
सुमन मंगलला म्हणाली.
"अगं जेवणाचा उष्टा हात धुऊन घेतचं होते, तोपर्यंत मोबाईल सारखा वाजतोच आहे. कोणाचं इतकं महत्त्वाचं काम आहे काय माहित?"
आपल्या बॅगमधून मोबाईल काढता काढता मंगल सुमनला म्हणाली.
तिने बॅगमधून मोबाईल काढला आणि पुन्हा फोन वाजला.तिने पटकन घेतला आणि ती काही बोलण्याच्या आतच पलिकडून आवाज आला.
"हॅलो मंगल मावशी, मी पंकज बोलतो आहे.तुम्ही लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये या."
पलिकडून बोलणारा पंकज खूप घाईत होता त्यामुळे तो फोनवर जास्त काही बोलला नाही.
अर्धवट माहिती, अचानक असा आलेला तातडीचा फोन आणि हॉस्पिटलमध्ये बोलावले. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या मनात नको ते विचार येऊ लागतात. चांगल्या विचारांपेक्षा वाईट विचारच जास्त येतात.
मंगलच्या बाबतीतही असेच झाले होते.
'हॉस्पिटलमध्ये एवढ्या घाईत का बोलावले? काय झाले असेल ?'
अशा अनेक विचारांनी मंगलचे मन घाबरत होते.
तिने आपली सहकारी मैत्रीण सुमनला सांगितले आणि कंपनीतील साहेबांकडून जाण्याची परवानगी घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघाली.जाताना एकीकडे मनात एकसारखी धाकधूक होत होती आणि दुसरीकडे मुखाने देवाचे नामस्मरण सुरू होते.
मंगल हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा तिला तिथे तिच्या घराजवळील ओळखीचे लोक आणि सचिनचे मित्रही दिसले. काहीतरी गंभीर प्रकरण झालेले आहे... असे तिला वाटू लागले.
"काय झाले? तुम्ही सर्व इथे कसे? आणि मलाही इथे का बोलावले? "
मंगलने घाबरत घाबरत विचारले.
"मावशी, सचिनने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.तुमच्या बाजूच्या मावशी काहीतरी कामासाठी त्याला बोलवायला गेल्या तेव्हा त्याची हालत पाहून खूप घाबरल्या आणि आजूबाजूच्या सर्वांना बोलावले आणि आम्ही सर्व पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. डॉक्टर उपचार करता आहेत."
सचिनचा मित्र मंगलला म्हणाला.
हे सर्व ऐकून मंगल चक्कर येऊन पडली.
तिथे असलेल्या लोकांनी तिला बेडवर आणले आणि डॉक्टरांना बोलावले.
डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली.सचिनने केलेल्या प्रकाराचा तिला खूप धक्का बसला होता.
सचिनला हॉस्पिटलमध्ये लवकर आणले आणि पटकन उपचार सुरू झाले त्यामुळे त्याचे प्राण थोडक्यात वाचले होते.
आपला सचिन खूप मोठ्या संकटातून वाचला. हे ऐकून मंगलला बरे वाटले आणि कधी त्याला भेटावे?त्याच्याशी बोलावे? असे तिला वाटू लागले. पण तिच्या मनात एकच प्रश्न येत होता... सचिनने असे का केले?
आता तर सर्व छान,सुरळीत सुरू होते. मग...सचिनने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? तो फक्त खुश राहण्याचे नाटक करत होता का? त्याच्या मनातून ती गोष्ट कदाचित गेलीच नाही म्हणून त्याने आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला का? त्याच्या या परिस्थितीला कोण जबाबदार ? तो की आपण ...? असा विचार करत मंगलला सर्व भूतकाळ आठवू लागला होता.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.