मराठी कथा, लेख

Breaking

रविवार, २९ जून, २०२५

मुखवटे 2

 


 दारावरची बेल वाजली म्हणून काम करता करता लीना दरवाजा उघडायला गेली. दरवाजा उघडला तर दारात काकूंचा मुलगा होता. पेढे द्यायला आलेला होता. लीनाने पेढे घेतले व त्याचे अभिनंदन केले आणि बाळाची व  बाळाच्या  आईच्या तब्येतीची विचारपूस केली. काकूंच्या  मुलाला दुसरीकडे जायचे होते, म्हणून तो घाईत होता. बाळ व बाळाची आई सुखरूप आहे. हे ऐकून लीनाला बरे वाटले.


 नोकरी,घरातील कामे व स्मितकडे लक्ष देणे. यात लीना गुंतून गेली होती. त्यामुळे बिल्डिंगमध्ये कोणाशी जास्त बोलायला वगैरे तिला वेळ मिळत नव्हता.






 काही महिन्यानंतर एके दिवशी लीना जेव्हा स्मितला सायकल चालविण्यासाठी बिल्डिंगच्या खाली घेऊन आली होती,  तेव्हा तिला त्या काकू व त्यांची सून दिसली.  बाबागाडीत तिचे बाळही होते.  


अगोदर ओळख झाली असल्याने लीना त्यांच्याजवळ गेली व बाळाला पाहून म्हणाली,


 "खूप सुंदर आहे बाळ! नाव काय आहे बाळाचे?"


"श्लोक आहे त्याचं नाव."


 काकू आनंदाने म्हणाल्या.


"खूप छान आहे नाव!"


 असे लीना आनंदाने म्हणाली.



 मग थोड्याफार  गप्पा झाल्यावर ती त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली.






 असेच दिवस जात होते,महिने जात होते.



 लीनाचे आपले रुटीन सुरू होते.


 बिल्डिंगमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात आणि कधी येता जाता लीनाला त्या काकू व त्यांची सून भेटत होत्या. नेहमीप्रमाणे त्यांच्या वागण्याबोलण्यातून चांगुलपणा,  प्रेमळपणा व आनंद दिसत होता.


 सर्व कसे छान सुरळीत सुरू होते.


 लीना आपल्या संसारात बिझी होती. बिल्डिंगमध्ये काकूंप्रमाणेच तिची इतरांशी थोडीफार ओळख झाली होती. तिला काकूंची सून मीनल  अधून मधून  येताना जाताना भेटायची. ती जॉब करत होती आणि तिच्या बाळाला तिच्या सासूबाई घरी सांभाळत होत्या. हे ऐकून लीनाला खूप छान वाटले. 


 घरी असा सपोर्ट  असला की,   प्रत्येक स्त्रीला आपले करिअर करायला, नोकरी वगैरे करायला सोपे जाते.  लीनाचा काकूंविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढतच होता.


 'अशी सासू सर्व सुनांना मिळाली आणि मीनलसारखी प्रेम करणारी सून सर्व सासूंना मिळाली तर... सासूच्या मुलाला व सुनेच्या नवऱ्याला काही टेन्शन राहणार नाही. कोणाची बाजू घेऊ? हा ही प्रश्न त्याला राहणार नाही. आईचा श्रावण बाळ किंवा बायकोचा बैल असेही कोणी म्हणणार नाही. घरात वादविवाद न होता शांती,समाधान राहील व जीवनात आनंदी आनंदच... '


असा विचार लीनाच्या मनात आला व तिला आपल्या विचाराचे हसूही आले.


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...