मराठी कथा, लेख

Breaking

रविवार, २९ जून, २०२५

मुखवटे 3

 


 "अहो ताई, तुम्हांला काही कळले का?"


 लीनाच्या घरात  लादीकाम करणाऱ्या अनिताने लीनाला विचारले.


"कशाबद्दल?"


 लीनाने तिला प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.


"अहो, त्या 401  मधील सानेबाई आहेत ना,  त्यांच्या सुनेने घटस्फोट घेतला त्यांच्या मुलाशी व आपल्या मुलाला घेऊन कुठे दुसरीकडे गेली राहायला.  दुसरे लग्न केले  तिने."



अनिताने असे सांगताच, लीनाला यावर काय बोलावे?  हेच सुचत नव्हते. तिच्यासाठी हा मोठा धक्काच होता.


 "अगं, असे काही नसेल गं,  तुझ्या ऐकण्यात काही गोंधळ झाला असेल. त्यांची सून नसेल.  दुसरी कोणाची सून असेल. त्या दोघी सासू सूना तर आई मुली सारख्या राहत होत्या.  काकूही किती समजूतदार व सूनही प्रेमळ होती. असे कसे होऊ शकते?"


 लीनाने आश्चर्य व्यक्त करत अनिताला म्हणाली.


 "अहो ताई, त्यांच्याकडे काम करणारी राधा माझी मैत्रीण आहे. तिनेच मला सर्व सांगितले. त्यांच्या घरात खूप भांडणे होत होती. राधाला जास्त काही कळाले नाही; पण ती सून तिच्या मुलाला घेऊन गेली व घटस्फोट घेतला नवऱ्याशी. एवढेच राधाला कळले आहे. ती घर सोडून का गेली? हे काही माहीत नाही."


 असे सांगून अनिताने ही बातमी खरी असल्याचे लीनाला पटवून दिले. आणि ती आपले काम करून चालली गेली.


पण या बातमीने लीना विचारात पडली.


'का केले असेल मीनलने असे? तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम होते का? घरात काही त्रास होता का? पण काकू व तिचा नवरा तर चांगलेच वाटले मला.'

या विचारातच लीना सुन्न मनाने आपले काम करू लागली.



 लीनाप्रमाणेच बिल्डिंगमध्ये इतरांनाही जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा त्यांनाही असाच धक्का बसला होता.


'मला तर ती अगोदरपासून अशीच वाटत होती. तिचे नक्कीच बाहेर कुठे काहीतरी असेल...'


 असे काहीजण म्हणत होते.


 तर काही जणांचे म्हणणे होते,


'असा नवरा असल्यावर कोणती बाई संसार करणार त्याच्यासोबत?'


 अशा अनेक चर्चा बिल्डिंगमध्ये होत होत्या.


 काय खरे? व काय खोटे? कोणालाच माहित नव्हते. आणि त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करावी एवढे धाडस म्हणा किंवा असे करणे कोणाला योग्यही वाटत नव्हते.


 काकूंचे मिस्टर वारलेले होते. मुलीचे लग्न होऊन ती सासरी राहत होती. काकू मुलगा, सून  व नातू असे चौघेजण  राहत होते. आता सून व नातू निघून गेल्यामुळे, त्या व मुलगाच राहत होते. 



"मीनल व श्लोक दिसत नाही?"


 असे त्यांना कोणी विचारल्यावर,


"ती घर सोडून गेली, तिने दुसरे लग्न केले."


 एवढेच त्या सांगत होत्या.



 लीनाला तर अजूनही घडलेल्या प्रकारावर विश्वास बसत नव्हता. मीनल अशी कशी वागू शकते? हा प्रश्न जाणण्याची तिला उत्सुकता होती.


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...