मराठी कथा, लेख

Breaking

शुक्रवार, १ मे, २०२६

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!" 


 पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली. 


 "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"


 अनिताने पल्लवीला विचारले.


 "हो, हाच  तो. त्याने सोसायटीच्या ग्रुपमध्ये अभद्र शब्दांत लिहिले होते.  आजपर्यंत आपल्या सोसायटीत अनेक वाद झाले, भांडणे झालीत पण कोणीही या पातळीपर्यंत गेले नव्हते."


 पल्लवी म्हणाली.


"माझे मिस्टर तर त्याचे मेसेजेस वाचून त्याला लगेच फोन करून बोलणार होते. पण मीच नको म्हटले. बहुतेक तो दारूच्या नशेत असावा म्हणून असे लिहिले असावे.  एवढ्या रात्री त्याला फोन करून हे बोलले असते  आणि तो नशेत अजून  यांना काही बोलला असता, वाद केला असता. म्हणून मी यांना फोन करू दिला नाही."


अनिता म्हणाली.


 "या माणसाकडे आता पाहून वाटते की, 'दिसतं तसं नसतं.' 


 जेव्हा बिल्डिंगमध्ये तो राहायला आला होता, तेव्हा त्याची फॅमिली पाहून किती छान वाटले होते! इथे राहायला आल्यावर त्याने सत्यनारायणाची पूजा केली. सर्वांना प्रसादाला बोलावले होते. आई, वडील, मुलगा, सून व दोन नातू. असे छान कुटुंब पाहून खूप छान वाटले.  त्यांचे बोलणे, वागणे व घरातील धार्मिक वातावरण पाहून मला खूप समाधान वाटले. कुटुंब असावं तर असं! असं त्यांच्याकडे पाहून मनात येत होतं."


पल्लवी म्हणाली.



"हो, ना  मलाही छान वाटलं होतं. आजच्या काळात एकत्र आणि तेही सुखी कुटुंब पाहण्यास  मिळण. हे खूप दुर्मिळ झाले आहे."


 अनिताने पल्लवीच्या म्हणण्याला दुजोरा दिला.


"त्याच्या आई एके दिवशी माझ्याकडे आल्या होत्या. त्या काय कार्य करतात. ते सांगत होत्या. छोट्या मुलांसाठी  बाल संस्कार वर्ग, तरुण वर्गासाठी युवा वर्ग चालवतात. चांगल्या विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी घरी उपासना ठेवतात आणि सोसायटीतील लोकांना बोलावतात. धार्मिक पुस्तकांचे वाचन करून लोकांना सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगतात. ते हे कार्य खूप वर्षांपासून करत आहेत. त्यांच्यासारखे असे अनेक लोक आहेत, जे हे कार्य सर्व मिळून करत असतात. त्यांनी हे सर्व सांगितले आणि मी हे ऐकून खूप प्रभावीत झाले. मी त्यांच्याकडे उपासनेला जाऊ लागली. एक दोनदा त्यांचा हा मुलगाही होता. तोही आपले चांगले विचार व्यक्त करत होता.  अशा विचारांची, धार्मिक वृत्तीची लोकं व कुटुंब असायला हवी म्हणजे समाजात खूप सुधारणा होईल. असे माझ्या मनात आले."


 पल्लवी म्हणाली.


 "हो,ना. ही फॅमिली खूप धार्मिक व संस्कारी आहे. असे मलाही वाटले होते.  पण ग्रुपवर त्या दिवसाची त्याची ती भाषा, त्याचे ते शब्द व विचार जेव्हा कळले; तेव्हा खूप धक्काच बसला.  धार्मिक वाटणाऱ्या व्यक्तीकडून अशा अधर्मी वागण्याची अपेक्षाच कोणी केली नव्हती.  एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने असे लिहिले असते तर   समजू शकलो असतो. पण सामान्य व्यक्तीनेही असे लिहिताना खूप विचार  केला असता किंवा त्याच्यातील संस्कारांमुळे त्याने असे लिहिलेही नसते.  आपण ज्यांना आदर्श मानतो, त्यांच्या विचारांनी व कार्याने प्रभावित होतो आणि ते लोक जेव्हा अधर्माने वागतात तेव्हा खूप वाईट वाटते. आपल्यासारख्या लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो. "


अनिता म्हणाली.


"तुझे म्हणणे पटते आहे मला. समाजात असे अनेक लोक आहेत, जे लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात. लोकांसाठी श्रद्धेचे स्थान बनतात आणि एक दिवस लोकांना त्यांचे खरे रूप कळते, तेव्हा खूप वाईट वाटते. यापूर्वी अशा घटना होऊन गेलेले असतात. तरीही लोक अशा भोंदूगिरीला बळी पडत असतात. असे अधर्मी लोक असतात जे लोकांच्या भक्तीचा व श्रद्धेचा गैरफायदा घेत असतात. लोकांची दिशाभूल करत असतात. धर्माच्या नावाने लोकांना फसवत असतात. मला अशा  लोकांचा राग तर येतोच पण त्याहून जास्त राग त्या लोकांचा येतो, जे लोक या भोंदू लोकांकडे जातात. या लोकांना काय गरज आहे अशा लोकांकडे जाण्याची?"


