मराठी कथा, लेख

Breaking

रविवार, १९ एप्रिल, २०२६

विठ्ठलाचे दर्शन

 "केशवभाऊ, आज उशीर झाला? तुमचे नेहमीचे गिऱ्हाईक येऊन गेलेत."


 रामभाऊ केशवभाऊंना म्हणाले.


 भाज्यांची व्यवस्थित मांडणी करत केशवभाऊ म्हणाले.

"हो, आज घरी पाहुणे आले होते ना! त्यामुळे यायला उशीर झाला."


 "नेहमी पाहुणे येत असतात भाऊ तुमच्याकडे."


 रामभाऊ म्हणाले.


 "आम्हांला दोघांना बरे वाटते आमच्या घरी कोणी आले तर. पाहुण्यांचे  गावात काही काम असते व आम्हांलाही भेटायला येत असतात."


 केशवभाऊ आनंदी चेहऱ्याने म्हणाले.


 रामभाऊंकडे गिऱ्हाईक आल्याने त्यांनी केशवभाऊंशी गप्पा थांबवल्या. 


रस्त्याच्या एका बाजूला रामभाऊंचे फळांचे छोटे दुकान होते आणि तेथेच बाजूला केशवभाऊ आपल्या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते.



 'आज उशीर झाला यायला. आपली नेहमीचे गिऱ्हाईक पण येऊन गेले. आता ऊन पण वाढू लागले आहे. उन्हाच्या वेळी कोणी येणार नाही भाजी घ्यायला. ऊन कमी झाल्यावरच येतील गिऱ्हाईक. पण आज राधाचा वाढदिवस आहे. आज मी घरी लवकर येईल. असे तिला सांगितले होते. तिला आज वाढदिवसाची भेट म्हणून काहीतरी घेऊन जाऊ. असे सारखे मनात येते आहे,  पण आज तर काहीच कमाई झाली नाही आहे.  रामभाऊंकडून  उसने घ्यावे लागतील पैसे.'


असा विचार करत केशवभाऊ गिऱ्हाईकांची वाट पाहत बसले होते.





 केशवभाऊ  हे  कुटुंबातील सर्वात मोठे होते. त्यांना एका ठिकाणी चांगली नोकरीही लागली होती, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना नोकरी सोडून आपल्या भाजीचा व्यवसाय करण्यास बोलावून घेतले. वडिलांना नकार देणे त्यांच्या विचारात बसत नव्हते; म्हणून नोकरी सोडून ते वडिलांना भाजीच्या व्यवसायात मदत करू लागले.  दोन्ही बहिणींची लग्न झाली. लग्नात भरपूर खर्च झाला होता, त्यामुळे घरात पैशांची मोठी अडचण झाली.  लहान भाऊ एका ठिकाणी नोकरी करू लागला. आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करावी. असे केशवभाऊंना वाटत होते, पण वडिलांची प्रकृती सध्या बरी राहत नसल्याने भाजीच्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी केशवभाऊंवर पडली. वडिलांच्या तब्येतीसाठी पैसे खर्च होऊ लागले पण शेवटी एवढे पैसे खर्च करून उपयोग झाला नाही. ते आपल्या कुटुंबाची जबाबदारी केशवभाऊंवर टाकून देवा घरी गेले. आणि काही दिवसांनी केशवभाऊंची आई पण देवा घरी गेली. पुढे लहान भावाचा पगार व भाजीच्या व्यवसायातून येणारा पैसा यामुळे परिस्थिती थोडी सुधारू लागली. केशवभाऊंचे लग्न झाले व केशवभाऊंच्या आयुष्यात राधाबाई त्यांच्या जीवनसाथी म्हणून आल्या. राधाबाई सर्व नाते व संसार छान सांभाळत होत्या.  पण घरात जाऊ आली व एका घराचे दोन घरे झाली. भावाला नोकरीतून चांगली मिळकत येत होती व त्याच्या बायकोच्या स्वभावामुळे कोणी नातेवाईक त्यांच्याकडे जात नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे पैशांची कमतरता भासत नव्हती. याउलट केशवभाऊ व राधाबाई  यांच्याकडे   सतत नातेवाईकांचे येणे-जाणे असायचे. घेणे-देणे सुरू असायचे आणि आपल्या चांगल्या स्वभावामुळे ते दोघेही कधीही या गोष्टींचा कधी कंटाळा करत नव्हते. त्यामुळे पैसा किती खर्च होतो? याचा ते विचार करत नव्हते. त्यामुळे परिस्थिती त्यांची साधारणच राहत होती. केशवभाऊ व राधाबाई यातच समाधानी होते. पण त्यांच्या आयुष्यात त्यांना मूलबाळ झाले नव्हते. याचे दुःखही त्यांना होते. सर्व प्रकारचे उपाय करूनही त्यांना यश मिळाले नव्हते. 'भगवंताची इच्छा' असे म्हणत ते दोघे आपले जीवन जगत होते.


