"हॅलो, विजयदादा, कसा आहेस? प्रदीपने फोनवर आपल्या दादाला विचारले.
"मी मस्त! तू कसा आहेस? कधी येतो आहे इकडे? खूप दिवस झाले तुम्ही सर्व आले नाहीत इकडे."
विजयदादा म्हणाला.
"आम्ही येऊ तिकडे पण सध्या इकडे काम आहे ना; म्हणून नाही येऊ शकत. दादा, तुझ्याकडून थोडी पैशांची मदत हवी होती. आमचे काम झाले की तुला पैसे परत करु."
प्रदीप म्हणाला.
"किती पैसे हवे तुला आणि कशासाठी हवेत?"
विजयदादा म्हणाला.
"माझा एक मित्र बिल्डर आहे. आम्ही दोघांनी भागीदारीत एक जागा विकत घेतली होती. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून त्यासाठी मी कर्ज काढले. आम्हांला वाटले पुढे जाऊन त्या जागेची चांगली किंमत येईल किंवा तिथे बिल्डिंग बांधून फ्लॅट्स विकून पैसे कमवू. पण ठरवले तसे काही झालेच नाही. सुरुवातीला कर्जाचे हप्ते भरताना काही त्रास झाला नाही. पण आता घरात मोठे खर्च निघत गेले. पगार केव्हा संपून जातो कळतच नाही. आता आहे त्या किंमतीला ती जमीन विकून टाकावी. असे मी व माझ्या मित्राने ठरवले, पण ती जमीन कोणी विकत घ्यायला तयार नाही आणि मित्रालाही पैशांची अडचण आहे त्यामुळे तो माझ्या हिस्स्याचे पैसे देऊ शकत नाही. सर्व बाजूने कोंडी झाली आहे. काही चांगले करायला गेलो आणि झाले भलतेच. 50 लाखाचे कर्ज आहे. तू मला पैशांची मदत कर. मी संजयदादा, अरुणदादा व मुकेशदादा यांनाही सांगणार आहे. मी तुमच्या सर्वांचे पैसे हळूहळू करून देईन किंवा ती जमीन विकली गेली की लगेच सर्व पैसे देतो."
प्रदीपने सांगितले.
प्रदीपचे बोलणे ऐकून घेतल्यावर, विजयदादा म्हणाला,
"प्रदीप, तुला मी दिले असते रे पैसे. पण काय झाले आम्ही आत्ताच आमच्या दुकानाच्या दुरुस्तीचे काम काढले ना. त्याला खूप खर्च आहे; त्यामुळे नाही देऊ शकत. तू अगोदर बोलला असता तर काहीतरी व्यवस्था केली असती."
'विजयदादा एकदा खूप आजारी पडला होता,तेव्हा आपण त्याला मुंबईला आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याची सेवा केली आणि तो हॉस्पिटलचा खर्च देत होता पण आपण घेतला नाही. भावासाठी आपण एवढे तर करू शकतो. हा विचार, ही प्रेमाची भावना त्यावेळी मनात होती.'
'पैसे देऊ शकत नाही.' असे विजयदादाने सांगितल्यावर, प्रदीपच्या मनात विचार आले. विजयदादाकडून मदत न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रदीपने मोठ्या आशेने संजयदादा, अरुणदादा व मुकेशदादा या तिघांना फोन केला व आपली अडचण सांगितली.
"प्रदीप, तुझी अडचण मला समजली, पण आम्ही सायलीच्या लग्नाचे बघतो आहे. आता लग्नाला भरपूर खर्च लागेल. मीच तुझ्याकडे मागणार होतो पैसे."
असे संजयदादांनी सांगितले.
"प्रदीप, तुला तुझ्या अडचणीत मी मदत नाही करू शकत. याचे वाईट वाटते आहे रे. मी आणि माझ्या मित्राने नवीन बिजनेस सुरू केला त्यात मी पैसे गुंतवले आहे."
अरुणदादांनी आपले कारण सांगितले.
"प्रदीप, तुला तर माहित आहे की, अक्षय एम. एस. करायला यु.एस. ला चालला आहे. त्याला खर्च लागणार आहे. त्यामुळे मी तुला इच्छा असूनही मदत नाही करू शकत."
मुकेशदादांनी असे सांगत प्रदीपला पैशांची मदत केली नाही.
