मराठी कथा, लेख

Breaking

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

माफ करणं, सोपं आहे का?

 "रजनी, आज तू खूप आनंदी दिसतेस. या आनंदाचे कारण काय?"


सुमनने रजनीला विचारले.


"मी आज खूप आनंदी आहे कारण माझा मुलगा प्रणव बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने माझे स्वप्न पूर्ण केले आहे."


रजनी आनंदाने म्हणाली.


"छान आहे, अभिनंदन, आणि या आनंदाच्या प्रसंगी मिठाई  तर नक्कीच हवी."


सुमन रजनीचे अभिनंदन करत म्हणाली.


"मी मिठाई आणली आहे, मी तुम्हा सर्वांना देणारच आहे."


असे म्हणत रजनी पिशवीतून मिठाईचा डबा बाहेर काढू लागली.


 तेवढ्यात, एक अपघातग्रस्त पेशंट हॉस्पीटलमध्ये आला आणि सर्वजण त्या पेशंटसाठी आपआपल्या कामाला लागले.


आपले कर्तव्य प्रथम येते. असे समजून, रजनीने देखील मिठाईचा डबा तिच्या पिशवीत ठेवला आणि पेशंटला पाहण्यासाठी गेली.


तो पेशंट एक पुरूष होता. त्याच्या हाताला, पायाला व डोक्याला लागलेले होते. त्यातून रक्त येत होते. त्याच्या प्रकृतीवरून तो गरीब आणि दारू पिलेला असावा.  असे दिसून येत होते.


तो एका चालत्या गाडीसमोर आला होता. चालक दयाळू होता, म्हणून तो पळून गेला नाही. उलट तो स्वतः त्याला हॉस्पीटलमध्ये घेऊन आला.


पोलिसांनाही  बोलवण्यात आले.

 पोलिस अपघाताची चौकशी करत होते आणि डॉक्टर त्यांचे काम करत होते.


डोक्याला मार लागल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तो पेशंट बेशुद्ध पडला होता. 


रजनी त्याच्या डोक्याच्या जखमेला साफ करत असताना, त्या माणसाचा चेहरा पाहून तिला धक्का बसला व ती थोडी बाजूला सरकली.


तिचे वागणे पाहून,


"रजनी, काय झालं?" असे म्हणून सुमनने तिला हाक मारली.


"काही झालं नाही."


असं म्हणून रजनी तिचे काम संपवून खुर्चीवर बसली.


'त्याला अशा अवस्थेत पाहून मला दुःख वाटावे की आनंद?'


रजनी स्वतःशीच विचार करत होती आणि हे विचार करत असताना तिला तिच्या भूतकाळातील आठवणी आठवू लागल्या.




रजनीचे वडील एका छोट्या कंपनीत काम करत होते. रजनीला एक धाकटी बहीण आणि एक धाकटा भाऊ होता. रजनीने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. तिला नोकरी मिळणार होती, पण तिच्या काकूने तिच्यासाठी एक चांगला जोडीदार आणला. रजनीच्या वडिलांना हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी तिचे लग्न लावून दिले.


रजनी थोडीशी नाखूष होती, पण तिच्या वडिलांच्या आनंदासाठी तिने लग्नाला होकार दिला आणि ती तिच्या सासरच्या घरात आनंदाने राहू लागली.


रजनी आणि प्रकाश यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते. पण काही महिन्यांनंतर, रजनीला कळले की प्रकाशचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत.


रजनीने हे घरी सर्वांना सांगितले. तिचे सासू, सासरे, प्रकाशचा मोठा भाऊ आणि वहिनी या सर्वांना. पण रजनीला त्यांच्या बोलण्यावरून कळाले की सर्वांना हे आधीच माहित होते.


"तुम्ही सर्वांनी माझा विश्वासघात केला आहे आणि मी तुम्हाला यासाठी कधीही माफ करणार नाही."


रजनी रागानेच सर्वांना म्हणाली.



सर्वांनी रजनीची माफी मागितली.

 त्या मुलीला सोडून रजनी व आपल्या  कुटुंबाची काळजी घेण्याचे त्या सर्वांनी प्रकाशला सांगितले.


आता प्रकाश बाबा होणार होता. या आनंदाच्या बातमीने तरी तो  सुधारेल. असा कुटुंबाचा विश्वास होता.

पण 

गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत.


उलट रजनी आणि प्रकाशमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली.


 प्रकाशने रजनीला मारहाणही करायला सुरुवात केली. त्याचे स्वतःचे प्रेमसंबंध होते आणि तो रजनीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.