 पल्लवी राग व्यक्त करत म्हणाली.


 "अगं, आपल्या देशातील लोक खूप श्रद्धाळू तर आहेत, पण अनेक बाबतीत अज्ञानी पण आहे. त्याचा गैरफायदा असे भोंदूलोक घेत असतात. देवधर्म, श्रद्धा, पाप -पुण्य, कर्मकांड  या सर्वांचा आधार घेत दुष्कृत्य करत राहतात. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला चमत्कार होईल किंवा आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे जातील या आशेने  दु:खी, कष्टी लोक अशा भोंदूकडे जातात आणि जेव्हा अशा भोंदूचे पितळ उघडे पडते, तेव्हा लोकांना आपली चूक समजते. आता आपल्यालाही हा माणूस धार्मिक वृत्तीचा वाटलाच ना!  पण तो खरा धार्मिक नाही आहे. हे त्याने त्याच्या वागण्यातून दाखवून दिले ना त्या दिवशी.

 त्या दिवशी त्याने असे काही लिहिले नसते तर आपल्याला त्याचे खरे रूप कळले असते का? त्याच्या छोट्या मुलाचे सोसायटीतील एका मुलाबरोबर भांडण झाले म्हणून असे लिहायचे आणि ते ही सोसायटी ग्रुपवर? त्याचे विचार खरंच चांगले राहिले असते तर त्याने असे आणि तेही सोसायटी ग्रुपमध्ये लिहीले असते का?"


 अनिता म्हणाली.


 "लोकांना धार्मिक शब्दाचा खरा अर्थ कळायला हवा. खरा धार्मिक तोच असतो जो आपल्या धर्माचे म्हणजे आपल्या कर्तव्यांचे पालन करतो,  नितीनियमाने वागतो, इतरांना त्रास देत नाही, कोणावर अन्याय व अत्याचार करत नाही, इतरांच्या भल्याचाच विचार करत असतो. यासाठी खूप काही आणि वेगळंही करण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपली कामे प्रामाणिकपणे केली. आपले आचार विचार चांगले ठेवले तरी खूप झाले. पण सध्याची परिस्थिती पाहता लोकांना असे काही सांगितले की, लोकांना आपले म्हणणे पटत नाही. लोकांना फक्त दिखाऊपणा आवडत असतो. आणि तिकडेच ते धावत असतात."


 पल्लवी म्हणाली.


 "आपले धार्मिक ग्रंथ व आपला इतिहास आपल्याला हेच सांगत आहेत की, अधर्मावर धर्माचा व वाईटावर नेहमी चांगल्याचाच विजय होत असतो. त्यामुळे ज्यांना हे कळले आहे,  त्यांनी खरे धार्मिक राहून जीवन जगावे आणि आपल्या आचरणातून इतरांनाही प्रेरणा देत राहावी."


 अनिता म्हणाली.


 "आपल्या सोसायटीत हा व्यक्ती चुकीचा वागला. त्याला त्याबद्दल सोसायटीतील कमिटी मेंबर्सनी चांगलेच सुनावले व त्याने त्याच्या चुकीबद्दल माफीही मागितली. पण त्याच्याविषयीचा  माझा दृष्टिकोन आता बदलला आहे. त्यांच्या घरी उपासनेला जाण्याची माझी इच्छाही होत नाही." 


 पल्लवी म्हणाली.


"कमिटी मेंबर्सनी चांगलेच केले. यापुढे तो असे काही करणार नाही. आपल्याला उपासनेला गेल्यावर चांगले वाटत होते म्हणून आपण त्यांच्याकडे जात होतो. पण या प्रसंगानंतर जावेसे वाटत नाही आणि नाही गेलो तरी आपल्याला काही फरक पडणार नाही.  कारण आपल्याला  धार्मिकतेचा  खरा अर्थ समजला आहे आणि आपण तसे आचरण ठेवण्याचा प्रयत्नही करत असतो." 


 अनिता म्हणाली.


 "हो, हे खरेच आहे म्हणा. चल खूप गप्पा झाल्या आज. स्वयंपाकाचेही बघायचे आहे ना."


 पल्लवी म्हणाली.


 "हो, गृहिणीचा धर्म पार पाडायचा आहे."  


अनिता हसत म्हणाली.


 दोघींनी हसत हसत एकमेकींचा निरोप घेतला व दोघी आपल्या घराकडे गेल्या.




समाप्त 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...