 केशव भाऊ विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. दरवर्षी वारीला जात होते. मुखात नेहमी विठ्ठलाचे नामस्मरण सुरू असायचे. राधाबाई पण आपल्या पती सारख्याच विठ्ठलभक्त होत्या. विठ्ठलभक्तीत राहून आपले काम करत राहणाऱ्या!  केशवभाऊ व राधाबाई यांना जसे चांगले म्हणणारे लोक होते.  तसेच त्यांना वाईट समजणारे लोकही होते.  त्यांना मुलबाळ होत नव्हते, त्यावरून बोलणारे होते. ते दोघे एकमेकांना जीव लावत व एकमेकांची काळजी घेत. यावरूनही त्यांना नावे ठेवणारे लोक होते. हे सर्व पाहून केशवभाऊ व राधाबाईंना वाईट वाटायचे; पण त्यांचा आपल्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास होता. त्याच्यावर  खरी भक्ती होती.  त्यामुळे  त्या आधारावरच ते आनंदाने आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची विठ्ठलावर भक्ती होतीच, पण त्यांच्या वागण्यातही प्रामाणिकपणा होता. ते सर्वांशी प्रेमाने वागत होते. इतरांना मदत करत होते. आपल्याकडून जे चांगले होईल ते करण्याचा ते प्रयत्न करत होते.


 केशवभाऊंची विठ्ठलावर एवढी भक्ती होती की, त्यांना स्वप्नात विठ्ठल येऊन भेटायचा आणि कधी तर असे अनुभव यायचे की, विठ्ठल कोणाच्या रूपात येऊन आपली मदत करत आहे. असे त्यांना वाटायचे. 



वय वाढत होते. मूल होणे शक्यच नव्हते. पैसाअडका खूप नव्हता त्यामुळे मूल दत्तक घेण्याचा विचार ते करत नव्हते. 

दोघेजण एकमेकांचा आधार होऊन विठ्ठलभक्तीचा व जीवनाचा आनंद घेत जगत होते.






 आताही केशवभाऊ विठ्ठलाचे नामस्मरण करत गिऱ्हाईक येण्याची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक गृहस्थ येऊन उभे राहिले. राहणीमानावरून कोणी साहेब वगैरे असतील. असे वाटत होते. 


"काका, आज संध्याकाळी माझ्याकडे पूजा आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रमही आहे. त्यामुळे मला तुम्ही या सर्व भाज्या द्या. या सर्व भाज्यांचे किती पैसे झाले ते सांगा."


 ते गृहस्थ केशवभाऊंना म्हणाले.


 हे ऐकून केशवभाऊंना खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या सर्व भाज्या त्या गृहस्थाला विकल्या आणि त्यांच्याकडून पैसे घेतले.

