मराठी कथा, लेख

Breaking

शुक्रवार, २७ जून, २०२५

तिचे कर्तव्य

 


' इकडून माहेरी काही नाही नेले तरी नेलेच आणि माहेरी काही मदत केली नाही तरी केलीचं. असे सासूबाईंना नेहमी वाटत असते. असेही बोलणे ऐकावे लागतात आणि तसेही ऐकावेचं लागतात. त्यामुळे  त्यांना सांगूनच किंवा त्यांच्यासमोरच जी काय मदत करायची ती करावी. मला तरी असेच वाटते.'


 असे स्नेहाचे म्हणणे होते आणि ती तिच्या या म्हणण्यानुसारच वागत होती.


 साडीच्या विषयानंतर स्नेहा तर आपल्या कामाला लागली पण मनातील खदखद बाहेर काढल्याशिवाय शांत कशा बसतील सासुबाई? कसे चैन पडेल  त्यांच्या जीवाला? शेवटी आपल्या मनातील सल मुलाजवळ  त्यांनी बोलून दाखवलीच.



 "अमित,तुला वेळ असेल तर बोलू का तुझ्याशी?"



"बोल ना गं आई, असे विचारते काय?"


अमित आपल्या आईच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला.


स्नेहाच्या सासूबाई  साडीच्या प्रसंगाला धरून तिखटमिठ लावत मुलाला सांगू लागल्या.


 "अमित, तुला माहिती आहे ना मला कपड्यांवर जास्त खर्च केलेला आवडत नाही.  हौसमौज करायची पण जरा सांभाळून. तुला तर सर्व माहितच आहे.. मी आणि तुझ्या बाबांनी कसा संसार केला?  तुला व रश्मीला कसे वाढवले ते? पै पै जमा करून संसार व तुमचे शिक्षण केले. कधी  स्वतःसाठी काही घेतले नाही. हौसमौज तर आयुष्यात कधी माहित नाही. हौसमौज करायला एवढा वेळही नव्हता व पैसाही नव्हता आमच्याकडे. माझ्या माहेरचा मला थोडाफार आधार होता म्हणून आमचा संसार व्यवस्थित सुरू होता.  पोटाला चिमटा काढत आम्ही दिवस काढले.  म्हणून तुम्हांला सुखाचे दिवस आले ना आज? 

आता माझ्यासाठी स्नेहाने घेतली होती ना साडी?  मग  तिच्या आईसाठी एवढी महाग साडी घ्यायची काय गरज होती? तिच्या माहेरची परिस्थिती चांगली आहे. वडिलांना पेन्शन आहे. भावाला चांगली नोकरी आहे. त्यांचे सर्व छान आहे ना?  मग स्नेहाला त्यांच्यासाठी एवढं सार काही करायची काय गरज आहे? माहेरी गेली की नेहमी काही ना काही घेऊनच जात असते. माझ्या आईला हे आवडते, बाबांना ते आवडते, भावाला, वहिनीला व त्यांच्या मुलांनाही काहीतरी देणे सुरूच असते. माझ्यासमोरच एवढे सारे करते.  मग मला न सांगता अजून काय देत असेल  माहित नाही?  ती नोकरी करते, पैसा कमवते याचा अर्थ असा नाही की, तिने तिच्या मर्जीने पैसा खर्च करायचा. आतापासून पैसा वाचवला तर भविष्यात तुम्हांलाच कामात येईल ना?  माझ्या अनुभवातून सांगते आहे. तू तिला काही बोलत नाही का? मी तर तुझ्या बाबांच्या शब्दाबाहेर कधी गेली नाही. अजूनही त्यांचेच ऐकते. तू बोलत नाही म्हणून ती मनमर्जीपणे वागत असते. मी काही चांगले सांगायला गेली की, मी तिला वाईट वाटते. 'सर्व सासू अशाच असतात..' असे म्हणते. मला व तुझ्या बाबांना आता काही जास्त अपेक्षा नाही. फक्त मुलांचा संसार व्यवस्थित झाला पाहिजे एवढेच."


क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...