प्रत्येकाने अशी वेगवेगळी कारणे सांगितली, त्यामुळे प्रदीपला खूप वाईट वाटले आणि आपल्या भावांचा रागही आला. आपण आपल्या भावांसाठी आजपर्यंत काय काय केले? आणि त्यांना कशी मदत केली? हे सर्व त्याला आठवू लागले.
'संजयदादाला शेती घ्यायची होती तेव्हा त्याच्या एका शब्दावर मी त्याला पैसे दिले. अरुणदादाला त्याच्या व्यवसायात भांडवल हवे होते, तेव्हा मी मदत केली आणि मुकेशदादाच्या अक्षयला इंजीनियरिंगला ऍडमिशन मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न केले! मी तेव्हा त्यांना केलेली मदत खूप छोटी होती की मोठी होती? माहित नाही. पण ज्या भावनेने मी मदत केली, ती भावना खूप मोठी होती. संकटकाळी एकमेकांना मदत करणे. यातच नात्यांचे महत्त्व असते. मी मदत केली म्हणून त्यांनी भविष्यात मला मदत करावी. अशी कोणतीही अपेक्षा त्यावेळी माझ्या मनात नव्हती. माझ्याजवळ तेवढे पैसे होते म्हणून थोडीफार मदत करू शकलो. मदत ही फक्त पैशांची नसते तर आपण आपला वेळ कोणासाठी खर्च करतो आहे. हे ही महत्त्वाचे असते. कोणाच्या कामात आपण आपल्याकडून होईल ती मदत करू शकतो. हेचं खरे गरजेचे असते आणि तेच मी केले. आपल्या भावांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी करू शकतो. याचा आनंद मला होत होता. पण आता मला जेव्हा पैशांची गरज भासली, तेव्हा मला माझ्या भावांचीच आठवण झाली.त्यांच्या प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे आणि मी मागितलेली रक्कम ते सहज देऊ शकत होते. मी त्यांना नंतर ते पैसे परतही करणार होतो. बँकेच्या कर्जात व्याजच जास्त भरावे लागते. त्यामुळे हप्ते भरून घरात पैशांची अडचण वाढली आहे. भावांनी पैसे दिले असते तर, तेवढेच माझे व्याजाचे पैसे वाचले असते. मी पगारातून यांना पैसे दिले असते आणि जर जागा विकली गेली तर लगेच त्यांचे पैसे दिले असते. पण सध्या पैशांचे खूप टेन्शन आहे,त्यामुळेच तर भावांकडे मदत मागितली.'
प्रदीपच्या डोक्यात विचार सुरू होते.
"काय झाले? दादा देत आहेत ना पैसे?"
प्रदीपच्या पत्नीने प्रदीपला विचारले.
"नाही गं, त्यांना प्रत्येकाला काही ना काही अडचण आहे. त्यामुळे ते पैसे देऊ शकत नाही."
प्रदीपने सांगितले.
"मला माहीतच होते हे! मुखवट्यामागची नाती काय असतात? हे दिसणारच होते. जेव्हा त्यांना गरज होती, तेव्हा त्यांचा जो चेहरा होता, त्यांचे जे बोलणे होते ते आठवा. तुम्हांला तेव्हा त्यांची लगेच दया आली होती ना. आणि आता तेच सर्व चेहरे पण मुखवटे वेगळेच! व्यक्ती एकच असतो पण परिस्थिती बदली की लगेच त्याचे रूप बदलते. व्यक्ती आपल्या सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे धारण करत असतो. पण त्याचे हे वागणे इतरांना लक्षात येतेच. जसे आता आपल्याला तुमच्या भावांच्या प्रेमळ मुखवट्यामागील खरा चेहरा समजला आहे. आता कळले असेल तुम्हांला खरे रूप तुमच्या भावांचे! आतापर्यंत तुम्हांला तुमचे भाऊ किती चांगले आहे. असेच वाटत होते. किती कौतुक करत होते तुम्ही त्यांचे! त्यांच्यासाठी तुम्ही इतके काही केले, त्याची जाणीव एकालाही नाही ना! एकाच वेळी सर्वांना अडचण यावी? आपल्या अडचणीच्या वेळी कामात नाही आले तर नातेवाईक काय कामाचे! लोक वाईट दिवस लगेच विसरून जातात आणि मदत करणाऱ्यांनाही विसरून जातात.