रजनीने प्रकाशला समजावून सांगण्याचा व तिचा संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रकाशमध्ये काही बदल झाला नाही 


त्यामुळे शेवटी प्रकाशच्या वाईट सवयींना कंटाळून रजनी कायमची तिच्या  माहेरी गेली.


'रजनीच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे.' 

रजनीच्या वडिलांना असे वाटू लागले आणि या तणावामुळे त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला.


रजनीची भावंडे शिक्षण घेत होती आणि घरातील इतर जबाबदाऱ्याही होत्या. आधीच खूप दुःखी असलेली रजनीची अवस्था तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आणखीनच वाईट झाली.


'प्रकाश चांगला असता तर मी माझ्या सासरच्या घरी चांगल्या प्रकारे राहिले असते. पण त्याच्यामुळे मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आणि माझे वडील माझी काळजी करू लागले. म्हणूनच त्यांचे निधन झाले. ते गेल्यानंतर आता घरची परिस्थिती किती कठीण झाली आहे?


हे सर्व प्रकाशमुळे घडले. मी त्याला कधीही माफ करणार नाही. त्याने आमच्या सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त केले.'


असे विचार करून रजनीला खूप रडू यायचे.


तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, रजनीने घराची जबाबदारी घेतली. ती एका खाजगी हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून काम करू लागली.


'माझ्या आयुष्यात जे घडले ते चांगले नव्हते. जे घडले ते आपण बदलू शकत नाही, परंतु आपले भविष्यातील जीवन चांगले आणि आनंदी करण्यासाठी आपण काही चांगले प्रयत्न तर करू शकतो.'


असा विचार करून, रजनी तिच्या कुटुंबासाठी खूप काम करू लागली.


रजनीचे आयुष्य अजूनही सोपे नव्हते. ते अनेक अडचणींनी भरलेले होते.


'तिने तिच्या सासरचे घर सोडले आणि ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहते आहे. याचा अर्थ तिला सासरी राहणे आवडत नाही. तिच्यामुळेच तिचे वडील वारले.'


नातेवाईक आणि ओळखीचे लोक असे एकमेकात बोलायचे आणि कधीकधी ते रजनीला  टोमणेही मारायचे.


अशा गोष्टी ऐकून रजनीला खूप वाईट वाटायचे.


'प्रकाशची चूक होती, पण मलाच दोष दिला जात आहे. सहानुभूतीऐवजी मला टोमणे मारले जात आहेत.'


या विचाराने रजनी अजून दु:खी व्हायची.


अशा सर्व अडचणींना तोंड देत, रजनी तिच्या आईला, भावाला, बहिणीला आणि तिच्या मुलाला प्रणवला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती.



देवाच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून, एखाद्याला मार्ग सापडतो आणि जीवन सोपे वाटू लागते.


रजनीलाही असाच अनुभव येत होता.


 तिने तिच्या भावाला आणि बहिणीला चांगले शिक्षण दिले आणि नंतर त्यांचे व्यवस्थित लग्नही लावून दिले.


'मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. मला पुन्हा लग्न करावेसे वाटत नाही.'


हा विचार मनात ठेवून, रजनी तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त राहत होती. तिने कधीही स्वतःबद्दल विचार केला नाही. तिला नेहमीच तिच्या मुलाची, प्रणवची काळजी वाटत होती. 


प्रणव खूप हुशार आणि मेहनती होता. रजनी स्वप्न पाहत होती की, तो स्वतःच्या पायावर उभा राहील.भविष्यात सुखी होईल.


आज, बारावी उत्तीर्ण होऊन, तो यशाकडे वाटचाल करत होता. हे पाहून रजनी खूप आनंदी झाली. पण ज्या व्यक्तीने तिचे आयुष्य बदलून टाकले, तिच्या आयुष्यात इतके दुःख आणले, तीच व्यक्ती, तिचा नवरा... प्रकाश, आज तिच्यासमोर आला होता आणि तेही अशा अवस्थेत...


'पुढे काय होईल?'


रजनी हेच विचार करत होती आणि तेव्हा सुमनच्या आवाजाने ती भूतकाळातून पुन्हा वर्तमानात परतली.


सुमनने तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. मग रजनीने तिला संपूर्ण कहाणी सांगितली.


तिची कहाणी ऐकल्यानंतर सुमनलाही खूप वाईट वाटले.


