मराठी कथा, लेख

रविवार, २९ जून, २०२५

मुखवटे 1

 


"अरे स्मित, सावकाश चालव रे सायकल..."


असे लीना तिच्या मुलाला स्मितला म्हणाली आणि तेवढ्यात स्मित थोड्या अंतरावर जाऊन सायकलवरून पडलाही. 


"बघं,  मी सांगत होते ना.. सावकाश  चालव सायकल... पण तू ऐकतच नाही आईचं."


 असं थोडसं रागात पण काळजीच्या स्वरात लीना बोलत स्मितकडे चालली होती.

 ती त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच एका काकूंनी त्याला उठवले व मायेने जवळ घेतले. आई आता आपल्याला रागवेल या भीतीने लीना जवळ जाताच स्मित अगोदरच तिला जाऊन बिलगला. स्मितला जवळ घेऊन त्याला कुठे लागले का हे पाहत लीना त्या काकूंना 'थँक्यू' म्हणाली. 


लीनाने 'थँक्यू' म्हणताच त्या काकू तिला म्हणाल्या,


 "थँक्यू काय त्यात? स्मित मला माझ्या नातवासारखाच आणि आपण एकाच बिल्डिंगमध्ये तर राहतो. शेजारधर्म व माणुसकी म्हणून एकमेकांना मदत करावीच लागते.


"किती क्युट आहे ना स्मित?"


 काकूंच्या सोबत असलेल्या स्त्रीने स्मितच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.


 "ह्या तुमची मुलगी आहे का?"


 लीनाने काकूंना त्या स्रीविषयी विचारले.


"नाही गं सून आहे ती माझी; पण मला मुलीसारखीच..."


 त्या स्त्रीच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्या काकू म्हणाल्या.


"सॉरी हं.. मला माहित नव्हतं. आम्ही आत्ताच राहायला आलो आहोत ना बिल्डिंगमध्ये.   तुम्ही दोघी रोज यावेळी खाली दिसतात. एकमेकांची खूप काळजी घेतात. म्हणून मला वाटले की, तुम्ही आई व मुलगी आहे."


"अगं,तुला  वाटले तसे सर्वांनाच वाटत असते. तिला डॉक्टरांनी फिरायला सांगितले आहे. ती एकटी फिरायला येण्याचा कंटाळा करते म्हणून मी तिला सोबतीला येते. तिची डिलिव्हरी सुखरूप झाली पाहिजे एवढीच अपेक्षा."


काकू लीनाला म्हणाल्या.


"होईल ना काकू सर्व व्यवस्थित. काळजी नका करू."


लीना काकूंना म्हणाली व ती काकूंशी अजून गप्पा मारणार होती. तेवढ्यात स्मित घरी जाण्यासाठी रडू लागला. त्यामुळे 'पुन्हा भेटू' असे सांगत लीनाने त्या दोघींचा निरोप घेतला व स्मितला घेऊन घरी गेली.


 लीनाच्या नवऱ्याची बदली मुंबईला झाली होती. त्यामुळे नुकतेच ते या बिल्डिंगमध्ये राहायला आले होते. हळूहळू बिल्डिंगमध्ये सर्वांशी ओळखत होती. आज स्मित  सायकलवरून पडल्यामुळे काकू व  त्यांच्या सुनेशी ओळख झाली. त्यांच्याशी बोलून लीनाला खूप चांगले वाटले आणि सासू सुनांचे इतके प्रेम पाहून थोडे आश्चर्यही वाटले.


 'सर्व सासू काही वाईट नसतात. काही चांगल्याही असतात. असे ऐकले होते; पण आज प्रत्यक्षात पाहिलेही.' असा लीना विचार करत होती.


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

कृष्णप्रेम

 1) कान्हाच्या सावळ्या,सुंदर, मोहक मुखावर छान असे हास्य खुलते त्याच्या हास्यात एक वेगळीच जादू असते जी सर्वांना त्याच्या प्रेमाची भुरळ पाडते...