'सायली...' असे बाळाच्या कानात बोलून कुर्रर... करत मंगलने बाळाचे नाव सर्वांना सांगितले. नाव ऐकून सर्वांना आनंद झाला. बाळही खूप खुश दिसत होते. जणू बाळालाही नाव खूप आवडले होते.
दोन भावांची एकुलती एक बहिण मंगलही खूप आनंदी होती.मोठ्या भावाला पहिला मुलगा आणि आता मुलगी झाली होती. लहान भावाचेही लग्न झाले होते आणि त्यालाही एक मुलगा होता.
मंगललाही एक मुलगी व एक मुलगा होता. मंगल आपल्या संसारात सुखी होती. तिच्या भावांचेही सर्व व्यवस्थित होते. मंगलचे व तिच्या भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.अडीअडचणीला एकमेकांना मदत करत होते.सुखदुःख वाटून घेत होते.आपल्या मुलांचे सुखी संसार व एकमेकांवरील प्रेम पाहून मंगलच्या आईवडिलांना समाधान वाटायचे. मंगलचे व तिच्या भावांचे जसे एकमेकांशी छान जमायचे तसेच त्यांच्या मुलांचेही एकमेकांशी छान जमायचे.सुट्टीत मुलांना घेऊन मंगल माहेरी आली की,सर्व मुले खूप मजा करायचे. सायलीला तिच्या मंगल आत्याचा खूप लळा होता. तिची आत्याही तिचे लाड करायची.त्यांचे प्रेम पाहून मंगलची आई तिला म्हणायची,
"मंगल, सायलीला सून करून घे बाई...छान जमेल सासू सूनांचे."
आईच्या बोलण्यावर मंगल व तिचे भाऊ हसायचे.
आजी काय बोलते आहे आणि सर्व का हसत आहेत. हे लहान मुलांना कळत नव्हते. ते आपल्या बालविश्वात रमलेले असायचे.
आईचे बोलणे ऐकून मंगलला हसू यायचे पण तिच्याही मनात सायलीला सून करून घेण्याचा विचार येऊ लागला आणि तिने आपल्या मनातील इच्छा भावाला सांगितली.
'आपली सायली आपल्या बहिणीच्या घरी गेल्यावर सुखीच होईल.' या विचाराने भावालाही आनंद झाला.
आपले आईवडील आपल्या भावी आयुष्याबद्दल काय विचार करत आहे. हे मुलांना कळतही नव्हते. ते आपले बहिण-भाऊ,मित्र-मैत्रीण या नात्याने एकत्र खेळत होते. बालपणाचा आनंद घेत होते.
असेच छान दिवस जात होते. दिवसानंतर वर्षेही उलटत होती. मुलेही लहानाची मोठी होत होती.
सायली सचिनकडे भाऊ या नात्यानेच पाहत होती,वागत होती.पण सचिनला सायलीबद्दल एक वेगळीच भावना जाणवू लागली होती. आजी,आई,मामा हे आपल्या व सायलीच्या नात्याविषयी काय बोलतात ? हे त्याने ऐकले होते. आपले व सायलीचे लग्न व्हावे ही सर्वांचीच इच्छा दिसत होती. हे सर्व बघून सचिनला आनंद होत होता आणि तो आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होता.आपल्या मनातील सायलीविषयीच्या नाजूक भावना त्याने कधी व्यक्त केल्या नाही. आज ना उद्या ती आपली होणारच आहे. या आशेवर तो सायलीशी छान पणे बोलत होता,वागत होता.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.