"आई,बाबा मला सचिनशी लग्न नाही करायचे. मी त्याच्याशी भाऊ या नात्यानेच बोलते,वागते."
सायली आपल्या आईबाबांना म्हणाली.
"सायली, तुझे आणि मंगल आत्याचे छान जमते. तू सचिनशी लग्न केल्यानंतर सुखात राहशील. आत्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.सचिनही खूप चांगला मुलगा आहे. तो तुला सुखात ठेवेल.आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की, तुझे आणि सचिनचे लग्न व्हावे व तुम्ही सुखाने संसार करावा."
सायलीचे आईबाबा तिला समजावून सांगत होते.
"तुम्ही सर्व तुमच्या इच्छेचा विचार करत आहेत. पण माझ्या इच्छेचे काय? आत्या,सचिन हे सर्व खूप चांगले आहेत.आत्या म्हणून व सचिन भाऊ म्हणून मला ते आवडतात. मी त्यांचा आदरही करते. पण आयुष्याच्या जोडीदाराविषयी माझ्या ज्या अपेक्षा आहेत, त्या मला सचिनमध्ये दिसत नाही आणि त्या दृष्टीने मी त्याचा कधी विचारही केला नाही. सचिन खूप चांगला आहे. हे मी मान्य करते पण माझे शिक्षण त्याच्या पेक्षा जास्त आहे. आमच्या वागण्याबोलण्यात खूप फरक आहे.मला माझ्या योग्यतेच्या मुलाशी लग्न करायचे आहे. मला तुमच्या सर्वांच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. मी जर तुमच्या भावनांचा विचार करून सचिनशी लग्न केले तर मी सुखी नाही राहू शकणार. आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा मी अगोदरच तुम्हांला माझे मत सांगून देते."
सायलीने आपल्या मनातील भावना आईबाबांना सांगितल्या.
सायलीचे म्हणणे ऐकून तिचे आईबाबा विचारात पडले.
'एकीकडे सायलीचे सुख तर दुसरीकडे बहिणीचा आनंद.आपण सर्वांनीच सायली व सचिनच्या सुखी संसाराची पाहिलेली स्वप्ने!
सायलीचे ऐकले तर ...मंगलला व सचिनला काय उत्तर द्यावे? त्यांना किती वाईट वाटेल? आणि त्यांच्या आनंदासाठी सायलीचे सचिनशी लग्न लावूनही दिले तर... सायली खरचं सुखात राहील का?'
असा विचार करत काय निर्णय घ्यावा हेचं त्यांना सूचत नव्हते.
खूप विचार केल्यानंतर त्यांनी ठरवले की, सायलीला तिच्या मनासारखा मुलगा शोधू आणि सचिनलाही एखादी चांगली मुलगी बघू. लग्न करून एकदाचे संसारात रमले की, सर्व ठीक होईल. आपली मंगल खूप समजूतदार आहे. तिला सर्व व्यवस्थित समजावून सांगितले तर समजून घेईल.
आणि ठरवल्याप्रमाणे त्यांनी मंगलला सर्व समजावून सांगितले.हे ऐकून तिला खूप वाईट वाटले; पण मुलांच्या सुखाचा विचार करून तिने भावाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
आईबाबांनी घेतलेल्या निर्णयामुळे सायलीला खूप आनंद झाला होता आणि आत्यानेही सर्व समजून घेतले होते त्यामुळे सायलीला त्याचा विशेष आनंद झाला होता.
आता तिच्यासाठी वरसंशोधन ही सुरू झाले होते.
सायलीसाठी मुलगा शोधत आहे. हे सचिनला कळल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटले. खूप रडावेसे वाटू लागले.
'आपले मन ..आपले प्रेम सायलीला कधी जाणवलेच नाही का?मी तिच्यावर मनापासून प्रेम केले, आमच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहिली आणि आमचे लग्न व्हावे ही घरातल्यांचीही इच्छा होती.पण सायलीने माझ्याशी लग्न करण्याला नकार का दिला ? '
सचिन दुःखी मनाने विचार करू लागला.
क्रमशः
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.