'गरज सरो आणि वैद्य मरो.' असे म्हटले जाते ते खरे आहे."
प्रदीपच्या पत्नीने मनातले सगळे बोलून आपला राग व्यक्त केला.
"अगं, खरंच असेल त्यांना अडचण. नाही तर नक्की त्यांनी केली असती मदत. माझा माझ्या भावांवर विश्वास आहे."
प्रदीप आपल्या भावांची बाजू सावरत म्हणाला.
" इतके कसे तुम्ही साधे भोळे हो! इतकं आंधळ प्रेम नका करू आणि एवढा विश्वास पण नका ठेऊ कोणावर. तुमचे भाऊ तुमच्या या स्वभावाचाच गैरफायदा घेत असतात, पण तुम्हांला नाही समजले अजून. आता तरी शहाणे व्हा. यापुढे तुम्ही काहीच मदत नाही करायची त्यांना. "
प्रदीपची पत्नी काकुळतीने बोलत होती.
"माझ्या भावांनी नाही केली मदत. जाऊ दे. ते स्वार्थी व मतलबी आहेत. मग तू तुझ्या भावाकडे मागून बघ पैसे. देतो का तो पैसे? तेव्हा बोल तू आता एवढं बोलते आहे ते."
प्रदीपही रागाने बोलू लागला.
" माझ्या भावाला जेव्हा पैशांची गरज होती, तेव्हा दिले का आपण? तेव्हा तुम्ही अरुणदादांना गरज होती म्हणून त्यांना दिले ना पैसे! माझ्या भावापेक्षा तुमचा भाऊ जवळचा होता ना तुम्हांला!"
प्रदीपची पत्नी म्हणाली.
"आता तू जुन्या गोष्टी काढून भांडण वाढवणार आहे का? वाद करणार आहे का? अगोदरच खूप टेन्शन आहे आणि त्यात तू अजून टेन्शन नको वाढवू."
प्रदीप असे बोलून घराबाहेर निघून गेला.
आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन पाहून, प्रदीपच्या पत्नीला खूप वाईट वाटले. आपण उगाचच एवढे बोललो. याची तिला जाणीव झाली. अशा परिस्थितीत आपणच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. असा विचार करत तिने आपल्या भावाला फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली.
"बघतो काही प्रयत्न करून."
असे भावाने सांगितल्यावर, प्रदीपच्या पत्नीला थोडे बरे वाटले.
काही दिवसांनी,
" माझ्या भावाला जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा आपण त्याला पैसे दिले नाहीत,पण तरीही माझ्या भावानेच आपल्याला मदत केली. आताच त्याचा एक प्लॉट विकला गेला त्याचे पैसे व त्याच्याजवळचे काही सेविंग आणि मित्राकडून काही पैसे घेऊन तीस लाख रुपयांची आपल्याला त्याने मदत केली. हे पैसे आणि माझे दागिने विकून आणि बँकेच्या एफ.डी. मोडून आपण बँकेचे सर्व कर्ज फेडून टाकू. आता मी पण नोकरी शोधते म्हणजे आपल्या पगारातून आपण माझ्या भावाचे पैसे देत जाऊ. त्याने आपल्याला मदत केली तर आपणही त्याला लवकर पैसे द्यायला हवे. आणि ती जागा लवकरात लवकर विकण्याचे प्रयत्न करा. या जागेमुळेच आपल्यावर असा प्रसंग आला आहे, नाहीतर आपले सर्व व्यवस्थित सुरू होते. पण एका अर्थाने चांगले झाले म्हणा. त्यामुळे खरी नाती कोणती? ती कळली. आपलं कोण? आणि परकं कोण? हेही समजलं. "
प्रदीपची पत्नी त्याला म्हणाली.
तिच्या या बोलण्यात तिच्या भावाने मदत केली याचा आनंद होता. प्रदीपच्या भावांबद्दलची भावना आणि आपली पुढची जबाबदारी कोणती? हे सर्व काही त्यात होते.
आपण आपल्या पत्नीच्या भावाला मदत करू शकलो नव्हतो, पण तरी त्याने आपल्याला मदत केली. याचा प्रदीपला आनंद झाला व त्याचे त्याने त्यासाठी आभारही मानले आणि त्याचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे आश्वासनही दिले.
समाप्त
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.