केशवभाऊंना आपल्या सर्व भाज्या विकल्या गेल्या याचा आनंद तर झाला पण त्या आलेल्या गृहस्थामध्ये त्यांना आपल्या विठ्ठलाचे दर्शन झाले होते. याचा जास्त आनंद होत होता. 'देव आपल्या भक्तांची काळजी घेत असतो.'  या विचाराने केशव भाऊंच्या डोळ्यांतून पाणी आले. या आनंदातच केशवभाऊंनी त्या गृहस्थाला मनोभावे नमस्कार केला. आलेल्या पैशातून त्यांनी आपल्या बायकोला वाढदिवसाची भेट म्हणून छान साडी घेतली. घरी गेल्यावर बायकोला साडी  देऊन त्यांनी आनंद तर दिलाच पण आजचा प्रसंग सांगून अजून एक वेगळाच आनंदही दिला. आपल्या नवऱ्याची विठ्ठलभक्ती आणि त्यामुळे येणारे असे अनुभव हे पाहून राधाबाईंना समाधान वाटायचे. आजही नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून  त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.


 केशवभाऊ  व राधाबाई पैशाने खूप श्रीमंत नव्हते.  पैशाचा त्यांना जास्त लोभही नव्हता.  प्रामाणिकपणे ते आपले काम करून  पैसे कमवत होते. त्यात ते समाधानी होते.



 त्या दिवसानंतर ते गृहस्थ केशवभाऊंकडे नेहमीच येऊ लागले आणि भाजी घेऊ लागले. हळूहळू ओळख, परिचय आणि विचारपूस होऊ लागली.  ते गृहस्थ एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर नोकरीला होते. त्यांचे लग्न झालेले होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी होती. बायकोही स्वभावाने चांगली होती. एक दोनदा ते केशवभाऊ राधाबाईंना आपल्या घरी घेऊन गेले होते. 



 ते गृहस्थ केशवभाऊंना व राधाबाईंना 'आई व बाबा'  म्हणू लागले होते.


 "आई व बाबा, माझे आई-बाबा खूप वर्षांपूर्वीच वारले.  मला तुमच्यात माझे आई-बाबा दिसतात. तुम्ही माझ्या घरीच या राहायला. तुम्ही आता काही काम करू नका. मी तुमची सेवा करतो."


 ते गृहस्थ केशवभाऊंना व राधाबाईंना नेहमी असे म्हणत असत.


 मूलबाळ नसलेल्या केशवभाऊ व राधाबाईंना 'आई व बाबा' हे शब्द ऐकून खूप बरे वाटायचे. समाधान वाटायचे. पण त्यांनी त्यांच्या घरी जाण्यास नकार दिला व आपले भाजी विकणे सुरूच ठेवले. त्या गृहस्थावर ते आपल्या मुलासारखे प्रेम करत होते. वेळप्रसंगी त्यांच्या घरी जात होते. त्यांच्या मुलांना खाऊ घेऊन जायचे. आजी आजोबांसारखे प्रेम करायचे आणि अडचणीला ते गृहस्थ यांना  मदत करायचे. पैशांची मदत करत होते पण आजारपणात डॉक्टरांकडे घेऊन जात होते. काळजी घेत होते. सर्व काही एका मुलाप्रमाणे करत होते. 


हळूहळू ही गोष्ट जेव्हा केशवभाऊंच्या नातेवाईकांना व ओळखीच्या लोकांना समजली, तेव्हा हे पाहून काहींना या गोष्टीचा आनंद झाला. बरे वाटले.

 'केशवभाऊंचा विठ्ठलच त्यांना मदत करत आहे.' असे ते म्हणायचे.

 'केशवभाऊंच्या चांगल्या कर्माचे फळ त्यांना मिळत आहे.'

 असे काहीजण म्हणायचे. तर ज्यांना केशवभाऊंबद्दल वाईट भावना होती, ते म्हणायचे 'बघू किती दिवस असे होईल? यात त्या माणसाचा काहीतरी वेगळाच डाव असेल. यांना फसवत असेल.'


 पण केशवभाऊ व राधाबाईंची विठ्ठलभक्ती आणि देवाची अगाध लीला  म्हणावी की काय?  त्या गृहस्थाने केशवभाऊ व राधाबाईंची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. आयुष्यभर विठ्ठलभक्तीत राहणारे केशवभाऊ व राधाबाई समाधानाने हे जग सोडून गेले. 





समाप्त 

नलिनी बहाळकर






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...