रजनी प्रकाशवर खूप रागावली होती. पण आज तो तिच्याकडे एक पेशंट म्हणून आला होता. ती त्याची एक नर्स म्हणून, आपले कर्तव्य म्हणून काळजी घेत होती, तिची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करत होती.


काही तासांनंतर, प्रकाश शुद्धीवर आला. जेव्हा त्याने रजनीला त्याच्या समोर पाहिले तेव्हा तो देखील स्तब्ध झाला. तो तिच्या नजरेपासून 

स्वतः ची नजर टाळू लागला. त्याला लाज वाटू लागली.


"रजनी, मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला आहे आणि आता मला त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. जिच्यामुळे मी तुला त्रास दिला तिने माझा विश्वासघात केला आहे. ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी पळून गेली. तिने माझे सर्व पैसे घेतले आणि मला सोडून गेली. माझ्या कृत्यांचे परिणाम मी भोगत आहे.

माझ्यामुळे माझे आईवडील आजारी पडले आणि अखेर त्यांचे निधन झाले. माझा मोठा भाऊ आणि वहिनी यांनी माझ्याशी संबंध तोडले.


मी स्वतःचे पोट भरण्यासाठी काम शोधत फिरत असतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी मी  जे काम दिसेल ते काम करू लागलो पण माझी हालत पाहून मला कोणी कामही देत नाही आणि या  टेन्शनमुळे मी जास्त दारू पिऊ लागलो.


जे काही झालं ते झालं, पण तू माझ्या आयुष्यात परत आली आहेस, म्हणून आपण पुन्हा एकत्र राहू. देवानेच आपल्याला पुन्हा एकत्र आणले आहे. हे आजच्या प्रसंगातून समजले मला.


आपल्याला मुलगा आहे की मुलगी? मी  पाहिलेही नाही. मला आपल्या बाळाला आत्ता  भेटायचं आहे. आपण तिघेही आता एकत्र राहू. रजनी, तू मला माफ करशील ना?"


प्रकाशने चेहऱ्यावर विनंतीचे भाव दाखवत रजनीला म्हटले.


प्रकाशचे म्हणणे ऐकून रजनीने काहीच उत्तर दिले नाही.


'प्रणव काय विचार करेल? त्याने कधीही त्याच्या वडिलांना पाहिले नाही आणि त्यांचे प्रेमही त्याला मिळाले नाही. आता हे सर्व सांगून मी त्याला दुःख देऊ इच्छित नाही.'


असा विचार करून रजनीने प्रकाशबद्दल फक्त तिच्या आईलाच सांगितले.


"रजनी, तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे."


रजनीच्या आईने तिला सांगितले.


'मला माफ कर.'


हे सांगणे खूप सोपे आहे, पण चूक करणारी व्यक्ती आपल्या चुकीमुळे इतरांना होणारे नुकसान विचारात घेत नाही. इथे, प्रकाशच्या चुकीने फक्त माझेच नाही तर प्रणवचेही आयुष्य बदलले. माझे वडील वारले.

माझ्या आयुष्यात किती दुःख आले आहे? मी त्याला कसे माफ करू शकते?

‘क्षमा करणे सोपे आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे दोन्ही असू शकते.

ते व्यक्ती आणि परिस्थितीवर अवलंबून असते.


जर चूक किरकोळ असेल आणि त्यामुळे जास्त नुकसान झाले नसेल, किंवा परिस्थिती योग्य असेल, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन क्षमा करू शकतो. तथापि, जर चूक जाणूनबुजून केली असेल आणि त्यामुळे एखाद्याचा जीव गेला असेल, अजून काही नुकसान झाले असेल तर क्षमा करणे कसे शक्य आहे?


चूक करणाऱ्या व्यक्तीला त्याची चूक कळली पाहिजे आणि तो ती पुन्हा करणार नाही याची खात्री कशी करावी?


या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करत रजनीने प्रकाशच्या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले आणि पुन्हा  एकत्र न राहण्याचा तिचा निर्णयही त्याला सांगितला.


रजनीने प्रकाशची चूक माफ केली नाही, पण माणुसकी दाखवत तिने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. रजनीचा असा विश्वास होता की प्रकाशचे भावी आयुष्य काही चांगल्या कामासाठी  लागले पाहिजे आणि व्यसनामुळे वायाही जाऊ नये.


'मी  माझ्या आयुष्यात आता आहे तशी आनंदी आहे.'


असा विचार करून, रजनी तिचे  आयुष्य आनंदाने जगू लागली.



समाप्त 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...